Skip to main content
x

अवधूत, निरंजन श्रीधरपंत

निरंजन रघुनाथ

    धारूर तालुक्यातील कळंब गावी निरंजन रघुनाथ यांचा जन्म झाला. कळंब हे वंजरा नदीच्या तीरावर आहे. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी होते. यांच्या घराण्यात गावचे कुलकर्णीपण होते. पण घरची गरिबी असल्यामुळे निरंजन पुणे येथे नष्टे नावाच्या हुंडेकर्‍यांकडे कारभारी म्हणून नोकरीस लागले. ते एकदा पुण्यातल्या विष्णु मंदिरात ठाकुरदास बाबांच्या कीर्तनाला गेले. त्या कीर्तनाचा प्रभाव पडून त्यांची वृत्ती पालटली. मन विरक्तीकडे झुकले. देहूला तुकोबारायांच्या स्मरणाने विरक्ती तीव्र होऊन इंद्रायणीचे पाणी हातात घेऊन, सूर्याकडे पाहून त्यांनी प्रतिज्ञा केली की, ‘‘आजपासून एक वर्ष सात दिवसांत सगुण साक्षात्कार झाला नाही, तर प्राणत्याग करीन.’’ तिथून ते अकोल्याला व पुढे नाशिकला आले. नाशिक येथे त्यांची रघुनाथ भटजी या सत्पुरुषाशी गाठ पडली. त्यांना कवित्वाची स्फूर्ती झाली.

पाच अभंग रचून त्यांनी ते सद्गुरू रघुनाथ भटजींना अर्पण केले. ‘दयाळा कृपाळा स्वामी दिगंबरा । कृपेच्या दातारा दीनबंधू ॥ संसाराचे संगे बहु कष्टी झालो । त्रितापे तापलो देहसंगे ॥’ या पंक्ती त्यांच्या मनातील बेचैनी व अस्वस्थता दर्शवतात. पुढे त्यांची साधना सुरू झाली. मुखी दत्तनाम घेत अन्न-पाण्यावाचून ते तीन दिवस भटकत घोडनगरीला आले व भिकोबा नावाच्या सत्पुरुषाकडे राहिले. त्यांनी दिलेली गोधडी व नरोटी घेऊन ते  ब्राह्मणवाड्यास आले. तेथे संस्कृत विद्वान व सत्पुरुष श्री चंडीरामबोवा यांच्याकडे राहिले. निरंजन यांची दत्तदर्शनाची ओढ तीव्र झाली. शेवटी त्यांना स्वप्न-साक्षात्कार झाला.

नाशिक येथे त्यांना गुरुलाभ झाला. रघुनाथस्वामींनी त्यांना बोध केला. सद्गुरूंनी योगातील अनेक रहस्ये, परमार्थातील अनुभव यांचा प्रत्यय आणून दिला. सद्गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. हाल-अपेष्टा सोसत, पायपीट करीत निरंजन गुजरातला आले. धर्मपूर या राजधानीत त्यांनी सात दिवस मुक्काम केला. बरीच काव्यरचनाही केली. गुरुदेवांना एक भावनामय पत्र देऊन ते गिरनारच्या परिसरात आले. गुरूने उपदेशिलेल्या सगुण ध्यानाचा क्रम तीन महिने चालला होता. गिरनारवर सर्व पवित्र स्थानांचे दर्शन घेऊन त्यांनी गिरीप्रदक्षिणा केली. उतावीळ मनाला स्वप्नातले ध्यान गोचर होईना. द्वारकेचे दर्शन घेऊन ते पुन्हा गिरनारवर पोहोचले. दत्तात्रेयांच्या पादुकांजवळ त्यांनी अन्नपाण्यावाचून तीन दिवस धरणे धरले, तरी दत्त दर्शन होईना. संकल्पाची मुदत संपत येत चालली. शेवटी एक मोठा पाषाण पादुकांजवळ ठेवून त्यावर डोके आपटून घेतल्यामुळे ते बेशुद्ध पडले. कोणीतरी उदक तोंडात घातल्याचा भास झाला व सावध होताच समोर दत्त महाराज सगुण रूपाने उभे दिसले. श्रीं नी त्यांच्या मस्तकावर प्रेमाने हात फिरवला. श्रीं नी स्वामींच्या अनुग्रहाचे मनन करण्यास सांगून निरोप घेतला. कपाळावर राहिलेली जखमेची खूण त्यांना सगुण साक्षात्काराची आठवण देई. तेथून निरंजन सोमनाथाचे दर्शन घेऊन नाशिकास गुरुचरणांजवळ येऊन पोहोचले. त्यांनी आत्मचरित्राचा उत्तरार्ध गोदातीरी, शके १८१२ मध्ये पूर्ण केला. ‘स्वात्मप्रचिती’, ‘साक्षात्कार’ ही दोन प्रकरणे लिहून त्यांनी ती सद्गुरूंना अर्पण केली. नंतर एका संक्रांतीस ब्राह्मण सुवासिनींकडून आपले घर लुटविले आणि पत्नी भगवतीबाई व मुलासहित ते तळवडे गावी राहिले.

मिरज संस्थानाचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांनी सन्मानाने बोलावून त्यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांचे चिरंजीव योगीराज यांना मठ बांधून दिला. तसेच, इनाम जमिनीची सनद करून दिली. १९३७ साली ‘निरंजन रघुनाथांचे ग्रंथ’ या नावाने गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झाले, त्यावरून त्यांच्या प्रतिभेची झेप दिसून येते. निरंजन रघुनाथ यांनी वेदान्तशास्त्राचे गंभीर अध्ययन करून आख्याने, पदे, अभंग, आरत्या, गोंधळी, कटिबंध वगैरेंचे लेखन केले. स्वामींचे नातू वामन रामकृष्ण यांच्या हातची जून १९०२ ची एक यादी श्री. यशवंत कोल्हटकर (सांगली) यांना मिळाली ती अशी : १) ज्ञानेश्वरीवर टीका (गद्य), २) अमृतानुभवावर टीका (गद्य), ३) स्फु टपदे, साक्षात्कार व आत्मप्रचिती ही दोन प्रकरणे (पद्य), ४) गीतेवरील शांकरभाष्याची टीका (पद्य), ५) केनोपनिषद टीका (गद्य), ६) मांडुक्योपनिषद टीका (गद्य).

शके १८५५ च्या प्रारंभी निरंजन स्वामींनी संन्यास घेतला व त्याच सालच्या भाद्रपद शु. एकादशीस त्यांनी जलसमाधी घेतली. मिरजेचे श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन, रामचंद्र तात्या गोखले व गोविंदराज नाना पटवर्धन शास्त्री हे त्यांचे शिष्य होते.

 — वि.ग. जोशी

अवधूत, निरंजन श्रीधरपंत