Skip to main content
x

हरकिशन लाल

चित्रकार

            प्रख्यात चित्रकार हरकिशन लालयांचा जन्म पंजाबमध्ये, लुधियाना येथे झाला. अविवाहित राहणे पसंत केलेल्या हरकिशन लाल यांनी आयुष्याची तब्बल पन्नास वर्षे फक्त चित्रकारीत घालवली. आयुष्यातल्या अनुभवांवर आधारलेली, तसेच निसर्ग आणि समुद्रचित्रे काढणारा हा कलावंत मुळातच विलक्षण संवेदनशील आणि कविमनाचा होता. आपला जन्म फक्त चित्र काढण्यासाठीच झालाय असा त्यांचा ठाम विश्‍वास होता आणि वास्तवातही चित्रकार म्हणून जगणे हेच त्यांचे ध्येय होते.

            लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून  १९४० मध्ये पदवी मिळवून ते बाहेर पडले. आपल्याला कलेचे शिक्षण घ्यायचे आहे असे ठरवून, मुंबईत येऊन त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९४७ मध्ये त्यांनी फाइन आर्टचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १९४९ ते १९५३ या काळात दिल्लीच्या पॉलिटेक्निकमध्ये चित्रकलेचे प्रशिक्षण देण्याचे काम केले. त्यांनी १९५३ मध्ये भारताच्या पाच जणांच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य या नात्याने पोलंड आणि रशियाचा दौरा केला. काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये भ्रमण करताना त्यांनी बरीच कलानिर्मिती केली. त्यानंतर ते मुंबईत स्थिरावले. व्हॅन गॉग आणि सेझां यांच्या चित्रशैलीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा तर होताच त्याचबरोबर त्यांनी भारतीय चित्रशैलीचा भरपूर अभ्यास  केला होता. सुरुवातीच्या काळात भारतीय लघुचित्रांची, त्यातही खास करून पहाडी लघुचित्रशैलीची छाप त्यांच्या कामावर होती. त्याचप्रमाणे अजिंठ्यातील भित्तिचित्रांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. अशा अनेक प्रभावांच्या दडपणाखाली न राहता त्यांनी आपली स्वतंत्र शैली निश्‍चित केली आणि त्याच शैलीत ते सदैव काम करीत राहिले.

            त्याबद्दल लिहिताना प्र.अ. धोंड आपल्या आठवणीत लिहितात, ‘हरकिशन लाल हा आमचाच विद्यार्थी. पूर्वीचे स्त्री-पार्टी नट दिसत तसा गुलजार दिसायचा. सुरुवाती-सुरुवातीला त्याची मातीच्या रंगात रंगवल्यासारखी खेड्यातील निसर्गचित्रे फार वाखाणली जात. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात त्याचे चित्र या मंद रंगयोजनेमुळे वेगळे व उठून दिसे. त्याला सुवर्णपदक मिळेपर्यंत त्याची चित्रे त्याच शैलीत होती. त्यानंतर त्याच्या शैलीत हळूहळू तीव्र रंग येऊ लागले व त्यानंतरच्या काळात तर जळजळीत झाले आहेत. पण त्यात जराही सवंगपणा नाही. आधीचा हा निसर्गचित्रकार बघता बघता केवल चित्रकार झाला आहे.’

            उत्स्फूर्तपणा हेच त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. जगावेगळ्या रंगछटांचा वापर हेही त्यांचे विशेष होते. बर्‍याचदा ते कॅनव्हासवर दोन स्वतंत्र रंग लावून नंतर त्याचे चित्राच्या प्रतलावरच मिश्रण करून अफलातून रंगछटांचे दर्शन घडवीत असत. कल्पकता आणि नवनिर्मिती यांचे दर्शन त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत घडत असते. निसर्गाच्या सान्निध्यात, हिमालयात राहून त्यांनी त्या अनुभवाला मुक्तपणे चित्रित केले.

            काही वेळा हरकिशन लाल यांच्या चित्रांत मानवाकार, प्राणी, पक्षी आदींचे दर्शन घडायचे. फाळणीच्या घटनेचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला होता आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांमध्ये पडलेले दिसते. अविवाहित राहिलेल्या हरकिशन लाल यांच्या चित्रांत प्रेमभंग झालेल्या तरुणी हा तर मोठा विषय असायचा. त्यांच्या अखेरच्या काळातल्या चित्रांमध्ये काल्पनिक विषयही असायचे.

            भारतीय कलेला आधुनिकतेकडे घेऊन जाणार्‍या परिचित कलाकारांमध्ये हरकिशन लाल हे नाव

            घेतले जात नसले तरी या बाबतीतले त्यांचे काम फार मोठे आहे हे त्यांची त्या वेळची चित्रे पाहून लक्षात येत.

            ते अविवाहित राहिले व त्यामुळे आलेले एकटेपण आणि व्यसन यांतून केरळमधल्या कोट्टाकल येथे त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले.

- श्रीराम खाडिलकर

हरकिशन लाल