Skip to main content
x

आठवले, अनंत दामोदर

     दासगणू महाराज यांचे उत्तराधिकारी प्राचार्य अनंत दामोदर आठवले हे थोर चिंतक, तत्त्वज्ञ, निरूपणकार आणि विद्वान लेखक म्हणून महाराष्ट्राला आणि संन्यास घेतल्यानंतर परमहंस स्वामी वरदानंदया नावाने संपूर्ण उत्तर हिंदुस्थानाला परिचित आहेत.

अनंत दामोदर आठवले यांचा जन्म अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत हे दासगणूंचे शिष्य होते. अनंत ४-५ वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पुढे आई राधाबाई आणि संत दासगणू यांनी अनंतरावांचे संगोपन केले. दासगणूंना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी अनंतरावांचा पुत्रवत प्रेमाने सांभाळ केला. अनंताची नाजूक, अशक्त प्रकृती पाहून काळजीपोटी दासगणूंनी त्याला शाळेत न घालता घरीच, खाडिलकर मास्तरांची नियुक्ती केली. प्राथमिक शिक्षण घरीच झाल्यानंतर दासगणूंनी अनंताला माध्यमिक शिक्षणासाठी पंढरपूरच्या आपटे प्रशालेत घातले. हे विद्यालय दासगणूंच्या वाड्याशेजारीच होते.

अनंतरावांना बालपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली होती. आपण परीक्षेत गुण मिळविण्यासाठी शिकत नसून ज्ञानासाठी शिकतोय अशी जाणीव त्यांच्या ठायी या वयात होती. त्यांचा व्यासंग व संस्कृत पाठांतर दांडगे होते. संस्कृत भाषेवर त्यांनी चांगलेच प्रभुत्व संपादन करून मॅट्रिकला असतानाच शककर्ता शालिवाहननावाचे संस्कृत महाकाव्य लिहिले होते. १९४० साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते १९४० साली पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यांना तत्त्वज्ञान या विषयात पदवी संपादन करण्याची इच्छा होती. पण दासगणूंच्या इच्छेनुसार त्यांनी आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. दासगणूंनी १९४१ साली लिमये यांची कन्या इंदिरा हिच्याशी अनंतरावांचे लग्न लावून दिले. अनंतराव १९४४ साली आयुर्वेद पदवीधर झाले आणि त्याच महाविद्यालयात त्यांना अध्यापक म्हणून सेवेची संधी मिळाली. १९५० साली त्यांनी आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) प्राप्त केली. त्यांनी १९६४ ते ६७ अशी ४ वर्षे प्राचार्यपद भूषविले. अध्यापन काळात त्यांनी आयुर्वेदावर विपुल लेखन केले. त्यांचे व्याधी विनिश्चय’,  ‘शल्यशालाक्य तंत्रआणि कौमारभृत्य तंत्रहे ग्रंथ आजही आयुर्वेद शिक्षणक्रमात महत्त्वाचे मानले जातात. दासगणूंची इच्छा आणि वृद्धावस्था लक्षात घेऊन ते हरिकीर्तनार्थ प्राचार्यपदाचा राजीनामा देऊन सेवेतून मुक्त झाले.

अनंतरावांनी १९३६ साली, वयाच्या सोळाव्या वर्षी दासगणूंच्या इच्छेखातर वारकरी संप्रदायातील थोर महाराज ह... केशवबुवा देशमुख यांच्यासमोर कीर्तन केले होते. त्यानंतर त्यांनी १९५० साली पुण्यातील गाय आळीतील राममंदिरात अधिकमास नाम सोहळाकेला. या सोहळ्यापासून दासगणूंनी आपल्या सर्व कीर्तन-प्रवचनादी जबाबदार्या पूर्णपणे अनंतरावांवर सोपविल्या. सर्व जण अनंतरावांना महाराज न म्हणता अप्पाम्हणत. त्यांचे कीर्तन म्हणजे पारंपरिक संत बोधासमवेतच आधुनिक ज्ञान-विज्ञानाची चतुरस्र मेजवानीच असे. देशाबद्दल जाज्वल्य निष्ठा त्यातून प्रगटत असे. त्यांनी कीर्तन सोहळे करून पुणे विद्यापीठातील संत ज्ञानदेव अध्यासनाच्या उभारणीसाठी प्रारंभिक काही लाखांचा निधी जमवून दिला. केवळ ईश्वराच्या भजन-पूजनातच दंग न राहता समाजसन्मुख वृत्तीने राष्ट्रीय कार्यासाठी पुढाकार घेऊन कार्य करण्याचा अनंतरावांचा स्वभावच होता. त्यांची प्रचंड ग्रंथ संपदा मराठी टीकावाङ्मयात व वैचारिक वाङ्मयात अढळ स्वरूपाची व वैैशिष्ट्यपूर्ण आहे. भगवद्गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे अशा प्रस्थानत्रयींवरील त्यांचे ग्रंथ, त्यांच्या उत्तुंग विद्वत्तेची व चिंतनाची साक्ष आहेत. संतकवी दासगणूंचे समग्र वाङ्मय त्यांनी दहा खंडांमध्ये प्रकाशित केले असून दासगणू चरित्र व काव्य विवेचनया ग्रंथाद्वारे त्यांनी दासगणूंच्या वाङ्मयाचे मराठी साहित्यातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित केलेले आहे.

इरावती कर्वे, आनंद साधले, शिवाजी सावंत, कुसुमाग्रज यांनी आपल्या प्रतिभा-विलासातून महाभारतातील व्यक्तिरेखांवर लेखन करताना केलेल्या विपर्यस्त व्यक्तिचित्रणाचा सडेतोडपणे समाचार घेण्यासाठी अनंतरावांनी महाभारताचे वास्तव दर्शन’  हे पुस्तक लिहिले होते. एवढेच नव्हे, तर जाहीर प्रतिवादाचेही आव्हान दिले होते. त्यांनी ज्ञानेश्वरी’, ‘मनाचे श्लोक’, ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘शिवमहिम्न’, ‘विष्णुसहस्रनामया विषयांवरही ग्रंथलेखन केलेले आहे. भारतीय जीवन-पद्धतीतील चार आश्रम व्यवस्थेचा (वर्णाश्रमधर्म) अनंतरावांना अभिमान होता. दासगणू यांना चतुर्थाश्रम म्हणजे संन्यास घेण्याची इच्छा होती; पण ती पूर्ण होऊ शकली नाही. गुरूची इच्छा अनंतरावांनी आपल्या कृतीतून पूर्ण करण्याचे ठरविले व ८ एप्रिल १९९१ रोजी उत्तरकाशी येथे महामंडलेश्वर विद्यानंद भारती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. उत्तरकाशी येथे त्यांनी मनुस्मृतीवर ११०० पानांचा ग्रंथ लिहिला आणि दि. ५ सप्टेंबर २००२ रोजी, श्रावण वद्य एकादशी दिनी शिष्यांसाठी-भक्तांसाठी एक संदेशकाव्य लिहून त्यांनी योगसाधनेद्वारा समाधी घेतली. त्यांच्या अंतिम निरोपाच्या संदेशकाव्यात ते म्हणतात :

मी म्हणजे ना शरीर । मी मद ग्रंथाचा संभार ॥

त्याचे वाचन चिंतन । यथाशक्ती आचरण ॥

हीच गुरुपूजा खरी । नीट धरावे अंतरी ॥

वद्य त्रयोदशीला त्यांचे पार्थिव विधिपूर्वक गंगार्पण करण्यात आले.

विद्याधर ताठे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].