Skip to main content
x

आपटे, पांडुरंग श्रीधर

    पांडुरंग श्रीधर आपटे हे मूळचे अंमळनेरचे. आपटे गुरुजी या नावानेच ते ओळखले जात. आपटे गुरुजींनी बी.ए. झाल्यानंतर एल.एल.बी.ची पदवी संपादन केली होती. विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळात राष्ट्रीय शिक्षण व स्वदेशीच्या प्रचारासाठी तत्कालीन मुंबई प्रांतात काही राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका काँग्रेस समितीच्या विद्यालय समितीने, येवला गावात ६ जून १९२१ रोजी ‘टिळक राष्ट्रीय विद्यालय’ सुरू केले. येवल्यातील दानशूर व्यापारी सोनीशेठ ह्यांनी दिलेल्या अठरा खोल्या व मोठे सभागृह असलेल्या इमारतीत शाळा सुरू झाली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शाळेच्या उद्घाटनासाठी आले होते.

     हे गाव व्यापाऱ्यांचे व विणकरांचे होतेे. पहिल्या वर्षी पहिल्याच आठवड्यात त्यांच्या पाल्यांनी प्रवेश घेतला आणि दोनशे मुलांची ही शाळा सुरू झाली. शाळेसाठी गावातील शिक्षणप्रेमींनी अनेक ठिकाणांहून शिक्षक बोलावून घेतले. त्यामध्ये आपटे गुरुजी होते. गुरूजींनी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काम सुरू केले. सर्व शिक्षक ध्येयवादाने भारलेले होते. गावातील लोकांनी त्यांच्या संसार खर्चापुरते जमा करून दिलेले पैसे हा त्यांचा पगार होता. मुख्याध्यापक असूनही आपटे गुरुजी  शिक्षकांइतकाच पगार घेत असत.

      विद्यालयात सातवी म्हणजे मॅट्रिकपर्यंतचे वर्ग होते. हे विद्यालय टिळक महाराष्ट्र विद्यापीठास संलग्न होते. अभ्यासक्रमात मातृभाषेस प्रथम स्थान होते. इतिहास-भूगोलाच्या अध्यापनात प्रेरक गोष्टींवर भर दिला जाई. विज्ञान व गणित हे विषय मराठीतून शिकविले जात. अक्षर, शुद्धलेखन, पाठांतर यांवर भर दिला जाई. इंग्रजी, इतिहास, संस्कृतसारखे विषय शिकविताना नवे नवे शैक्षणिक प्रयोग केले जात. शारीरिक शिक्षणास महत्त्वाचे स्थान दिले जात होते. मुलांमध्ये लेखन, वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वर्तमानपत्रांतील कात्रणे काढणे, ती विषयवार लावणे हे मुलांना शिकविले जाई. दैनंदिनी लिहिणे, व्याख्यानांचा गोषवारा लिहिणे असे उपक्रमही मुलांकडून करवून घेतले जात. 

      एकूणच त्या काळातही विद्यार्थ्यांचा सर्वच दृष्टिकोनांतून सर्वंकष विकास व्हावा, राष्ट्रहिताच्या कल्पना त्यांच्या मनात बिंबाव्यात ह्या हेतूने आपटे गुरुजी व त्यांचे सहकारी शिक्षक नियोजन करीत.

     सार्वजनिक गणेशोत्सव हा येवल्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होता. तो साजरा करण्यात आपटे गुरुजींचा प्रमुख वाटा असे. या निमित्ताने अनेक नेत्यांच्या व्याख्यानातून ज्ञानप्राप्तीबरोबरच राजकीय, सामाजिक जागरण घडत असे. शिवजयंती, टिळक पुण्यतिथी यासारखे राष्ट्रीय उत्सव शाळेत होत असत. खर्‍या भारताची मुलांना ओळख व्हावी म्हणून आपटे गुरुजी मुलांना खेडोपाडी घेऊन जात. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या परीक्षांसाठी मुलांची तयारी करून घेत. अशा संस्कारांमुळे विद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले, मोठे झाले. येवल्यात सुंदर असे शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचे श्रेय आपटे गुरुजींना आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या  काळात आपटे गुरुजींनी व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. परिणामी सरकारने विद्यालय जप्त केले. आपटे गुरुजी व इतरांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी ‘टिळक राष्ट्रीय विद्यालया’च्या जागेवरच ‘विनय मंदिर’ ही संस्था उभी केली. अनौपचारिक शिक्षणातून, राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून जागृती करण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय शाळेप्रमाणेच या संस्थेतही साप्ताहिक भिक्षेचा परिपाठ चालू होता, कारण तो लोकमताचा पाठिंबा दाखविणारा होता. राष्ट्रीय शाळा व विनय मंदिर विद्यापीठामुळे राष्ट्रप्रेमाची पेढीच तयार झाली होती.

     १९४२ च्या चळवळीतही सर्व सहभागी झाले. पाचच वर्षांनी देशास स्वातंत्र्य मिळाले. ‘प्रदेश लोकशिक्षण समिती’वर आपटे गुरुजींची नेमणूक झाली. ही समिती, टिळक राष्ट्रीय विद्यापीठ पुण्यात होते. गुरुजींनी सत्तावीस वर्षांनी येवले सोडले. ते पुण्यात त्यांच्या डॉक्टर मुलाकडे गेले. गुरुजी अखेरपर्यंत शिक्षकच राहिले. मुलांना शिकवण्याचे कार्य पुण्यातही चालू होते. लेखनासाठी वेळ मिळू लागला. वाचक म्हणून मुलांना समोर ठेवून लेखन केले. एकूण बत्तीस पुस्तके लिहिली.

     गुरूजींनी शिक्षणासाठी पूर्ण आयुष्य दिले व स्वत:चा मृत्यूही शिक्षणकार्यातच कारणी लावला. १९५१ मध्येच देहदानाची इच्छा व्यक्त करणारे पत्र आयुर्वेद महाविद्यालयास दिले होते. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी ते स्वीकारले आणि गुरुजींची इच्छा पूर्ण झाली. आपटे गुरुजी निर्भय, निर्वैर, निष्पक्ष आचार्याचे जीवन जगले.

- प्रा. सुहासिनी पटेल

आपटे, पांडुरंग श्रीधर