Skip to main content
x

बाबा, पद्मनजी

     बाबा पद्मनजी यांच्या वडिलांचे नाव पद्मनजी माणिकजी होते. कासार जातीत जन्मलेल्या बाबा पद्मनजी यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. ३ सप्टेंबर १८५४ला धर्मांतर करून ते ख्रिस्ती झाले.

      बाबा पद्मनजी बहुप्रसव ग्रंथकार म्हणून ओळखले जातात. ते मराठी-ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक होते. आत्मचरित्र, चरित्र, कथा, कादंबरी, टीका, कोश, इतिहास, स्त्रीविषयक, शिक्षणविषयक, धार्मिक, स्फुट असे सर्व वाङ्मयप्रकार त्यांनी लिहिले. ‘उदयप्रभा’, ‘प्रभोदय’, ‘सत्यदीपिका’ (धाकटी व थोरली), ‘सत्यवादी’, ‘कुटुंबमित्र’, ‘ऐक्यदर्शन’ इत्यादी नियतकालिके चालविली. त्यांच्या प्रचंड ग्रंथसंपदेमुळे ते ख्रिस्ती वाङ्मयाचे ‘भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी नव्या समाजघडणीचे महत्त्व ओळखून समकालीनांपेक्षा वेगळे कार्य केले. ऐन तारुण्यात ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट होऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार श्रद्धापूर्वक केला. हिंदू धर्माचा व ख्रिस्ती धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला, शाळा चालविल्या, आयुष्यभर कर्मयोग अंगीकारला.

     ते शालेय जीवनापासून लेखन करीत असत. १८५१ पासून १८५४ पर्यंत त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली होती. दक्षिणा प्राईज सोसायटी त्राक्ट सोसायटीकडून त्यांना रोख बक्षिसेही मिळाली होती. लेखनाबरोबर मुद्रणाबाबतही ते साक्षेपी होते. वाचकांच्या सोयीसाठी पुस्तिकांनाही सूची जोडलेली असे. पुस्तके अधिकाधिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते जाहिराती करीत. प्रकाशनपूर्व सवलती जाहीर करीत असत.

     पद्मनजींची ‘यमुनापर्यटन’ ही मराठीतील आद्य सामाजिक कादंबरी मानली जाते. १९व्या शतकातील सामाजिक वास्तवाचे प्रत्ययकारी चित्रण, उत्कट व्यक्तिचित्रण, आत्मनिवेदन, संवाद, पत्रलेखन, कथन प्रसंगांतून केलेले स्वभाव रेखाटन; साधी, चटकदार व गोड भाषा; प्रौढ शैली, वेचक शब्दसंपदा ही कादंबरीची वैशिष्ट्ये सांगता येतील. महाराष्ट्रातल्या विधवांची त्या काळीही शोचनीय स्थिती होती, त्याचे हृदयद्रावक चित्रण या कादंबरीत आहे. काही समीक्षकांच्या मते, विधवांचा प्रश्न केवळ निमित्तमात्र असून ख्रिस्तीधर्म प्रचार व प्रसार हा मूळ हेतू असावा.

     १९८८ साली ‘अरुणोदय’ हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्रही महत्त्वपूर्ण आहे. आपण का व कसे ख्रिस्ती झालो, याचे वर्णन त्यात अंतर्भूत केले आहे. हिंदू धर्मातील रूढी, चाली-रीतींची कल्पना देत, हिंदू धर्मातील रूढिप्रिय समाजाचे जिवंत वर्णन ते करतात. ललित वाङ्मयक्षेत्रातला हा एक चमत्कार मानला जातो. ‘अरुणोदय’ हे ‘प्रसिद्धीचा प्रकाश’ लाभलेले असे अव्वल दर्जाचे मराठीतील पहिले आत्मचरित्र आहे.

     तत्कालीन जग, भोवताली वावरणारी व्यक्तिमत्त्वे, त्यांची मनोहारी शब्दचित्रे, तत्कालीन लोकसमजुती, प्रस्थे, धेंडे, लोकविलक्षण व्यक्ती, धर्म व नैतिकता यांची झालेली फारकत, मराठमोळी साधी भाषा, वाचकाला आपलेसे करण्याची हातोटी ह्या सार्‍या वैशिष्ट्यांमुळे ते जिव्हाळ्याचे आत्मकथन वाटते. त्यांचा आयुष्यक्रम म्हणजे सत्याचा शोध व ध्येयाची साधना वाटते.

     या आत्मचरित्राची इंग्रजी, जर्मन, चिनी या पाश्चात्त्य भाषांत तर तमिळ, तेलगू, बंगाली, उर्दू ह्या भारतीय भाषांत भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. हा तत्कालीन समाज, संस्था व व्यक्तींचे दर्शन घडविणारा ग्रंथ मानला जातो.

     पद्मनजींच्या लिखाणाचे ३ खंड प्रसिद्ध झाले आहेत.

     १. मुंबईच्या फ्री चर्च मिशनच्या शाळेत जाईपर्यंतचा १८४९ पर्यंतच्या नेपोलिअनची शकुनवंती, बोधनिबंध, वर्तमान पत्रातील फुटकळ लेखनाचा.

     २. १८५०-१८५४ फ्री चर्च शाळा ते ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापर्यंतचा स्त्रीविद्याभ्यास निबंध, हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध, व्यभिचारनिषेधक बोध, कुटुंबसुधारणा, सर्वसंग्रही उर्फ निबंधमाला, ५ निबंधस्वरूप पुस्तके, तत्कालीन जिव्हाळ्याच्या विषयावर निबंधलेखन करताना ख्रिस्तप्रणीत मानवतावादाचा पुरस्कार केला.

    ३. १८५५-१९०६ यमुनापर्यटन, सत्यदीपिका (धाकटी व थोरली) प्रभोदय, उदयप्रभा, सत्यवादी, ऐक्यदर्शक पत्रिका इत्यादी.

    पद्मनजींच्या बालपणीचा काळ हा देशातील नवजागृतीचा काळ होता. त्या काळातील ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, प्रभाकर वगैरे नियतकालिकांचा पद्मनजींवर प्रभाव दिसतो. लहानपणी रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप यांची पारायणे केल्याने श्रीधर कवींच्या सुबोध, सोज्ज्वळ, प्रसन्न शैलीचा प्रभाव त्यांच्या लेखनावर जाणवतो. पत्रलेखन हाही पद्मनजींचा विशेष असून त्यांनी आयुष्यभरात हजारो पत्रे लिहिली.

    वयाच्या ७५व्या वर्षी पद्मनजी यांचे निधन झाले. ख्रिस्ती लोकरत्न, नामांकित वीर पुढारी, मसलतीचा आधार, गरिबांचा आश्रय, बहुतांचा प्रेमळ मित्र या विशेषणांनी त्यांना संबोधले गेले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालान्त परीक्षेत जास्तीतजास्त गुण मिळवणार्‍या ख्रिस्ती विद्यार्थ्याला ‘बाबा पद्मनजी स्कॉलरशिप’ दिली जाते. 

    - प्रा. संध्या टेंबे

बाबा, पद्मनजी