Skip to main content
x

बाकरे, सदानंद कृष्णाजी

           चित्रकार, शिल्पकार, मुद्राचित्रकार, छायाचित्रकार, कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ, ज्वेलरी डिझायनर अशा विविध विषयांत गती असलेले सदानंद कृष्णाजी बाकरे हे ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’चे संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा (वडोदरा) येथे झाला.  त्यांच्या आईचे नाव नर्मदा ऊर्फ रमा असे होते. या मुलाचा अमावास्येच्या सायंकाळी जन्म झाला व जन्माला येताना हे मूल पायाळू असल्यामुळे त्याच्या भवितव्याबाबत खूप चर्चा झाली. प्रत्यक्षातही त्यांच्या संघर्षमय जीवनात अनेक स्थित्यंतरे घडली.

           त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील चिकित्सक हायस्कूलमध्ये झाले आणि १९३९ मध्ये त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. कलाशिक्षण घेत असताना त्यांच्या अभ्यासातील प्रगतीमुळे त्यांना तत्कालीन बहुमानाची ‘लॉर्ड हॉर्डिंग्ज’ शिष्यवृत्ती आणि ‘लॉर्ड मेयो’ सुवर्णपदक बहाल करण्यात आले. त्यांनी १९४४ मध्ये शिल्पकलेतील पदविका उच्च श्रेणीमध्ये संपादन केल्यानंतर त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टची सन्माननीय फेलोशिप देण्यात आली.

           वयाच्या विसाव्या वर्षापासूनच त्यांनी बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कलाप्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन पारितोषिके मिळवण्यास सुरुवात केली आणि १९४८ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रासाठी ‘स्व. रुस्तम सिओदिआ स्मृती’ रोख पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट शिल्पासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक अशी दोन पारितोषिके मिळाली. तसेच, त्याच वर्षी बाकरे यांच्या प्रयोगशील कामासाठी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी प्रेसिडेंट सर कावसजी जहांगीर’ रोख पुरस्कार देण्यात आले.

           त्यांनी एका कलाकृतीसाठी ‘सदानंद बाकरे’, तर दुसऱ्या कलाकृतीसाठी ‘सदासिंग’ अशी नावे प्रवेशिकेवर लिहिलेली होती. हे उघड होताच त्याबद्दल काहींनी नापसंती व्यक्त केली. पण पुढील काळात कलेच्या मूलतत्त्वांना मानणाऱ्या आणि कलाजगतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या बाकरे व त्यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’च्या मित्रांनी वास्तववादी भारतीय चित्रकलेच्या प्रवाहाची दिशा बदलण्यास हातभार लावला आणि भारतीय कला क्षेत्रात बंडखोरी करून कलेला आधुनिक वळण दिले. या नवनिर्मित पर्वाची मुहूर्तमेढ सन १९४७ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स् ग्रुप ’ या नावाने रोवली गेली. त्यात बाकरे यांच्यासह फ्रान्सिस न्यूटन सूझा, सय्यद हैदर रझा, कृष्णाजी हौळाजी आरा, मकबूल फिदा हुसेन आणि हरी अंबादास गाडे या चित्रकारांचा समावेश होता.

           सदानंद बाकरे यांनी १९५१ मध्ये लंडन गाठले. तेथे अर्थार्जनासाठी सुरुवातीच्या काळात त्यांनी कोळशाच्या खाणीत कामगार, रुग्णालयात वॉर्डबॉय, रेल्वे फलाटावरील हमाल, तर कधी शवगृहातील आणि दफनभूमीतील कामगार म्हणूनही कामे केली; पण यानंतर लंडनमधील उच्चायुक्त कार्यालयात ते काही काळ छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. याशिवाय ज्वेलरी डिझाइन, पुरातन वाद्यांची देखभाल व दुरुस्तीही ते करीत. पण हे सर्व करताना स्वत:मधील कलाकाराची संवेदना त्यांनी कधी मरू दिली नाही. त्यांच्या चित्र-शिल्पांमधूनही या संवेदनांची प्रचिती येत असे. विविध  माध्यमांत, विविध प्रकारे ते कलानिर्मिती करीत राहिले. चित्र आणि शिल्प दोन्हींवर बाकरे यांचे सारखेच प्रभुत्व होते.

           अमेरिका व ब्रिटन या दोन्ही देशांत त्यांना तेथील कायमस्वरूपी नागरिकत्व मिळत असूनही त्याचा स्वीकार न करता १९७४ मध्ये ते भारतात परतले. त्यांचा विवाह ‘डोरोथिया’ या कलाप्रेमी स्त्रीबरोबर १९५५ मध्ये लंडन येथे झाला. भारतात कोकण भागातील मुरुड-दापोली येथे आल्यानंतर त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक स्वप्ने तरळत होती. राज्यात कलेची, कलावंतांची आणि कलाशिक्षणाची उपेक्षा सदैव सुरू असल्याबद्दल त्यांना खंत वाटायची. मुरुड येथे अद्ययावत स्टूडिओ उभारावा, विद्यादानाचे कार्य करावे व परदेशात अवैध मार्गाने जाणाऱ्या दुर्मीळ भारतीय कलात्मक वस्तूंचे संग्रहालय करावे आणि कोकण जागतिक नकाशावर यावे हे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

           त्यांची देशात व परदेशांत अनेक प्रदर्शने झाली. यांत बॉम्बे आर्ट सोसायटी सॅलाँ(१९५१), वुडस्टॉक गॅलरी, लंडन (१९५८), गॅलरी वन, लंडन (१९५९), कॉमनवेल्थ इन्स्टिट्यूट, लंडन (१९६१), आर्ट गॅलरी ऑफ मि. रोथ, डेट्रॉइट, अमेरिका (१९६४), गॅलरी प्रायव्हेट बेल, स्वित्झर्लंड (१९६४), गॅलरी केमोल्ड, मुंबई (१९६५), निकोलस ट्रेड वेल गॅलरी, लंडन (१९६९ व १९७१), पंडोल आर्ट गॅलरी, मुंबई (१९६६) व जहांगीर आर्ट गॅलरी (२००२) यांचा समावेश आहे.

           याशिवाय त्यांची अनेक सांघिक प्रदर्शने झाली असून त्यांत प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप , मुंबई (१९४९), बाकरे, हुसेन, सोझा, गॅलरी पॅलेट, झुरिच, स्वित्झर्लंड, रोम व इटली (१९५३), फ्री पेंटर्स ग्रुप , गॅलेट्रिक आर. ग्रउझ , पॅरिस (१९५४), लंडनमधील न्यू व्हिजन ग्रूप (१९५६), वुडस्टॉक गॅलरी (१९५८), गॅलरी वन (१९५९), बिअर लेन गॅलरी (१९६०), कॉमनवेल्थ आर्ट एक्झिबिशन, नॉर्विच कॅसल म्युझियम , इंग्लंड (१९६०), ग्रँड पॅलेस डी चॅम्प्स एलिलिस, लि सलोन, पॅरिस, फ्रान्स (१९६१), फर्स्ट इंटरनॅशनल एक्झिबिशन ऑफ फाइन आर्ट , सायगॉन,  व्हिएटनाम (१९६२), ओ हाना गॅलरी मिक्स्ड ख्रिसमस एक्झिबिशन, लंडन (१९६३), प्लॅट्सबर्ग इंटरनॅशनल आर्ट फेस्टिव्हल प्लॅट्सबर्ग, अमेरिका (१९६४), मेअरमेड थिएटर, लंडन (१९६७), ‘द मॉडर्न्स इनॅग्युरल शो’, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई (१९९६) इथे भरलेली प्रदर्शने विशेष महत्त्वाची आहेत. या प्रदर्शनातील सदानंद बाकरे यांच्या प्रयोगशील चित्र- शिल्पांनी नेहमीच कलारसिक व कलासंग्रहकांचे लक्ष वेधून घेतले.

           लंडन येथे १९५५ मध्ये झालेल्या बाकरे यांच्या चित्रप्रदर्शनामुळे डोरोथिया ही जर्मन मुलगी त्यांच्या प्रेमात पडली व ते ७ जुलै १९५५ रोजी विवाहबद्ध झाले. सदानंद बाकरे हे एक मनस्वी कलाकार होते. मात्र ते दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाची शिकार झालेले होते. लग्नानंतर कधी-कधी ते रात्री-अपरात्री या आजारामुळे  आक्रमक होत व घरातील सामानाची मोडतोड करीत. एवढेच नव्हे, तर स्वत:ची शिल्पे-चित्रेही तोडत असत. त्यांच्यावर लंडनमधील मानसोपचारतज्ज्ञांनी उपचार केले, पण व्यर्थ. अखेरीस पति-पत्नी दोघेही लंडन सोडून भारतात मुरुड येथे आले. अधूनमधून त्यांचे खटके उडत. यातून त्यांचे वाद विकोपाला गेले. शेवटी डोरोथिया १९८३ मध्ये पुन्हा जर्मनीला गेल्या. ही त्यांच्या जीवनाची शोकांतिकाच झाली.

           यानंतर बाकरे यांनी ‘वधू पाहिजे’ अशा स्वरूपाच्या जाहिराती मुंबईतील वर्तमानपत्रांत दिल्या. त्या जाहिरातींना डॉक व्ह्यू, बेलार्ड इस्टेट येथे राहणार्‍या मथिल्डा फुर्टाडो यांनी प्रतिसाद दिल्यानंतर ७ सप्टेंबर १९९० रोजी बाकरे व फुर्टाडो यांचा विवाह झाला. परंतु मथिल्डा फुटार्डो त्यांच्या संपत्तीकडे डोळा ठेवून असल्याचा बाकरेंना सतत संशय येई व त्यामुळे त्यांचे नेहमी वाद होऊ लागले. हा विवाहदेखील फार काळ टिकू शकला नाही व शेवटी श्रीमती फुर्टाडो त्यांना सोडून गेल्या.

           दि. १८ डिसेंबर २००७ रोजी रात्री सुमारे साडेदहा-अकराच्या दरम्यान बाकरे यांना विलक्षण धाप लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. ते शेजाऱ्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शेवटपर्यंत त्यांचे शब्द ओठांपर्यंत पोहोचलेच नाहीत आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची खबर स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मृत्यूची नोंद ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून केली. बाकरे यांनी मृत्यूनंतर आपल्या देहाला भारतीय पद्धतीने अग्नी न देता पाश्‍चिमात्य पद्धतीने देहाचे दफन सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या आवारात करावे अशी  इच्छा व्यक्त केली होती. परंतु काही कायदेशीर अडचणींमुळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यांच्या स्थावरजंगम मालमत्तेसाठी त्यांची प्रथम पत्नी डोरोथिया, सुजाता सुचांती (सॉमएट ल्युमिए आर्ट गॅलरी, मुंबई), अनिल लक्ष्मण देवधर (पुणे), मिलिंद वसंतराव लिंबेकर (नागपूर) व सलवा अताउल्ला तिसेकर ऊर्फ खोत (दापोली) अशा चौघांनी त्यांच्याकडे असलेल्या बाकरेंच्या मृत्युपत्रांद्वारे हक्क सांगितला. बाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांनी मालमत्तेवर हक्क  सांगितला व न्यायालयात खटले दाखल झाले.

           याबाबत खटले सुरू असून अद्यापपर्यंत दाव्यांचा निकाल लागलेला नाही. मात्र दापोली परिसरात बाकरेंचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांच्यावर केलेल्या विषप्रयोगामुळे हा मृत्यू झाला असल्याच्या पत्राच्या प्रती दापोलीतील पत्रकार, पोलीस व न्यायालयाला एकाच दिवशी टपालाने प्राप्त झाल्याने खळबळ माजलेली होती.

           मुरुड येथील त्यांच्या घरात चित्र-शिल्पे, पुस्तके, महत्त्वाची कागदपत्रे, कारागिरीच्या वस्तू यांचा संग्रह आहे. नैसर्गिक कारणांमुळे नासधूस होऊ नये म्हणून श्री. मिलिंद वसंत लिंबेकर यांची रत्नागिरी न्यायालयामार्फत दि. ३ मे २००८ रोजी नेमणूक करण्यात आलेली आहे. सुजाता सुचांती यांच्याकडे असलेल्या मृत्युपत्रामध्ये मान्यवर कलाप्रेमींचे एक विश्‍वस्त मंडळ नेमण्यात यावे व त्या विश्‍वस्त मंडळाच्या आधाराने त्या निवासस्थानी एक कलासंग्रहालय उघडण्यात यावे व त्याचे संरक्षण करणे, जतन करणे इ. सर्व कामांचे अधिकार सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य प्रा.प्रकाश राजेशिर्के यांच्याकडे देण्यात यावेत, असे म्हटले आहे. निवासस्थानी असलेले सर्व प्रकारचे कलासाहित्य, हत्यारे इत्यादी सामान सावर्डेच्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात यावे अशा प्रकारची नोंद केलेली आहे, तर मिलिंद वसंतराव लिंबेकर यांच्याकडे असलेल्या मृत्युपत्रामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या कलाकृती, बँकेतील शिल्लक रोख रक्कम, दागिने इ. साहित्य त्यांना देण्यात यावेत व निवासस्थान आणि जमीन सलवा अताउल्ला तिसेकर ऊर्फ खोत यांना देण्यात यावी अशी नोंद करण्यात आली आहे. मिलिंद वसंतराव लिंबेकर मात्र स्व. बाकरे यांचा जन्म बडोद्याचा असल्यामुळे बडोदा (वडोदरा) येथे कलासंग्रहालय करण्याच्या विचारात आहेत. बाकरे यांच्या मुरुड येथील निवासस्थानाचे त्यातील कलासंग्रहासहित संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे अशी त्यांची पत्नी डोरोथिया बाकरे यांची मनीषा आहे. या सर्वच मृत्युपत्रांत ‘माझी व माझ्याकडे असलेली संग्रहित कोणतीही कलाकृती विकण्यात येऊ नये’, असे बाकरे यांनी आवर्जून नमूद केले आहे.

           बाकरेंच्या विक्षिप्त आणि संशयी स्वभावामुळे त्यांचे जवळचे नातेवाईक गेली अनेक वर्षे त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत करीत. आयुष्याच्या उत्तरार्धात ते मुरुड येथे त्यांच्या निवासस्थानी विजनवासात असल्यासारखे एकाकी जीवन जगत होते.  त्यांचे सर्व राहणीमान, लोकांशी वागण्याची पद्धत ही शेवटपर्यंत पाश्‍चात्त्यांसारखी होती.

           तजेलदार कांती, भव्य कपाळ आणि नैसर्गिक रंगांचे कृष्णधवल तपकिरी छटा असलेले लांबसडक, झुपकेदार केस, भरदार व दाट भुवयांखाली शोभून दिसणाऱ्या तेजस्वी नेत्रांवर लावलेली चष्म्याची सोनेरी फ्रेम, सरळ टोकदार चाफेकळी नाक, तर सतत सिगारेट ओढत असल्यामुळे थोडेफार काळे झालेले आणि पुढे आलेले ओठ, चेहऱ्याला शोभणारी कृष्णधवल फ्रेंचकट दाढी आणि सतत आपल्याच विचारात असतानासुद्धा असणारे चौफेर भान हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

           माध्यमाच्या अंगभूत गुणधर्माची क्षमता अजमावून पाहणे व तांत्रिक कौशल्याची परिपूर्णता अजमावत कलानिर्मिती करणे ही त्यांच्या प्रयोगशीलतेची मुख्य दिशा होती. म्हणूनच तंत्रज्ञानावर आधारित व त्रिमितीय स्वरूपाच्या जाणिवा त्यांच्या चित्र-शिल्पकलेत व विविध माध्यमांतील कलाकृतींत आढळून येतात.

           शिल्पातील त्रिमितीय वस्तुमान व त्याचे अवकाश हे चित्राप्रमाणे आभासात्मक नसून ते प्रत्यक्षात असते. शिल्पाकृतीतील भरीव आकाराबरोबर लहानमोठ्या पोकळ्या,  अंतर्वक्र, बहिर्वक्र आकार, शिल्पनिर्मितीतील प्रमाणबद्धता, तसेच वापरलेली तंत्र- कौशल्ये हे त्यांच्या शिल्पांचे वैशिष्ट्य होते. अमूर्त शिल्पांसोबतच व्यक्तिशिल्पांतही त्यांनी हे वैशिष्ट्य जपल्याचे दिसून येते. काँक्रीटमध्ये १९४६ साली केलेले त्यांचे ‘अॅक्रोबॅट’ हे अमूर्त शिल्प याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच चित्रकार कृष्णाजी आरा यांचे शिल्प घडवताना बाकरे यांनी चेहरेपट्टीचे मर्म शोधून कोठेही गोलाई न करता केवळ चौकोन, त्रिकोण, भौमितिक आकाररेषांच्या साहाय्याने आरांच्या रांगड्या स्वभावाचे गुणधर्म शिल्पात साकारलेले आहेत. प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे चहाते आणि युसिसचे तत्कालीन संचालक वेइन एम. हार्टवेल यांचे व्यक्तिशिल्पही असेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच बाकरे यांनी मातीचे गोळे लिंपत घडवलेले सर कावसजी जहांगीर यांचे व्यक्तिशिल्पदेखील त्यांच्या शिल्पकलेतील प्रयोगशीलतेची व प्रावीण्याची साक्ष देते. तसेच एकदा लंडन येथील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त कृष्ण मेनन हे लंडनबाहेर चालले असताना बाकरेही त्यांच्याबरोबर होते. त्यांनी प्रवासामध्ये असतानाच गाडीत त्यांच्या चेहर्‍याचे मातीमध्ये लहान आकारात मॉडेलिंग केले. त्यांचा प्रवास पूर्ण होताक्षणीच त्यांनी ते शिल्प मेनन यांना दाखवले. कृष्ण मेनन यांना ते खूप आवडले. बाकऱ्यांचा  शरीरशास्त्राचा अभ्यास उत्तम असल्यामुळे त्यांचा चेहरा शिल्पामध्ये अप्रतिम झालेला होता. प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या काळात बाकरे यांची प्रसिद्धी शिल्पकार म्हणून होती व भारतीय शिल्पकलेला आधुुनिक वळण देणाऱ्या सुरुवातीच्या शिल्पकारांमध्ये त्यांची गणना केली जाते. मात्र त्यांनी १९५३ पासून चित्रनिर्मितीवर अधिक भर दिला.

           त्यांच्या सर्व प्रकारच्या माध्यमांतील चित्रांमध्ये ठळक रेषा, विषयांचे वैविध्य, नवनवीन कल्पना, विविध प्रकारचे पोत, तजेलदार रंगसंगती, चित्रांमध्ये त्यांनी साधलेला त्रिमितीय आभास अशा प्रकारच्या त्यांच्या खास शैलीमुळे १९५० नंतरच्या भारतातील प्रयोगशील कलाजगतामध्ये त्यांनी स्वत:चे असे खास स्थान निर्माण केले. म्हणूनच १९६१ च्या कलाप्रदर्शनाबद्दल दै. ‘मँचेस्टर गार्डियन’मधील समीक्षणात अशी नोंद केलेली आहे, ‘पिकासोसारखी त्यांची चित्रे दिसतील; पण ती नक्कल नाही. बाकरे यांची चित्रे पिकासोच्या चित्रभाषेत निराळे काही सांगू पाहणारी आहेत. दोघा चित्रकारांना दृश्यरूपाबद्दल पडलेले प्रश्‍न सारखे असल्याने त्यांची चित्रे-शिल्पे एकमेकांसारखी दिसणारच.’ जगप्रसिद्ध ‘अॅस्थेटिक्स’ या पाश्‍चिमात्य मासिकाने १९५१ मध्ये बाकरे यांच्यावरील लेखात पुढील मत व्यक्त केले : ‘बाकरे हा असा खजिना आहे, की भारताने तो अत्यंत सुरक्षितरीत्या जतन केला पाहिजे.’ त्यांच्या कलाकारकिर्दीबद्दल महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला, तर बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबईने त्यांच्या या योगदानाबद्दल २००४ मध्ये एकशेबाराव्या वार्षिक कलाप्रदर्शनाच्या वेळी त्यांना ‘रूपधर’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. अशा प्रकारे आयुष्याच्या अखेरच्या काळात बाकरेंच्या कलाकर्तृत्वाला योग्य तो मान मिळाला.

 - प्रा. प्रकाश राजेशिर्के 

संदर्भ
कलाप्रदर्शन कॅटलॉग; प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रूप, मुंबई; १९४९. २. कॅटलॉग; महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, मुंबई;  १९९४.  ३. दि मॉडर्न्स, इनॅग्युरल शो; नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ; न्यू दिल्ली पब्लिकेशन ; १९९६. ४. कला प्रदर्शन कॅटलॉग; सॉम - एट - ल्यूमिए आर्ट गॅलरी, मुंबई; १९९७. ५. कॅटलॉग; दि बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई; एकशेबारावे अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शन;  २००४.  ६. आर्ट जर्नल; बॉम्बे आर्ट सोसायटी; २००८.
बाकरे, सदानंद कृष्णाजी