Skip to main content
x

अभ्यंकर, मुकुंद लक्ष्मण

     मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर यांचा जन्म पुणे येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे नूतन विद्यालयात झाले. त्यांनी १९६३ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील सर परशुराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.ए.च्या वर्षाला असताना त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये आपले नाव नोंदवले; पण वडिलांच्या मृत्यूमुळे त्यांना तेथे जाता आले नाही. त्यांनी १९५७ मध्ये अर्थशास्त्र विषयातील बी. ए. ची पदवी घेतली, तर १९५९ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील एम. ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना १९५९ मध्ये शेतकी खात्यात सांख्यिकी विभागात साहाय्यकाची नोकरी लागली. तेव्हा त्यांना रु. ८० पगार होता. त्यावेळेस घरात गोदरेजचे कपाट घेण्यासाठी त्यांनी कॉसमॉस बँकेचे कर्ज घेतले. त्याकारणाने त्यांचा कॉसमॉस बँकेशी पहिला संपर्क आला. शेतकी खात्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना सर्व जिल्ह्यांमध्ये फिरावे लागे. त्या काळात वाहनांची सोय नसल्यामुळे त्यांना बराचसा प्रवास पायी करावा लागे. १९६६ मध्ये त्यांची परभणी येथे बदली झाल्यावर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्याच वर्षी ते सातारा येथील कूपर इंजिनियरिंग या कंपनीत दाखल झाले. तेथे ते ऑरगानायझेशन विभागात काम करत होते. तेथे त्यांनी २ वर्षे काम केल्यावर १९६८ मध्ये नोकरी सोडली व ते पुन्हा पुण्यात आले.

     अभ्यंकर यांनी पुणे विद्यापीठात पीएच.डी.साठी ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयासाठी नाव नोंदणी केली व १९७३ मध्ये त्यांनी विद्यापीठाला आपला प्रबंध सादर केला. त्याच वर्षी त्यांना दै. केसरीमध्ये नोकरी लागली. तेथे ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. दीड वर्षांनी त्यांनी ही नोकरी सोडली व भोसरी येथे रंग तयार करण्याचा स्वत:चा कारखाना स्थापन केला. हा कारखाना १९८९ पर्यंत चालू होता. याच काळात त्यांनी नागरी सहकारी बँकेचे प्रभारी सचिव या नात्याने १९६५ मध्ये कामाला सुरुवात केली. त्यांनी १९७३ मध्ये रोटरी संघटनेत सदस्य म्हणून प्रवेश केला. त्यानंतर ३२ वर्षे सलगपणे त्यांनी रोटरी संघटनेच्या लहान-मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि स्वदेश व परदेशात समाजसेवा प्रकल्प यशस्वीपणे राबविले. अभ्यंकर १९७५ मध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून वाणिज्य विद्याशाखा प्रतिनिधी म्हणून पुणे विद्यापीठाच्या विधी सभेवर बहुमताने निवडून आले. त्यांनी वाणिज्य विद्याशाखा प्रतिनिधी या नात्याने ३ वर्षे निकराचा प्रयत्न करून आवश्यक ते विधिनियम मंजूर करून घेतले आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभागाची स्थापना केली. त्या वेळेस महाराष्ट्र सरकारकडून या विभागाला अनुमती देताना कोणत्याही पदासाठी शासकीय अनुदान मिळणार नाही अशी अट घालण्यात आली होती. डॉ. अभ्यंकर यांनी ती अट मान्य करून दोन देगणीदारांकडून साहाय्य घेऊन ‘पद्मश्री विखे-पाटील सहकार अध्यासन’ व ‘डी.एस. सावकार बँकिंग अध्यासन’ या दोन अध्यासनांची स्थापना केली. तसेच त्यांनी पुणे विद्यापीठात व्यवस्थापनशास्त्राच्या शिक्षणाची व्यवस्थाही केली. त्यांनी सेनादलातील अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर लाभ व्हावा; म्हणून व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची विशेष तुकडी सुरू केली.

     अभ्यंकर यांनी पुणे विद्यापीठाच्या अर्थसमितीवर काम करीत असताना विद्यापीठाला आर्थिक तुटीतून बाहेर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच त्यांनी पुणे विद्यापीठात १९७९-१९८२, १९८५-१९८७ या काळात वाणिज्य विद्या शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही काम केले आणि त्या वेळेस वाणिज्य पदवीच्या  अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याचे काम केले. अभ्यंकर १९७५ मध्ये लोकाग्राहास्तव कॉसमॉस बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. परंतु निवडणुकीच्या दिवशीही ते उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही त्यांना १४ व्या क्रमांकाची मते मिळाली. त्यांनी १९७८ मध्ये पुन्हा ना. प्र. कुलकर्णी व म. ना. परांजपे या मित्रांच्या आग्रहाने निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यांनी जिद्दीने निवडणूक लढवली. त्यांचे बाकी पॅनेल अपयशी झाले असले, तरी ते मात्र निवडून आले.

     १९८१ ची निवडणूक तांत्रिक मुद्द्यांसाठी हायकोर्टाने रद्द ठरवल्यावर पुन्हा ७-८ महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत अभ्यंकर जिंकले व त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेची व्यावसायिक प्रगती करण्यावर पहिला भर दिला. तसेच, व्यापाऱ्यांनी कर्ज घेताना अर्जासोबत आपल्या संस्थेचा ताळेबंद सादर केला पाहिजे, ही नवी संकल्पना रूढ झाली. त्याचबरोबरीने अधिकाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्यावरही त्यांनी भर दिला. शाखा अधिकाऱ्यांना काही मर्यादेपर्यंत कर्ज मंजुरीचे अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांच्या कार्यकाळात घेतला गेला. तेव्हा त्यांना त्यांचे सहकारी शशिकांत बुगदे व प्रमोद पारखी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

     अभ्यंकर यांनी १९८८ मध्ये पुणे विद्यापीठ सोडले व ते कॉसमॉस बँकेत पूर्ण वेळ काम करू लागले. त्या वर्षी रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेल्या शेड्यूल्ड सहकारी बँकांच्या यादीत कॉसमॉसचे नाव नव्हते. सतत तीन वर्षे बँकेचा दर्जा सुधारण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे १९९० च्या दुसऱ्या यादीत कॉसमॉसचे नाव आले. त्या प्रयत्नांमध्ये अभ्यंकर यांचा मोलाचा वाटा होता.

     अभ्यंकर १९८७ मध्ये कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळावर प्रथम निवडून आले. त्या वेळी बँकेच्या ठेवी ७२ कोटी होत्या. त्यांच्या कार्यकाळात एकूण १०४ नवीन शाखांची स्थापना झाली. त्यामुळे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागला होता.

     त्या काळात सहकारी बँकांच्या शाखा विस्तारासाठी रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळत नसे. म्हणून १९९४ पासून अभ्यंकर यांनी आजारी बँका कॉसमॉस बँकेमध्ये विलीन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले व १९९७ मध्ये मुंबई येथील वैभव सहकारी बँक कॉसमॉस बँकेत यशस्वीपणे विलीन करून घेतली. रिझर्व्ह बँकेने १९९८ मध्ये स्थापना केलेल्या जिल्हा के. माधवराव समितीवर नियुक्त केलेल्या ८ सदस्यांपैकी, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रामधून एकमेव प्रतिनिधी म्हणून अभ्यंकर यांची निवड झाली होती. तेव्हा त्यांना विविध राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या कामाचा परिचय करून घेण्याची संधी मिळाली. एप्रिल २००१ मध्ये जंगम मालमत्ता (असेट लायबलेटी) व्यवस्थापन संकल्पना नागरी सहकारी बँकांना लागू करावी की नाही, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेल्या कार्यकारी गटाचेही ते सदस्य होते. रिझर्व्ह बँकेने त्यांना नागरी सहकारी बँकांसाठी असणाऱ्या ‘स्थायी सल्लागार समिती’वर तज्ज्ञ म्हणून नेमले. केवळ राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी आणि विविध राज्यांचे सहकार आयुक्त एवढ्या सदस्यांची ही समिती असते. अशा या समितीवर रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी डिसेंबर २००४ मध्ये अभ्यंकर यांना तज्ज्ञ सदस्य म्हणून निमंत्रित केले. याच समितीवर असताना नागरी सहकारी बँकेसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिजन डॉक्सुमेंट्सचे गठण झालेले आहे. तसेच नागरी सहकारी बँकेच्या अडी-अडचणी याच समितीद्वारे त्यांना रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचवता आल्या. पुढे भांडवल पर्याप्तता निकष सहकारी बँकांना लागू करावेत का आणि करावयाचे झाल्यास कसे आणि केव्हा करावेत याचा विचार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या समितीमध्येही अभ्यंकरांचा समावेश करण्यात आला होता. नंतर नागरी सहकारी बँकेच्या सल्लागार समितीचे तज्ज्ञ सभासद म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

     देशातील नागरी सहकारी बँकेच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा मालेगम समितीद्वारे ऑक्टोबर २०१० मध्ये अभ्यास करण्यात आला. त्या समितीत नागरी क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून अभ्यंकर यांची निवड झाली होती. त्यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात बँकेच्या ठेवी १४ हजार कोटी व ८ हजार कोटींचे कर्जवाटप झाले.

     मुकुंद अभ्यंकर १९६३ मध्ये शामल सबनीस यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले. त्या बी.एस्सी. (होम सायन्स) होत्या. अभ्यंकर यांना आपल्या संपूर्ण वाटचालीत त्यांच्या पत्नी अंजली अभ्यंकर यांचे यशस्वी सहकार्य लाभले. डॉ. अभ्यंकर यांनी १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील स्थानिक वृत्तपत्रांची गरज लक्षात घेऊन ‘समाचार’ हे सायंदैनिक सुरू केले. १५ वर्षे ते या दैनिकाचे संपादक होते.

     मुकुंद अभ्यंकर यांना १९९९ साली व्यास प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा महर्षी व्यास पुरस्कार देण्यात आला. सहकार शताब्दीनिमित्त डिसेंबर २००४ मध्ये  गुजरातमधील कालूपूर व्यावसायिक या सर्वात मोठ्या नागरी बँकेने २७ कार्यकर्त्यांचा गौरव केला. त्यामध्ये मुकुंद अभ्यंकर यांच्यासहित महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश होता. पुण्यातील सामाजिक कृतज्ञता प्रतिष्ठानने २००५ सालापासून उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. मुकुंद अभ्यंकर हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले. त्यांना महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे सहकारी बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट व भरीव कार्याबद्दल २००९ मध्ये आर्यभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यात आला. रोटरी क्लबतर्फे दिला जाणारा सर्व्हिस अबाऊट सेल्फ हा २०११ चा पुरस्कार प्राप्त झाला.

- संपादित

अभ्यंकर, मुकुंद लक्ष्मण