Skip to main content
x

आचवल, माधव भास्कर

माधव आचवल यांचे शालेय शिक्षण विल्सन हायस्कूल मुंबई येथे झाले. त्यांनी ज. जी. कला महाविद्यालयातून १९४५ मध्ये वास्तुशास्त्रात पदवी प्राप्त केली. आचवल बडोदा येथे एम. एस. विद्यापीठात प्राध्यापक होते.

आचवलांचे ललित लेखन १९५५च्या सुमारास ‘सत्यकथा’ मासिकामधून प्रसिद्ध होऊ लागले. त्यांचे ललित लेखन ‘किमया’ (१९६१) तसेच ‘पत्र’ (१९९२) या दोन संग्रहांमधून प्रकाशित झालेले आहे.  आचवलांची वैशिष्ट्यपूर्णता या दोन्ही संग्रहांमधून लक्षात येते. ‘आनंद आणि सुख याच मुळी आधी मानवी कल्पना आहेत. त्यांचा थोडा जरी अभ्यास केला, तरी हे पटावे की सुख हे संवेदनांत नाही, संवेदनांची मन जी रचना करते त्यांत आहे. अनुभवापासून दूर जाऊन त्याकडे बघण्यात आहे. ती स्वभावतःच एक मानसिक प्रक्रिया आहे त्यामुळे हे स्पष्ट आहे की मन हे जितके तरल व तीक्ष्ण, आठवणी साठवण्याची शक्ती आणि कल्पनेची झेप जेवढी मोठी, तितके सुख मोठे’... (पृष्ठ १२६) त्यांच्या ललित लेखनामागची दृष्टी या अवतरणातून स्पष्ट होते.

निसर्गातील तसेच मानवनिर्मित कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिक मन, जगण्यातील चैतन्याला कवेत घेणारी संवेदनशीलता, सौंदर्यासक्त आनंदी वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या ललित लेखनामधून येतो. उत्कटता, सळसळता उत्साह यांच्यासह जगण्याची ऊर्मी, प्रसन्नता, निरागस खेळकरपणा हे गुण त्यांच्या ललित लेखनामध्ये जाणवतात. कलाकृतींमधील सौंदर्याचा मनावर एकत्रित होणारा परिणाम तसेच कलाकृतीतील चैतन्याचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी ललित लेखनामधून केला. चिंतनशीलता, कठोर विश्लेषण आणि जगण्यातले मार्दव, कारुण्य यांची जोपासना अशा दोन अंगांनी झालेला विकास त्यांच्या ललित लेखनामधून स्पष्ट होतो.

‘जास्वंद’ (१९७४) ह्या ग्रंथातून त्यांनी गंगाधर गाडगीळ, इंदिरा संत, पु. शि. रेगे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्यकृतींवर केलेली समीक्षा प्रसिद्ध आहे. ‘रसास्वाद: वाङ्मय आणि कला’ (१९७२) हा ‘जास्वंद’च्या आधी प्रसिद्ध झालेला समीक्षापर ग्रंथ. यात ‘रणांगण’ या विश्राम बेडेकर यांच्या कादंबरीचे व ‘ताजमहाल’ या जगप्रसिद्ध वास्तुशिल्पाचे रसग्रहण केलेले आहे.

बा. सी. मर्ढेकर यांच्या समीक्षेने कलाकृतीची स्वायत्तता, तिचे अनन्यसाधारण असणे, आत्मनिष्ठा या मूल्यांवर विशेष भर दिला. कलाकृतीच्या आकृतिबंधाची जडणघडण, तिच्यामध्ये असलेले आशय आणि अभिव्यक्तीचे अद्वैत व त्या अंगाने येणारे शैलीविशेष यांना मर्ढेकरांच्या समीक्षेमध्ये महत्त्व दिले गेले. साहित्यकृतीचा रसास्वाद कसा घ्यावा, साहित्य आणि इतर ललित कलांमधील साम्यभेद विशद करणारे लेखन मर्ढेकर आणि त्यानंतरच्या नवसमीक्षेने केले. मर्ढेकरांच्या नंतरच्या काळातील नवसमीक्षेच्या प्रवाहातील समीक्षक म्हणून माधव आचवल परिचित आहेत.

ललितकृतींमधून जाणवणारे चैतन्य म्हणजे प्रत्यक्ष जीवनात जाणवणार्‍या चैतन्याचा आभास असतो. हे प्रत्यक्ष जीवनातील चैतन्यापेक्षा निराळे असते. ते त्या विशिष्ट कला-आकृतीमुळे जाणवलेले असते. कलाकृतीत जीवन चैतन्याचा आभास तिच्यातील भावनात्मक आशयामुळे होतो. कलाकृतीत जाणवणारे चैतन्य व तिच्यामधून व्यक्त होऊ पाहणारे चैतन्य यांना सोयीकरता निराळे करून त्यांचा परस्परांशी असलेला संबंध तपासता येतो. कलाकृतीचे घटक व यांचे स्वतंत्रपणे विश्‍लेषण करून कलाकृतीचा भाग झाल्यामुळे त्यांच्यावर झालेले परिणाम पाहणे हे आचवल यांच्या समीक्षेचे थोडक्यात सार म्हणता येईल. ‘डार्करूम आणि इतर एकांकिका’ (१९७५), ‘चिता आणि इतर एकांकिका’ (१९७६) हे माधव आचवल यांचे निवडक एकांकिका संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘अमेरिकन चित्रकला’ (१९६४) हे त्यांचे अनुवादित पुस्तक होय.  

- प्रा. रूपाली शिंदे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].