Skip to main content
x

अकलूजकर, अशोक नरहर

       ‘प्रथमे हि विद्वांसो वैयाकरणा:’ या उक्तीप्रमाणे एक तलस्पर्शी विद्वान व्याकरणकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त अशोक नरहर अकलूजकर यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. संस्कृत आणि पाली या विषयांसह त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर आणि हार्वर्ड विद्यापीठातून १९७० साली विद्यावाचस्पती या पदव्या संपादन केल्या. शिक्षण चालू असतानाच त्यांनी स.. महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आणि नंतर इलिनॉइज युनिव्हर्सिटी, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी येथे संस्कृत अध्यापनाचे कार्य चालू ठेवले. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, व्हँकूव्हर कॅनडा येथे व्याख्याता म्हणून रुजू होऊन अकलूजकर यांनी दीर्घकाळ संस्कृत आणि तत्संबंधी विषयांचे अध्यापन केल्यावर, त्याच विद्यापीठाचा सुप्रतिष्ठ प्राध्यापक’ (Professor Emeritus) हा अत्युच्च सन्मान त्यांना प्राप्त झाला.

विद्यार्थिदशेपासूनच अत्यंत उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्द असलेल्या अकलूजकर यांनी अनेक शिष्यवृत्त्या पटकावल्या. त्यांतील काही महत्त्वाच्या अशा : अमेरिकन काउन्सिल ऑफ लर्नेड सोसायटीज, सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज रिसर्च काउन्सिल ऑफ कॅनडा आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, सीनियर किल्लम फेलोशिप.

नवी दिल्ली येथील संस्कृत मंदाकिनी संघटन या संस्थेतर्फे त्यांना विद्या-सागरया सन्मान पदवीने गौरवण्यात आले, तर अठराव्या आंतरराष्ट्रीय वेदान्त गोष्ठी २००८ मध्ये त्यांना व्याकरण-प्रभाकरअसा किताब बहाल करण्यात आला. अखिल भारतीय संस्कृत संमेलनात;  संस्कृतच्या  क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल २०१२मध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भारत सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणार्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान या देशव्यापी संस्थेतर्फे त्यांना सन्माननीयडी.लिट.’ ही उपाधी सत्कारपूर्वक देण्यात आली.

संस्कृतच्या प्रसारासाठी अकलूजकर यांनी कॅनेडियन असोसिएशन ऑफ संस्कृतही संस्था कॅनडा येथे स्थापून तिचे सचिवपद त्यांनी दीर्घकाळपर्यंत भूषवले. त्याशिवाय, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ संस्कृत स्टडीज या संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्यत्व, अमेरिकन ओरिएन्टल स्टडीजच्या डायरेक्टर मंडळाचे सभासदत्व, शास्त्री इंडो-कॅनेडिअन संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्यत्व असे अनेक बहुमान त्यांना प्राप्त झाले.

अकलूजकर यांच्या प्रकाशित साहित्यापैकी संस्कृत:अॅन ईझी इन्ट्रोडक्शन टू अॅन एन्चान्टिंग लँग्वेज’ (१९९२) या पुस्तकाची अनेक मुद्रिते निघाली. त्याशिवाय, ‘द थिअरी ऑफ निपाताज (पार्टिकल्स) इन यास्कज निरुक्त’ (१९९९), ‘स्टडीज इन संस्कृत ग्रमर’ (जॉर्ज कार्दोना व हिदेयो ओगावा या सहलेखकांसह) २००९, ‘लिंग्विस्टिक ट्रॅडिशन ऑफ कश्मीर’ (मृणाल कौल या सहलेखकासह) २००८, ही काही महत्त्वाची पुस्तके होत. नव्वदपेक्षा अधिक संशोधन निबंध, मोनोग्रफ्स, वीसपेक्षा अधिक परीक्षणे, या विद्वत्तापूर्ण लेखनाबरोबरच अकलूजकरांचे ललित लेख, हलक्या-फुलक्या संस्कृत कविता, संपादकीये अकलूजकरांच्या सर्वगामी संस्कृतप्रतिभेची साक्ष देतात. ऑल इंडिया रेडिओवर संस्कृतसंबंधी कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण शारदासारख्या संस्कृत नियतकालिकांचे संपादन, विदेशात अनेक ठिकाणी निबंधवाचन असा अकलूजकर यांचा व्यस्त जीवनक्रम असतो. भारतातही वाराणसी, चेन्नई, पुणे, मुंबई, तिरुपती, वडोदरा येथे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अकलूजकरांचे शोधनिबंध वाखाणले गेले आहेत. अकलूजकर यांच्यावरील एक गौरवांकही त्यांच्या चाहत्यांनी प्रसिद्ध केला आहे.

डॉ. परिणीता देशपांडे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].