Skip to main content
x

अमळनेरकर, सखाराम रामभट

सखाराम महाराज

      खान्देशामधील अमळनेर हे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून समस्त खान्देशीयांचे श्रद्धास्थान आहे. येथील अमळनेरकर संस्थानाला २५० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. संत सखाराम महाराज अमळनेरकर हे या संस्थानाचे आद्य सत्पुरुष होत.

     सखाराम रामभट अमळनेरकर ऊर्फ सखाराम महाराज यांचा जन्म अमळनेर जवळील चिखली नदीच्या काठी ‘पिंपळी’ या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते. बालपणापासूनच छोट्या सखारामला विठ्ठलाचा नाद होता. तो सारखा विठ्ठल नामाचा घोष करीत असे व गाई-गुरे राखताना सगळ्या सवंगड्यांना गोळा करून पुराणातील देवांच्या कथा सांगत असे. त्याचा हा छंद सर्वसामान्यांना न कळणारा होता म्हणून बहुतेक लोक सखारामलाच वेडा म्हणत होते. आई-वडिलांचे निधन झाल्यामुळे सखाराम लहान वयातच पोरका झाला. त्याचा चुलतभाऊ रंगनाथ याने सखाराम व त्याची सावत्र आई नानूबाई यांचा सांभाळ केला. सखारामाचे देवाचे वेड कमी होण्यासाठी त्याचे सोळाव्या वर्षीच लग्न लावून देण्यात आले. पण पत्नीच्या सहयोगाने सखारामाची साधना उत्तरोत्तर वाढत गेली. एके दिवशी एरंडोलचे थोर सत्पुरुष रघुनाथ स्वामी यांनी सखारामच्या घराच्या दारात उभे राहून ‘सखाराम’ म्हणून जोरदार हाक मारली आणि ते पुढे निघून गेले. गुरुकृपेची वाट पाहणारा सखाराम धावत घराबाहेर आला व त्यांच्या मागे- मागे चालत थेट एरंडोलपर्यंत गेला. रघुनाथ स्वामी यांनी त्याचा निष्ठावंत भाव पाहून अडावद येथे, श्रीनिवास महाराज यांच्याकडे त्यास गुरुपदेशासाठी पाठविले. श्रीनिवास महाराज व सखारामची दृष्टीभेट होताच गुरुशिष्याची एकमेकांस ओळख पटली. श्रीनिवास महाराज हे रामानुजाचार्य परंपरेतील थोर सत्पुरुष होते. त्यांनी सखारामाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पारमार्थिक अनुग्रह दिला.

     पूर्वजांच्या घरात हक्क नाकारून चुलतभाऊ रंगनाथ याने सखारामला घराबाहेर काढले. सखारामने याबद्दल रंगनाथला धन्यवाद दिले व वाडी नावाच्या भागात एक झोपडी बांधून विठ्ठलनामाच्या आनंदात तो दंग झाला. यामुळे सारे गाव थक्क झाले.

     सखारामची पत्नी माहेरची सधन होती. ती बाळंतपणानंतर अमळनेरला परतली आणि नवऱ्याची झोपडी पाहूनही आहे त्या स्थितीत पतिसेवा करीत त्यांच्या आध्यात्मिक साधनेला तिने मदत केली. ग्रमस्थांच्या इच्छेने सखाराम यांनी पुढाकार घेऊन ‘हरिनाम सप्ताहा’चे आयोजन केले. ईश्वरी कृपेने हा हरिनाम सप्ताह यशस्वी झाला. हरिनाम सोहळ्यात येणाऱ्यांची गैरव्यवस्था व्हावी व सखारामची नाचक्की व्हावी असा काही ग्रमस्थांचा दुष्ट हेतू होता. पण या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या यशामुळे सखारामची कीर्ती दूरवर पसरली. सखारामच्या संतत्वाचा, साधुत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळला.

    अमळनेरजवळच्या अंबर्षी टेकडीवर तपश्चर्या करणारे योगी महादेव बुवा एके दिवशी सखारामकडे आले. सखारामच्या संसाराची विपन्नावस्था पाहून ते त्याला परमार्थ सोडून संसाराकडे लक्ष देण्यास सांगून त्यांनी त्याला मदत करण्याचीही तयारी दर्शविली; पण ‘‘परमार्थ हेच माझे जीवन आहे. मला संसाराची आसक्ती नाही. मला आपणांकडून काही नको, फक्त आपली कृपा असू द्या,’’ अशी सखारामने त्यांना प्रार्थना केली. सखारामची ही एक परीक्षाच होती. त्याची ही निःस्पृहता व विठ्ठलनिष्ठा पाहून योगी महादेव बुवा यांनी त्यांना काही सिद्धी देऊ केल्या होत्या.

    पंढरपुरी आषाढी वारीसाठी अमळनेरहून पायी जाणे व चार महिने पंढरीतच चातुर्मास वास्तव्य करणे हा सखारामांचा नियम होता. एकदा आषाढीसाठी पायी पंढरीकडे निघाले असताना वाटेत कायगाव टोके येथे गोदावरी नदीला प्रचंड पूर आलेला होता. चार-पाच दिवस पूर ओसरण्याचे लक्षण नव्हते. त्या वेळी सखाराम यांनी चक्क पुरात उडी घेतली व देवकृपेने ते सुखरूपपणे पैलतीरी लागले. पंढरीवारीचा नियम पूर्ण झाला. असेच एका वर्षी वारीला जाताना चोपड्याजवळ सातपुड्यातील कुविख्यात दरोडेखोर मान्या किल्ले याने त्यांना अडवून, बंदी बनवून जंगलात नेले. तेथे सखाराम महाराज यांनी नेहमीची वेळ होताच विठ्ठलाची पूजा व भजन सुरू केले. त्यांची पूजा व भजनातील तल्लीनता पाहून मान्या भिल्लही देहभान हरपून गेला. महाराजांना शरण येऊन त्याने ‘आपल्याला काहीतरी सेवा देऊन क्षमा करावी’ अशी विनंती केली. महाराजांनी मान्याला अमळनेर येथील रथयात्रा उत्सवात लागणारा लाकूडफाटा पुरविण्याची सेवा दिली.

     दुसर्‍या बाजीराव पेशव्यांची सखाराम महाराजांवर विशेष श्रद्धा होती. ते आळंदीची कार्तिकवारी झाल्यावर सखाराम महाराजांना सन्मानाने पुण्यात शनिवारवाड्यात पाचारण करून संतपूजा करीत असत. एकदा पेशवे यांनी महाराजांपुढे आपल्या राज्याबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हा त्यांना सखाराम महाराज यांनी अत्यंत परखडपणे बजावले, ‘‘अनीती व अत्याचारामुळे या राज्याचा सर्वनाश होणार हे निश्चित आहे.’’ इ.स. १८१८ मध्ये आपल्या इहलोकीच्या कार्याची समाप्ती जवळ आली आहे असे लक्षात येताच सखाराम महाराज यांनी ‘अखंड हरिनाम सप्ताह’ सुरू केला. अन्नपाणी वर्ज्य करून हरिनामाच्या संकीर्तनातच त्यांनी  पांडुरंग चरणी देह ठेवला.

    संत सखाराम महाराजांनंतर श्री गोविंद बुवा (इ.स. १८१८ ते १८५१), ३३ वर्षे या ‘अमळनेरकर संस्थाना’च्या गादीवर होते. त्यांनी हे संस्थान नावारूपास आणले. त्यानंतर श्री बाळकृष्ण महाराज (१८५१ ते १८७५), श्री प्रल्हाद महाराज (१८७५ ते १८८५), श्री तुकाराम महाराज (१८८५ ते १८९६), श्रीकृष्ण महाराज (नऊ महिने), दुसरे बाळकृष्ण महाराज (१८९७ ते १९३१), वासुदेव महाराज (१९३१ ते १९५२), पुरुषोत्तम महाराज (१९५२ ते १९६४), ज्ञानेश्वर महाराज (१९६४ ते १९८०) आणि सध्या विद्यमान श्री प्रसाद महाराज यांनी संस्थानाची धार्मिक परंपरा मोठ्या निष्ठेने जोपासलेली आहे.

     अमळनेरकर संस्थानामुळे रामानुजाचार्य यांची भक्तिधारा वारकरी संप्रदायात मिळालेली आहे. यांचा चार महिने पंढरपुरात मुक्काम असतो व बाकी आठ महिने महाराष्ट्रभर खेडोपाडी भक्तियात्रा चालू असतात. त्या भेटींची, गावांची नावे व तिथी, वेळा कायमस्वरूपी ठरलेल्या असतात. वर्षभराचा एवढा निश्चित व कोणत्या कारणाने न बदलणारा प्रवास क्वचितच अन्य कोणी करत असेल. ही गावोगावची संपर्क-यात्रा म्हणजेच अमळनेरकर संस्थानाचे धर्मजागरण कार्य होय आणि हे कार्य गेली २५० वर्षे अविरतपणे विस्तारत आहे.

     पंढरपूरच्या मठात चातुर्मासात होणाऱ्या अनेक उत्सवांचे आयोजन व अमळनेर येथे वैशाखात होणारा रथोत्सव, हे या धार्मिक संस्थानाचे वैशिष्ट्य आहे.

विद्याधर ताठे

अमळनेरकर, सखाराम रामभट