Skip to main content
x

अर्णीकर, हरी जीवन

     प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची बनारस हिंदू विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्राचे ज्येष्ठ अध्यापक, अण्वीय रसायनशास्त्रातील एक अग्रगण्य संशोधक आणि प्रभावी वक्ते अशी ओळख आहे. युनेस्कोच्या एका शैक्षणिक प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

     प्रा. अर्णीकर यांचा जन्म आंध्रप्रदेशातील श्रीकाळहस्ती या गावी झाला. ते सात वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण कष्टात गेले. शिक्षणासाठी त्यांना गावोगावी फिरावे लागले. त्यांच्या आत्याने सतत प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांचे शालान्त शिक्षण पूर्ण झाले. मदनपल्लीच्या बेझंट थिऑसॉफिकल महाविद्यालयाचे प्राचार्य चिंतामणी त्रिलोकेकर यांनी अर्णीकरांचे गुण आणि बुद्धी लक्षात घेऊन त्यांची बनारस हिंदू विद्यापीठात पुढील शिक्षणाची सोय करून दिली. तेथे बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या दोन्ही पदव्या त्यांनी पहिल्या श्रेणीत, पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन डॉक्टरेट पदवीसाठी संशोधन सुरू केले. त्यांना प्रा. श्रीधर सर्वोत्तम जोशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक होते, ‘कोरोना प्रेशर अँड दी जोशी इफेक्ट इन गॅसेस अंडर डिस्चार्ज.’ त्यांचा प्रबंध सातशे पृष्ठांचा होता आणि तीन परदेशी प्राध्यापकांनी त्याची प्रशंसा केली होती.

     १९५५ साली त्यांना भारत सरकारची ‘ओव्हरसीज मॉडिफाइड स्कॉलरशिप’ मिळाली. त्यानुसार ते पॅरिसमधील मेरी क्यूरी यांनी स्थापन केलेल्या प्रयोगशाळेत रुजू झाले. तेथे त्यांना प्रा. फ्रेडरिक जुलिएट क्यूरी आणि प्रा. इरेन क्यूरी या नोबेल मानकरी असलेल्या पति-पत्नीबरोबर संशोधन करण्याची संधी मिळाली. ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्ट्स’ हा प्रबंध त्यांनी तेथे लिहिला. पॅरिस विद्यापीठाने त्यांच्या प्रबंधाचे मूल्यमापन करून त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’  ही पदवी दिली. १९५८ साली ते बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्रपाठक म्हणून रुजू झाले. या ठिकाणी त्यांनी अणुरसायनशास्त्र विभागाची उभारणी केली. डॉ. के. एन. उडुपा यांच्याबरोबर वैद्यकशास्त्रामध्ये कल्पकतेने जेथे-जेथे किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (आयसोटोपचा) उपयोग करता येईल, तेथे-तेथे यशस्वीपणे करून दाखवला. त्या सुमारास पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागामध्ये त्यांना प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. ३१ जुलै १९६२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.

     मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये अणुरसायनशास्त्राच्या अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा विकसित केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ विद्यार्थ्यांनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली. त्यातून ३०० शोधनिबंध प्रकाशित झाले. १९७७ साली ते सेवानिवृत्त झाले. तरीही विद्यापीठाने त्यांना मानद प्राध्यापक म्हणून अध्यापन-संशोधन करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे प्रा. अर्णीकरांना ‘हॉट अ‍ॅटम केमिस्टी’, ‘अ‍ॅक्वाल्युमिनेसन्स’, ‘फ्युज्ड इलेक्ट्रोलाइट्स’, ‘जोशी इफेक्ट’ आदी विषयांमध्ये संशोधन करणे शक्य झाले. ‘युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटी’च्या वतीने त्यांनी काही उपक्रम राबवून विज्ञान प्रसारासाठी फिरत्या प्रयोगशाळेचाही उपयोग केला होता.

    १९६२ साली त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात मॅनहॅटन प्रकल्पातील शास्रज्ञ प्रा. जॉन विलार्ड यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली होती. रसायनशास्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांची ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. हा प्रकल्प खास करून आशियातील संस्थांसाठी होता आणि त्याचे कार्य बँकॉक येथे होत असे. त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाच्या अनेक प्रकल्पांत आणि उपक्रमांत सातत्याने भाग घेतला.

    कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ साली भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले होते. १९८८ साली लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चे (एफ.आर.एस.सी.) ते मानद सदस्य झाले. १९७४ साली उत्कृष्ट शिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांचा गौरव केला. पुणे विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यांना १९९९ साली ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘विद्या व्यास पुरस्कार’, ‘एम. व्ही. रमणय्या पुरस्कार’, ‘शारदा ज्ञानपीठ पुरस्कार’, ‘प्रो. फ्रेडरिक ज्योलियो क्यूरी एंडोमेंट अवॉर्ड’, ‘फुलब्राइट शिष्यवृत्ती’ आदी सन्मानांचे ते मानकरी ठरले. ‘इसेन्शियल्स ऑफ न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड आयसोटोप्स इन दी अ‍ॅटॉमिक एज’ या त्यांच्या पुस्तकाचे युरोपातील सहा देशांनी भाषांतर केले आहे. १९०८ साली डॉ. लेडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांनी गूढ रसायनशास्त्रावर एक ‘ऑकल्ट केमिस्ट्री’ हा ग्रंथ लिहिलेला होता. १९१९ साली या ग्रंथाची एक सुधारित आवृत्तीही निघाली होती. त्या ग्रंथातील निष्कर्षांचा आधुनिक विज्ञानाच्या कसोटींवर अर्णीकर यांनी अभ्यास केला. त्यावर आधारलेला ‘एसेन्शियल्स ऑफ ऑकल्ट केमिस्ट्री’ हा ग्रंथ त्यांनी २००० साली, वयाच्या अठ्ठयाऐंशीव्या वर्षी लिहून पूर्ण केला. प्रा. अर्णीकरांना मराठी, तेलगू, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा अस्खलितपणे बोलता येत असत. त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन विज्ञानप्रसाराचे कार्यही केले. नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या अनेक जणांशी त्यांचा व्यक्तिगत परिचय होता.प्रा. हरी जीवन अर्णीकर यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

     — डॉ. अनिल लचके

अर्णीकर, हरी जीवन