Skip to main content
x

अडुरकर, व्ही. एस.

      चित्रकलेच्या विविध क्षेत्रांतील देश-परदेशांतील अनेक संस्थांच्या पदव्या व इंग्लंडमधील ‘रॉयल सोसायटी ऑफ पेंटर्स, एचर्स अ‍ॅण्ड एन्ग्रेव्हर्स’ या संस्थेचे बहुमानाचे सभासदपद मिळविणारे पहिले भारतीय कलावंत म्हणून अडुरकर ख्यातनाम होते. याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळात १९४७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे पहिले भारतीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

      व्ही.एस. अडुरकर मूळचे कोकणातील. लहानपणीच मातापित्यांचे छत्र हरपले. त्यामुळे शालेय शिक्षण सोडून ते लहान भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मुंबईत पोहोेचले. सोनार जातीत जन्म झाल्यामुळे कारागिरी व कसब जन्मत:च अंगात होते. त्याचा वापर करीत अर्थार्जन करून ते भावंडांना पैसे पाठवू लागले. बालपणापासूनच कलेची आवड असल्यामुळे त्यांनी १९२८ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षणासाठी रीतसर प्रवेश घेतला. गोपाळ देऊस्कर, ज.द. गोंधळेकर, व्ही.जी. नागेशकर, अंबिका धुरंधर हे त्यांचे समकालीन विद्यार्थी. त्यांनी १९३१ मध्ये चित्रकलेची पदविका प्राप्त करून त्या वर्षीचा ‘डॉली कर्सेटजी’ हा रेखाटनातील मानाचा पुरस्कारही मिळविला. यानंतर त्यांनी १९३६ पर्यंत शिल्पकला, कला  व कारागिरी विभागांतही शिक्षण घेऊन अनेक बक्षिसे मिळविली. त्यांनी फक्त आर्किटेक्चरचाच कोर्स केला नाही.

      या सर्व काळात ते शिक्षणाची वेळ सोडता उर्वरित वेळेत अविश्रांत मेहनत करून कुटुंबासाठी द्रव्यार्जन करीत. परंतु या परिस्थितीतही त्यांनी परदेशी शिक्षण घेण्याचा निश्‍चय केला व १९३६ मध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. प्रथम तेथील वेस्टमिन्स्टर स्कूल व रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधील अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी ए.आर.सी.ए. ही पदवी संपादन केली व सर्व युरोपचा दौरा करून १९३९ मध्ये ते भारतात परतले.

      भारतात परतल्यावर अडुरकर यांनी ब्रेबॉर्न स्टेडियम येथे स्वत:चे एकल प्रदर्शन भरविले. यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘अडुरकर-मेहता’ या नावाने प्रसिद्धीस आलेली ‘स्मरणचित्र’ (मेमरी ड्रॉइंग) या विषयावरील पुस्तकमाला विविध भाषांत प्रसिद्ध केली. या मालिकेच्या लक्षावधी प्रती भारतात व भारताबाहेरही खपल्या. त्यांची १९४७ मध्ये जे.जे. स्कूलचे पहिले भारतीय संचालक म्हणून नेमणूक झाली  व या पदाची जबाबदारी त्यांनी सात वर्षे यशस्विरीत्या सांभाळली. या कालावधीत तत्कालीन मुंबई सरकारच्या ड्रॉइंग ग्रेड व उच्चकला परीक्षांच्या बोर्डाचे चेअरमन व विविध वयोगटांसाठी कलाविषयक विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

      याच काळात त्यांचे मुंबई सरकारतर्फे इंग्लंडमध्ये डेप्युटेशनवर जाऊन शिक्षण घेऊन आलेल्या उपसंचालक (डेप्युटी डायरेक्टर) व कमर्शिअल विभागाचे प्रमुख व्ही.एन. आडारकर यांच्याशी मतभेद झाले. या सुमाराला श्रीमती हंसा मेहता समितीच्या अहवालामुळे कलाशिक्षणातील सुधारणांसोबतच ‘डेप्युटी डायरेक्टर’ हे पद रद्द करण्यात आले होते. त्याची परिणती जे.जे.मधील वातावरण बिघडण्यात झाली. यातून जे.जे.तील कलात्मक दर्जा अडुरकर आल्यापासून खालावत गेल्याची टीका व्यंगचित्रांसह वृत्तपत्रीय लेखांतून होऊ लागली. पण मोठमोठे टीकाकार, जाणकार, लेखक व मंत्री वगैरेंनी त्या काळातील जे.जे.तील प्रदर्शनांना भेटी देऊन दर्जा खालावला नसल्याची ग्वाही दिली. अनेक नाणावलेले चित्रकार, शिल्पकार व वास्तुविशारदांनी प्रदर्शनांचा दर्जा उच्च असल्याची ग्वाही आपल्या सह्यांनिशी वृत्तपत्रांत जाहीरपणे दिली. पण परिस्थिती बिघडतच गेली व परिणामी अडुरकरांना शैक्षणिक व रा.ना. वेलिंगकर यांना प्रशासकीय कामासाठी प्रमुख म्हणून नेमण्यात आले. यातून कमर्शिअल विभागातील विद्यार्थी व शिक्षक अडुरकरांचा अपमान करू लागले. या परिस्थितीला कंटाळून त्यांनी पुन्हा परदेशी जाण्याचा निर्णय घेतला व १९५४ मध्ये ते इंग्लंडला रवाना झाले.

      इंग्लंडमध्ये अडुरकरांनी वेस्टमिन्स्टर टेक्निकल इन्स्टिट्यूट व लंडन स्कूल ऑफ प्रिन्टिंग अ‍ॅण्ड ग्रफिक आर्ट येथे सिल्क स्क्रीन, एअर ब्रश, ग्रफिक रिप्रॉडक्शन, कलर प्रिन्टिंग या तंत्रांचा तत्कालीन, आधुनिक व व्यावसायिक अभ्यास केला. याच काळात त्यांनी चेल्सी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये ‘जेमॉलॉजी’ या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या सोबतच त्यांनी उत्कीर्णन आणि मुद्राचित्रण (एचिंग व प्रिंटमेकिंग) या दोन तंत्रांत प्रावीण्य मिळवून ‘रॉयल सोसायटी ऑफ पेंटर्स, एचर्स अ‍ॅण्ड एन्ग्रेव्हर्स’ या संस्थेचे मानाचे ए.आर.ई. आणि ए.आर.सी.ए. हे सभासदत्व मिळविणारे ते पहिले भारतीय कलावंत ठरले. चित्रकलेच्या विविध विषयांत अडुरकरांइतक्या पदव्या क्वचितच अन्य चित्रकाराने संपादन केल्या असतील.

      ते अनेक वर्षे परदेशातच राहिले व भारतातही त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक या सर्वोच्च पदावर काम केले. परंतु ते कधीच त्यांच्या समकालीन चित्र-शिल्पकारांत मिसळले नाहीत. ते अनेक व्यावसायिक कामे करीत व स्वान्त:सुखाय त्यांची चित्रनिर्मितीही सुरू असे. पण त्या कलाकृती इतरांना कधीही बघता आल्या नाहीत. आयुष्यभर ते अविवाहित राहिले व अत्यंत एकाकी जगले. अखेरपर्यंत त्यांनी ज्या काही थोड्या लोकांना आपले मानले, त्यांच्याशी त्यांचा कायम संबंध होता. ते कायम इंग्रजी पद्धतीच्या सुटाबुटांतच वावरले. ते खुशीत असल्यास, शेक्सपीयरच्या नाटकातील स्वगते एकामागून एक, नाट्यपूर्ण आविर्भावात म्हणून दाखवीत.

      त्यांच्या मृत्यूनंतर १९८४—८५ च्या महाराष्ट्र राज्य रौप्य- महोत्सवी कला प्रदर्शनात त्यांची काही चित्रे प्रदर्शित झाली. त्यावरून असे दिसून येते की, अडुरकर मुख्यत: उत्तम कारागीर होते. त्यांच्या कामात सफाई व परिपूर्णता होती. त्यांचे विषयही साधे असत. फुले, फुलपाखरे, जनावरे, पक्षी यांच्यात ते रमून जात. बारीकसारीक तपशील भरून ते आपली कौशल्यपूर्ण चित्रे पूर्ण करीत. एकाच विषयावर त्यांनी शेकडो चित्रे केली असून त्यांत परिपूर्णतेचा ध्यास असे; परंतु त्यांच्या मृत्यूपर्यंत ती कधीच रसिकांसमोर आली नाहीत. आपल्या जवळच्या संबंधातील व्यक्तींनाही ते ती दाखवत नसत व आपले खासगीपण कसोशीने जपत.

      ते शिकत होते त्या काळातील मुंबईच्या भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीचे किंवा नंतरच्या काळातील विरूपीकरणात्मक आधुनिक कलाविष्काराचे त्यांना आकर्षण वाटले नाही. त्यांच्या हयातीत त्यांनी विकलेली त्यांची कलानिर्मिती त्यांच्या मृत्यूनंतरही पाहावयास मिळत नाही. चित्रे घेणारे ग्रहक प्रामुख्याने परदेशी असल्यामुळे आजच्या पिढीलाही ते अज्ञातच आहेत. ते अविवाहित होते. मुंबईत, वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- सुहास बहुळकर

अडुरकर, व्ही. एस.