Skip to main content
x

हरोलीकर, अरूण भीमराव

     रुण भीमराव हरोलीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. कोल्हापुरातील राजारामपुरी व न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी राजाराम महाविद्यालयामधून बी.ए. ची पदवी संपादन केली. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशिक्षण पूर्ण केले. आपण सैन्यातच जायचे असा त्यांचा ठाम निर्धार होता. ब्रिटिश सेवेत प्रवेश न मिळाल्यास फ्रेंच वसाहतीच्या सैन्यात जाण्याचा त्यांचा विचार होता. सेनेत जाण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना भारतीय लष्करात प्रवेश मिळाला.

     ५८ गुरखा ट्रेनिंग सेंटर येथे लष्करी प्रशिक्षण, वेलिंग्टन येथे एक वर्षाचे प्रशिक्षण व गुलमर्ग येथे पर्वतारोहणाचे व अतिथंड प्रदेशातील युद्धाचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. कॉलिम्पाँग, शिलाँग, भारत-पाक सीमारेषा अशा ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे.

     पाकिस्तानविरूद्धच्या युद्धात अटग्राम, गाझीपूर व सिल्हेट या तीन ठिकाणाच्या लढाया यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने जिंकल्या. यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या ४/५ गोरखा रायफल्स या पलटणीला ‘सिल्हेट’ हा युद्धसन्मान व ‘पूर्व पाकिस्तान १९७१’ हा थिएटर सन्मान देण्यात आला. एखाद्या रेजिमेंटमधील ५० टक्के सैनिक युद्धात लढले असतील तसेच त्यांना दिलेले उद्दिष्टही त्यांनी पूर्ण केलेले असेल तर अशा रेजिमेंटला हा सन्मान दिला जातो. यांच्या पलटणीतील शूरवीरांना दोन महावीरचक्र, तीन वीरचक्र व तीन सेवा पदके मिळाली आहेत.

     १६ ऑगस्ट १९७१ रोजी यांची नियुक्ती पंचग्राम या सिल्हेटच्या पश्चिमेकडील सरहद्दीवर झाली. नोव्हेंबरमध्ये  पंचग्रामच्या जवळील अटग्राम येथील पाकच्या लष्करी ठाण्यावर कब्जा करण्याचा आदेश त्यांच्या पलटणीला मिळाला. यासाठी प्रामुख्याने तीन योजना आखण्यात आल्या. एक- पाकिस्तानी फौजेवर अनपेक्षितपणे हल्ला चढविणे, दुसरे- पाकिस्तानी चौक्या-चौक्यांच्या दरम्यान असलेल्या अंतरातून घुसखोरी करून आत शिरायचे व तिसरे- कुकर्‍यांचा उपयोग करून पाकिस्तानी फौजेस जरब बसविणे. ठरलेल्या योजनेनुसार २० नोव्हेंबरच्या रात्री त्यांची तुकडी सुरमा नदीच्या काठावर पोहोचली. रबरी नावांमधून या तुकडीची आगेकूच सुरू असताना अचानक तुकडीच्या दिशेने गोळीबार होऊ लागला.

     शत्रूच्या गोळीबारापासून आपला बचाव करण्याच्या प्रयत्नात गुंतल्यामुळे या सैनिकांची दिशाभूल झाली. मात्र अटग्रामच्या लष्करी ठाण्याकडून या सैनिकांवर काही वेळाने पुन्हा गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार १५००-२००० मीटर्स अंतरावरून मशीनगनने केला जात असल्यामुळे शत्रूचा निश्‍चित ठावठिकाणा आपल्या सैनिकांना माहीत झाला. हा गोळीबार थंडावल्यानंतर आपली तुकडी गुपचूपपणे पुढे सरसावली आणि शत्रू बेसावध असताना त्याच्यावर तुटून पडली. शत्रूच्या बंकर्समध्ये घुसून कुकरीचा वापर करून शत्रूच्या सैनिकांना यमसदनास पाठविण्यास सुरूवात केली. आपल्या सैनिकांवर गोळीबार करणारा नेमका बंकर लक्षात आल्यावर हरोलीकरांचे सहकारी सुभेदार रणबहाद्दूर यांनी त्या बंकरवर हातबॉम्ब फेकून त्या बंकरचा विध्वंस केला. शत्रूचे सैनिक ठार झाले. हरोलीकरांच्या नेतृत्वाखाली ५ गोरखा रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनाच्या निर्णायक विजय झाला.  

- ज्योती आफळे

हरोलीकर, अरूण भीमराव