Skip to main content
x

आर्ते, मर्चंट काहिनी

        स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जन्म झालेल्या आणि परदेशात शिक्षण आणि वास्तव्य झालेल्या काहिनी आर्ते-मर्चंट या आधुनिक वास्तववादी चित्रशैलीच्या स्वयंशिक्षित तरुण स्त्री-चित्रकार आहेत. त्यांचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. मात्र, लहानपणाचा आणि शिक्षणाचा सर्व काळ इंग्लंडमध्ये व्यतीत झाला. त्यांनी चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मुंबईच्या कला महाविद्यालयातून अंतर्गत गृहसजावट (इंटीरिअर डिझाइन) हा अभ्यासक्रम त्यांनी १९७९ साली प्रथम श्रेणी आर्ते-मर्चंट यांनी पेंटिंग करण्याकरिता पूर्ण वेळ स्वत:ला वाहून घेतले.

             सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधल्या कलासक्त वातावरणाचा हा परिणाम होता. मोठमोठे चित्रकार, शिल्पकार ज्या स्कूल ऑफ आर्टच्या कलावास्तूमध्ये शिकून बाहेर पडले, त्यांमध्ये वावरत असताना काहिनी यांच्या मनातही पेंटिंग करण्याच्या ऊर्मीने जन्म घेतला. पूर्ण वेळ पेंटिंग करण्याचा विचार पक्का केलेल्या काहिनी यांनी रंग, कॅनव्हास यांचा खर्च भागविण्याकरिता काही काळ मॉडेलिंग केले. कॅनव्हासवर वेगवेगळे प्रयोग करून पाहत, स्वत:च्या चुकांमधून शिकत काहिनी यांनी स्वत:ची एक आगळी, स्वतंत्र चित्रशैली विकसित केली, ज्यामध्ये कोणत्याही पूर्वसुरींचे अनुकरण नव्हते.

             फिगरेटिव्ह चित्रशैलीतून पेंटिंग्जची सुरुवात करणार्‍या काहिनी यथावकाश अमूर्त चित्रशैलीकडे वळल्या. काहिनींच्या या चित्रांना व्यावसायिक मागणी सुरुवातीपासूनच होती, मात्र आजच्या काहिनींच्या चित्रांमधून त्यांची जी आंतरिक दृष्टी जाणवते, ती त्यांच्या या सुरुवातीच्या चित्रांमध्ये नव्हती. लोकांना जे आवडते ते देण्यातून पैसा मिळतो; पण त्यात आपण आपले स्वत्व गमावून बसतो याची जाणीव झाल्यानंतरच त्यांच्या चित्रांत बदल होत गेला. आपल्यातले दोष मान्य करून स्वत:ला विकसित करीत जाण्याचे धाडस काहिनीमध्ये असून नव्या पिढीच्या स्त्री-चित्रकारांचे प्रतिनिधित्व करणारी स्त्री-चित्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

             काहिनींच्या चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन १९८८ साली मुंबईच्या ताज आर्ट गॅलरीमध्ये झाले. त्यानंतर आजतागायत त्यांची अनेक स्वतंत्र आणि एकत्रित प्रदर्शने देशात आणि परदेशांत झाली आहेत. आपल्या चित्रांकरिता काहिनींना विविध गोष्टींमधून स्फूर्ती मिळते. आपल्या ‘मेसेंजर’ नावाच्या चित्रमालिकेची प्रेरणा काहिनींना हिंदू पुराणांमधून, हनुमानाच्या प्रतिमेमधून मिळाली.

             फिगरेटिव्ह आणि अमूर्त चित्रशैलीचा उत्तम संयोगही काहिनींच्या चित्रांमधून दिसतो. स्टिल लाइफ प्रकारात काहिनी खुर्ची, सोफासेट अशा प्रतिमांचा वापर करतात, ज्यांचा उगम त्यांच्या शैक्षणिक पार्श्‍वभूमीमध्ये आहे. ड्रॉइंग, इन्स्टॉलेशन्स, पेंटिंग्ज अशा विविध चित्रप्रकारांमध्ये त्या काम करतात. सध्या शिल्प आणि इन्स्टॉलेशन या प्रकारांमध्ये त्यांचे अनेक प्रयोग चालू असून काहिनींच्या चित्रांमध्ये अनेक स्त्री-प्रतिमा वारंवार येतात. बर्‍याचदा त्या आत्मप्रतिमाही असू शकतात. स्वप्नांच्या दुनियेवर आधारित असलेले काहिनींचे आर.ई.एम. हे अलीकडच्या काळातील प्रदर्शन विशेष गाजले.

             काहिनी या विवाहित असून त्यांचे वास्तव्य मुंबईत आहे. प्रवासाची आवड असणार्‍या काहिनी यांनी देशपरदेशांतल्या अनेक उत्तम आणि दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला असून त्या उत्तम चित्रसंग्रहकही आहेत.

- शर्मिला फडके

आर्ते, मर्चंट काहिनी