Skip to main content
x

आठवले, शांताराम गोविंद

शांताराम आठवले यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. पितृछत्र लवकर हरपल्याने त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. उलट पुणे सोडून आईबरोबर त्यांना कोलवाडी या त्यांच्या वतनी खेडेगावात राहावे लागले.

त्यांचे वडील सरदार शितोळे यांच्या पुणे प्रांतातील जहागिरीचे व्यवस्थापक होते. शितोळ्यांच्या वाड्यात वारंवार होणार्‍या तमाशाच्या बैठकीमुळे त्यांना लावणीचा अस्सल मराठमोळा ढंग लहान वयात ऐकायला मिळाला. तसेच त्या वेळेच्या गाजलेल्या नाटक कंपन्या- गंधर्व, महाराष्ट्र यांची नाटके पाहायला मिळाली.

कोलवाडीच्या शांत, निरामय जीवनात ते रमले. तिथे वारकरी भजनी परंपरेशी त्यांची ओळख झाली. तेथील नैसर्गिक सौंदर्यामुळे त्यांना काव्यरचना करण्याची प्रेरणा मिळाली.  ते काव्यलेखन करू लागले. पण चरितार्थ कसा चालवावा, हा प्रश्न आ वासून उभा होता.  योगायोग असा की, पत्रव्यवहारामुळे ओळख झालेल्या ना. ह. आपटे यांनी शांतारामला त्यांचा छापखाना व ‘मधुकर’ मासिक ह्यांची व्यवस्था पाहण्यास बोलाविले नि प्रश्न सुटला. आपटे यांच्या ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभात कंपनीने ‘अमृतमंथन’ हा चित्रपट काढण्याचे ठरविले. तेव्हा आपट्यांनी गीत-लेखक म्हणून शांताराम आठवले ह्यांचे म्हणून नाव सुचविले. यानिमित्ताने त्यांचा प्रभातमध्ये प्रवेश झाला.  तिथे ते नुुसते स्थिरावलेच नाहीत तर यशाचा मार्ग चालतच गेले. ‘कुंकू’, ‘गोपालकृष्ण’, ‘तुकाराम’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी गीत-लेखन केले. त्यांची गीते सुरेल, सजीव व सौंदर्यसंपन्न होती. म्हणूनच एक उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला. प्रभात सोडल्यानंतर त्यांनी ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘वावटळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन स्वतंत्रपणे केले. ‘वावटळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.  १९६६ नंतर ते या क्षेत्रातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची लेखणी अध्यात्म, भारतीय तत्त्वज्ञान, गूढविद्या या विषयांकडे वळली. त्यांच्या पद्यरचनेचे ‘एकले बीज’ (१९३८), ‘बीजांकुर’ (१९४०), ‘चंदेरी लहरी’ (१९४७), ‘सुमन फळे’ असे चार संग्रह प्रसिद्ध आहेत. प्रारंभीची त्यांची कविता जातिवृत्तातील, अनलंकृत होती. चित्रपट गीतलेखनानंतर तिचे  स्वरूप पालटले. ‘संत तुकाराम’ चित्रपटातील ‘आधी बीज एकले’ हे त्यांचे गीत तुकारामांच्या अभंगाशी इतके मिळतेजुळते होते की अनेकांनी त्या गीताचा शोध तुकाराम गाथेत घेतला.

त्यांनी केलेले  गद्यलेखन बरेच आहे. प्रभात कंपनीत काम करीत असताना, त्यांनी कलेचे जे जग अनुभवले, तिथे ज्याचे-ज्याचे निरीक्षण केले, ज्या व्यक्तींच्या सहवासात ते आले; त्या सर्वांचे तटस्थ वृत्तीने, जाणिवेच्या पातळीवर रेखाटलेले ‘प्रभातकाळ’ (१९५०) हे विलक्षण हृद्य व चित्ररूप आत्मकथन आहे. आंतरिक जिव्हाळ्यामुळे ही कहाणी रसिक मनाची पकड घेते. अन्य लेखन परविद्येच्या साधन, संशोधन या विषयाशी निगडित आहे.  प्रभात कंपनीसंबंधी त्यांनी नोंदविलेल्या तपशीलाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.   

- शैलजा पुरोहित

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].