आपटे, मोहन हरी
प्रा. मोहन हरी आपटे यांचा जन्म कुवेशी, ता. राजापूर (जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण कुवेशीत झाले. मॅट्रिकपर्यंतचे पुढील शालेय शिक्षण साताऱ्याला झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि फर्ग्यसन महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञानात बी.एस्सी. केले. एक वर्ष रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नोकरी करून मग त्यांनी एम.एस्सी.साठी अहमदाबाद गाठले. तिथून एम.एस्सी. करताना त्यांनी प्रथम वर्ग मिळवला. १९६४ साली एम.एस्सी. झाल्यावर त्यांनी प्रत्येकी एक वर्ष सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात आणि सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात अध्यापन केले.
१९६६ साली ते मुंबईत आले, तेव्हापासून ते डिसेंबर १९९८ मध्ये निवृत्त होईपर्यंत भारतीय विद्याभवनच्या सोमाणी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. निवृत्तीच्या वेळी ते भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख होते. याच दरम्यान १९८९ ते १९९९ अशी दहा वर्षे ते मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे (सिनेटचे) सभासद होते. तसेच, १९९० ते १९९४ या काळात प्रा.आपटे मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे सदस्य होते. १९८१ साली ब्रिटिश कौन्सिलतर्फे इंग्लंडला जाऊन तेथील शिक्षणपद्धतीची माहिती घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी विशेष पाठयवृत्ती मिळवून ते काम केले. १९९८ सालापासून ते उत्तन-भाईंदरच्या रामरत्ना विद्यामंदिराच्या शिक्षण मंडळाचे सदस्य आहेत. याखेरीज, टाटा मूलभूत संशोधन केंद्रात ‘फोटो इलेक्ट्रिक क्रिस्टल्सवर’ त्यांनी एक वर्ष काम केले.
शैक्षणिक क्षेत्रात अशी कामगिरी करणाऱ्या प्रा.आपटे यांची सामाजिक संस्था आणि विज्ञान प्रसाराची बाजू तितकीच मोठी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईचे ते १९७० ते १९७२ या काळात अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या जनसेवा समितीचे १९८८ ते १९९९ अशी अकरा वर्षे ते अध्यक्ष होते. तसेच लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले या संस्थेचे ते १९९६ ते १९९८ या काळात विश्वस्त होते.
खगोलशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यामुळे आकाशदर्शनाचे शेकडो कार्यक्रम करणाऱ्या आपटे यांनी ह्या विषयावर किती लेख लिहिले आणि किती भाषणे दिली, याची मोजदाद करता येणार नाही. महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, विवेक, धर्मभास्कर, किर्लोस्कर या नियतकालिकांत त्यांनी सातत्याने लेख लिहिले आहेत. अजूनही त्यांचे लिखाण सुरुच आहे. प्रा.आपटे हे फर्डे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. खणखणीत वाणी आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये आहेत. तशीच त्यांनी लिहिलेली पुस्तकेसुद्धा अभ्यासपूर्ण आहेत. त्यांची मराठीत ४६ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांतील पहिली दोन पुस्तके वगळता, सर्व पुस्तके विविध प्रकाशकांनी छापलेली आहेत. खगोलशास्त्र, गणित, विज्ञान या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांमध्ये खगोलशास्त्रावरील निम्म्यापेक्षा अधिक आहेत.
‘शतक शोधांचे’ हे विसाव्या शतकातील महत्त्वपूर्ण निवडक शोध, शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक घटनांचा मागोवा घेणारे ६२० पानी, तर ‘चंद्रलोक’ हे चंद्र आणि चांद्रमोहिमांचा वेध घेणारी अनोखी सफर घडवणारे ३४० पानांचे पुस्तक; ही दोन्ही पुस्तके त्यांच्या लिखाणातील सुलभता आणि त्यांचा गाढा व्यासंग यांचा परिचय देतात. म्हणूनच ह्या मोठ्या पुस्तकांच्या विक्रीबाबत प्रकाशक निश्चिंत असतात. लोकमान्यतेबरोबर त्यांच्या पुस्तकांना राजमान्यताही मिळाली आहे. १९८५-८६, १९८६-८७ आणि १९९०-९१, असे तीन वेळा भौतिकशास्त्र, ललितविज्ञान आणि सर्वसामान्य ज्ञान, छंद आणि शास्त्रे अशा तीन वेगवेगळ्या गटांत त्यांच्या पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेले आहेत. या लेखन कामगिरीमुळेच त्यांना नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा ग.वि. अकोलकर पुरस्कार १९९७ साली, तर पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार १९९८ साली मिळाला. याखेरीज खगोलशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मुंबईच्या खगोल मंडळाने पहिल्या भास्कराचार्य पुरस्काराने २००५ साली त्यांना सन्मानित केलेले आहे.
त्यांनी इंग्रजीतही चार पुस्तके लिहिली आहेत. याव्यतिरिक्त, आजच्या काळाशी सुसंगत अशा सीडीसुद्धा त्यांनी काढल्या आहेत. त्यांमध्ये, ‘सूर्यमालेची काल्पनिक सफर’ आणि ‘पृथ्वी’ मराठीत व इंग्रजीत स्वतंत्रपणे, तर ‘स्पेस शटल’ ही एकत्रित स्वरुपात उपलब्ध आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातूनही त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला आहे. आकाशवाणीवर गेली दोन वर्षे सुरू असलेल्या पृथ्वी आणि खगोल यांविषयीच्या मालिकांचे ते तज्ज्ञ म्हणून काम पाहत आहेत. १९९० साली मराठी विज्ञान परिषदेने वार्षिक अधिवेशनात त्यांचा विज्ञान प्रसार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांच्या ‘सन्मानकरी’ म्हणून गौरव केलेला आहे.
लिखाण, भाषणे, समाजकार्य, खगोलविषयक कामगिरी याचबरोबर नियमित व्यायामाची सवय, हायकिंग-ट्रेकिंगमधील रुची, चित्रकलेतील प्रावीण्य ह्या आणखी काही क्षेत्रांत प्रा.आपटे यांना गती आहे. तरुणांना कार्यप्रवण करणे, हे कार्य ते सातत्याने विविध संस्थांच्या माध्यमातून, उत्साहाने करत आहेत. इंटरनेटसारखे नवीन माध्यम आत्मसात करून त्यावरही त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. बदलत्या काळात स्लाइड्स, चित्रे यांचा मुबलक वापर करून ते व्याख्याने देतात. अध्यापन आणि विज्ञान प्रसार या दोन्ही क्षेत्रांत तितकीच तोलामोलाची कामगिरी प्रा.आपटे यांनी केली आहे.