Skip to main content
x

बाकरे, अलका

    मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात (१९९३-१९९४) आरंभी प्रपाठक म्हणून, आर. जी. भांडारकर संस्थेत प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख (२०००-२००२) म्हणून कार्य केलेल्या डॉ. अलका बाकरे यांच्या कार्याचा ८ सप्टेंबर २०११ रोजी महाराष्ट्र शासनाने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन उचित गौरव केला. संस्कृतबरोबर इतर विषयांतील त्यांचा अभ्यास उल्लेखनीय आहे. संस्कृतप्रमाणेच समाजशास्त्र या विषयातदेखील त्या अधिस्नातक पदवी प्राप्त आहेत. त्याशिवाय अर्धमागधी या प्राकृत भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. अद्वैत तत्त्वज्ञान ही त्यांची विशेष आवड आहे. १९६४पासून १९९३पर्यंत त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालयात व नंतर ऑक्टोबर १९९४ पासून २००२ पर्यंत मुंबई विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. आजतागायत त्यांचे अध्यापनाचे कार्य अखंड सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली असून तीन विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम सुरू आहे.

     अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा व अधिवेशने यांतून त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधांची यादी फार मोठी आहे. याशिवाय केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांतूनदेखील त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

     ईस्टर्न बुक लिंकर्स, दिल्ली यांनी ‘रिलिजन इन सोशल फ्लक्स अ‍ॅज सीन इन द मेन पुराणाज’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांच्या ‘अ‍ॅन इन डेप्थ स्टडी ऑफ व्हॅल्यूज रिफ्लेक्टेड इन संस्कृत रिलिजस वर्क्स’ या बृहत्संशोधन प्रकल्पाला विद्यापीठाच्या अनुदान आयोगातर्फे अनुदान प्राप्त झाले आहे. एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजन, हृषीकेश येथून प्रकाशित झालेल्या ज्ञानकोशात त्यांच्या अकरा लेखांचा समावेश आहे. याशिवाय आय.ए.एस. परीक्षेसाठी संस्कृतचा अभ्यासक्रम तयार करण्याकरता केंद्र शासनाने नेमलेल्या समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी पदभार स्वीकारला आहे. समाजात संस्कृतची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्कृतप्रेमींनी स्थापिलेल्या ऋतायन या संघटनेच्या त्या सचिव आहेत. या संस्थेतर्फे संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रतिवर्षी शालेय व महाविद्यालयीन पातळीवर संस्कृतमधून निबंध, वक्तृत्व, गीतगायन, कथाकथन व नाट्यस्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जात आहे.

     एकूण संस्कृत ग्रंथांवर आधारित कोणत्याही विषयाचे संशोधन करत असताना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांनी केलेला अभ्यास मौलिक व मार्गदर्शकही आहे.

डॉ. आसावरी बापट

बाकरे, अलका