Skip to main content
x

बापट, दत्तात्रय रघुनाथ

           त्तात्रय रघुनाथ बापट यांचा जन्म चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागात गांग्रई येथे आजोळी झाला. घरी शेती नव्हती तरी मामांच्या समवेत तरुण वयापर्यंत काही काळ प्रतिवर्षी राहिल्याने प्रत्यक्ष शेतीचा त्यांना अनुभव घेता आला. बापट यांचे घराणे बेळगाव जिल्ह्यातील संकेश्‍वर येथील तुपाच्या व्यापारात असून त्यांचे बंधू हा व्यवसाय करतात. बापट यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरकारी व खासगी शाळेत झाले. ते १९४९मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. संकेश्‍वर येथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. कृषी विषयात पदवी घ्यावी असे जाणकाराने सूचित केल्यानंतर त्यांनी १९५०मध्ये धारवाड येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या वेळी उत्तर कर्नाटक हा मुंबई राज्याचा भाग होता. पुणे येथील कृषी महाविद्यालय व धारवाड येथील कृषी महाविद्यालय ही दोनच सरकारी महाविद्यालये होती. बी.एस्सी. (कृषी) हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम होता, पण त्यासाठी प्रथमवर्ष शास्त्र परीक्षा उत्तीर्ण असावे लागे. बापट हे १९५३मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी ऑनर्ससह उत्तीर्ण झाले. हे वर्ष दुष्काळी होते. त्यामुळे शेतकी खात्यात बंडिंग विभागात शिक्षित तरुणांची भरती सुरू होती. कृषी महाविद्यालयातील शेवटची परीक्षा देताना डॉ. बापट यांनी बंडिंग खात्यात काम करू असे लिहून दिल्यामुळे परीक्षा झाल्याबरोबर त्यांनी १० दिवसांचे बंडिंगसंबंधी प्रशिक्षण विजापूर येथे घेतले आणि पदवीधारक कृषी साहाय्यक पदावर कामाला सुरुवात केली. पुढे यथावकाश पदवी प्राप्त झाली आणि एक वर्षानंतर कुमठा संशोधन केंद्र व शाळा येथे त्यांची बदली झाली. शाळेत कृषी शिक्षण कानडीमध्ये होते. त्यात त्यांना फारसा रस वाटला नाही. मग १९५५मध्ये सहकार खात्यात सामुदायिक शेती संस्थामध्ये काम करण्यासाठी ते स्वत:हून प्रतिनियुक्तीवर गेले. हा बदल त्यांच्या जीवनात महत्त्वाचा ठरला. प्रथम मांजरी (पुणे) येथे प्रशिक्षण घेतल्यावर सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे सहकारी शेती संस्थेमध्ये त्यांची नियुक्ती झाली. ही संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने सुरू झाली होती. मात्र त्यातील निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे ती संस्था ‘ड’ वर्गात समाविष्ट केली गेली. तेथे सुधारणा करण्याची जबाबदारी डॉ. बापट यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे ते कर्मवीर भाऊराव यांच्या संपर्कात येऊन त्यांना चांगले सहकार्य लाभले. तीन वर्षांत या संस्था ‘ड’ वर्गातून ‘अ’ वर्गात आल्या. पीक सुधारणा, कुक्कुटपालन, खिलार वळूची उपलब्धता, मेंढीपालन हे उपक्रम त्यांनी या सहकारी संस्थांमार्फत सुरू केले. वैयक्तिक शेतीऐवजी गट शेती (ग्रूप फार्मिंग) पद्धतीने या संस्थांचा कारभार सुरू करून यशस्वी करण्यात आला.

           पुढे १९५८मध्ये ऊस विकास प्रकल्पासाठी बारामती येथे त्यांची बदली झाली. त्या वेळी नवीन उसांच्या जाती (को. ७४०, को. ६७८) व त्याचबरोबर दख्खन कॅनाल विभागात लांब धाग्याचा कापूस याबद्दल प्रसार करण्यात त्यांचा सहभाग होता. ते १९६०मध्ये कृषी-अधिकारी पदावर बढती मिळून पुणे येथील कृषी महाविद्यालयात गवत संशोधन विभागात संशोधक म्हणून आले. हा बदल त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला. गवताच्या जातींचे संशोधन करताना त्यांनी एम.एस्सी. (कृषी)ची पदवीही या संशोधनाच्या प्रबंधावर मिळवली. १९६४पासून संकरित ज्वारी/बाजरी याविषयी संशोधनास सुरुवात झाली, परंतु हे संशोधन यशस्वी होईल का, याबाबत शेतकी खात्यात साशंकता होती. त्यामुळे हे संशोधन करण्यास कोणी फारसे उत्सुक नव्हते. त्या वेळी डॉ. बापट यांना परभणी येथील तृणधान्य-विशेषज्ञ कार्यालयात ज्वारी-पैदासकार या पदावर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली.  डॉ. बापट यांच्यापूर्वी या पदावर काम करणारे यशस्वी झाले नव्हते. संकरित ज्वारी तयार करण्याकरता स्थानिक वाणापासून मादी वाण निर्माण करण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्याचबरोबर अखिल भारतीय पातळीवरील समन्वयित ज्वारी संशोधनात वरील मादीवाण व निरनिराळे नरवाण वापरून नवीन संकरित वाण निर्माण करणे व त्यांच्या चाचण्या घेणे हे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू केले. संकरित ज्वारी निर्माण करण्यासाठी मादी वाण व नर वाण यांची निर्मिती ही महत्त्वाची प्रक्रिया होती. त्यानंतर हे मादी व नर वाण वापरून शेतकऱ्यांच्या शेतावर संकर बीजनिर्मिती होत असे. त्यामुळे हे वाण तयार करणे व त्यातून संकरित वाण (सी.एस.एच. १,२,३,४ इ.) व त्यासंबंधी राज्यभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. भारताचे १९६५मध्ये पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. त्या वेळी अन्नधान्याची परिस्थिती बिकट होती. अन्नधान्यात विशेषत: ज्वारी पिकाबद्दल महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याची प्रतिज्ञा त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली. हे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा परिषदा,शेती खाते व शेतकरी यांनी अपार कष्ट घेतले. बीजोत्पादनामुळे जिरायती शेतकरीदेखील चार पैसे गाठीला बांधू लागला. या सर्व घडामोडीत डॉ.बापट यांचे महत्त्वाचे योगदान होते. पुढील तीन-चार वर्षांत ज्वारी पिकात महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला. बीजोत्पादनामुळे शेतकरी उत्साहित झाले, पण प्रमाणापेक्षा बीजोत्पादन जास्त झाले आणि हा सर्व खर्च महाराष्ट्र शासनाने विकास खर्च मानून ‘राइट ऑफ’ केला. परंतु एकंदर यंत्रणा जोमाने कामाला लागली. कोरडवाहू पिकातील सर्वप्रथम हरितक्रांतीची चाहूल या काळात लागली. पुढे १९७५ ते ८० या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात खरीप संकरित ज्वारी, बुटका गहू यांचे अनुक्रमे एक लाख व ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पथदर्शक प्रकल्प घेण्यात आले. त्यामुळे एक प्रकारचा उत्साह राज्याचे शेती खाते व त्याच वेळी स्थापन झालेली कृषी विद्यापीठे, जिल्हा परिषदा व शेतकरी वर्गात निर्माण झाला होता. संशोधनाच्या पातळीवर देशी ज्वारीच्या वाणामध्ये वंध्यत्व आणून चांगले संकरित वाण निर्माण होणे गरजेचे होते. त्यातही त्यांना यश येऊन पी.एस.एच. १ व २ हे संकरित वाण निर्माण झाले. पुढे मध्यम उंचीचा पी.एस.एच.-२ हा संकरित वाण भारतीय पातळीवर सी.एस.एच.-४ या नावाने १९७२मध्ये प्रसारित करण्यात आला.

           डॉ.बापट यांना १९६९मध्ये नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.त पीएच.डी. करण्याची संधी प्राप्त झाली. या संशोधनासाठी त्यांनी ज्वारी हाच विषय निवडला होता. त्यांनी १९७३मध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. या संशोधनामुळे त्यांना १०३६ अ, ३६ अ, ४२ अ इत्यादी निरनिराळे वंध्यवाण निर्माण करण्याची संधी मिळाली. खरीप ज्वारीचे उत्पादन जरी लक्षणीय वाढले असले तरी रब्बी ज्वारी, जी मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतली जाते, त्यात मात्र फारशी वाढ झाली नव्हती. संकरित वाणांची अनुपलब्धता हा त्यातील महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे या रब्बी ज्वारीसाठी नवीन संकरित ज्वारीचा वाण निर्माण होणे आवश्यक होते. या प्रयत्नाला यश येऊन सी.एस.एच.७ आर व सी.एस.एच.८ हे संकरित वाण पहिल्यांदाच रब्बीसाठी भारतीय स्तरावर प्रसारित झाले. त्यामुळे प्रचलित जात मालदांडी ३५-१ पेक्षा ३०-४०% अधिक उत्पन्न मिळाले. ‘सी.एच.एस. ८ आर’ काही लाख हेक्टरवर घेतला जात होता. त्याला चांगली किंमतही मिळत होती आणि भाकरीची चवही चांगली होती.

           रब्बी ज्वारी मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात असल्याने त्यामध्ये उत्पादनवाढीला बऱ्याच मर्यादा पडतात. संकरित वाण रब्बी ज्वारीसाठी निर्माण झाले तरी हे संकरित वाण निर्माण करण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे संकरित वाणाऐवजी सुधारित वाण निर्माण करण्याचे प्रयत्न जोमाने केले गेले आणि त्यातूनच ‘स्वाती’ हा वाण त्यांनी प्रसारित केला. हा वाण प्रचलित मालदांडी ३५-१पेक्षा २५-३०% जास्त उत्पादन देत होता. शिवाय कडब्याची प्रत चांगली होती. या नवीन वाणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला. रब्बी ज्वारी पिकामध्ये आणखी एक मर्यादा दिसून येते. ती म्हणजे या ज्वारीचे जवळजवळ ४०-६०% क्षेत्र हे उथळ ते मध्यम जमिनीचे आहे. या ठिकाणी सुधारित वाण यशस्वी ठरत नाहीत, कारण ज्वारीसाठी ओलावा कमी पडतो. अशा ठिकाणी स्थानिक परिस्थितीत तांबडी जोगडी किंवा बेदर जाती वापरतात. अशा उथळ जमिनीसाठी संशोधनातून त्यांना सिलेक्शन- ३ हा वाण निर्माण करण्यात यश आले.

           ज्वारी पिकात गोड ज्वारी (स्वीट सोरघम) हा प्रकार काही काळ लोकांचे लक्ष वेधून घेत होता. त्याच्यापासून रस काढून गूळ व काकवी तयार करण्याचे तंत्रदेखील डॉ. बापट यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले. त्यासाठी गोड ज्वारीचा एस.एस.व्ही.८४ हा वाण अखिल भारतीय स्तरावर प्रसारित करण्यात आला. तसेच हुरड्यासाठी वाणी नं. ७ हा वाण १९६७-१९६८मध्ये प्रसारित केला गेला होता. त्याची चव अप्रतिम होती. अशा प्रकारे ज्वारीच्या सर्व प्रकारांत डॉ. बापट यांचे संशोधन व विकासकाम आघाडीवर राहिले. १९८६-८७मध्ये खाद्यतेलाची टंचाई जाणवू लागली होती. या काळात ते वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख असताना मोहरीच्या जातींचा रब्बी हंगामात तुलनात्मक अभ्यास करून महाराष्ट्रातील बागायत भागात ‘सीता’ या मोहरीच्या जातीचे गुणन करून (९०-९५ दिवसांची) मुळा लाभ क्षेत्रात काही हजार एकर क्षेत्रात प्रसार केला. शेतकऱ्यांना एकरी ६-११ क्वि. (२-३ पाण्याच्या पाळ्या) उत्पन्न मिळून मोठा आर्थिक फायदा झाला व या अपारंपरिक पिकाखाली काही हजार हेक्टर क्षेत्र आले. ते १९८९-१९९२ या काळात म.फु.कृ.वि.त संशोधन संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत विविध योजना कार्यान्वित केल्या. त्यापैकी शेती पद्धतीवर संशोधन सुरू करण्यात आले. तसेच संकरित गायींच्या प्रजननाचे नवीन कार्य व पूर्वी सुरू असलेले कार्य पूर्णत्वास आणण्यात यश आले. या प्रयत्नातून गाईची त्रिवेणी जात प्रचलित करण्यात आली. त्यांनी १९९२मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यावरही कामाचा झपाटा कायम ठेवला. डॉ. ए.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सायंटिस्ट फोरम’ची स्थापना करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या फोरमने शेतकऱ्यांच्या शेतावर उत्पादनवाढीचे उत्तम कार्य केले. तसेच डॉ. बापट यांनी ‘मॅकनाइट फाऊंडेशनच्या’ आर्थिक साहाय्याने हरभऱ्यात घाटे अळी प्रतिबंधकता आणण्याच्या कार्यात मार्गदर्शक म्हणून काम केले. या कामाच्या निमित्ताने अमेरिकेतील कृषी विद्यापीठांना त्यांनी भेटी देऊन संशोधन कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत केली. या कार्याबरोबरच हिंद स्वराज्य ट्रस्टद्वारा आदर्श गाव योजना हा प्रकल्प  राबवला. तसेच महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी (चअउड) या संस्थेत १९९४पासून ते कार्यरत राहून तेथील अध्यक्षपदाची धुरा त्यांनी वाहली  .

           डॉ. बापट यांच्या संशोधन कामाची दखल घेऊन महाराष्ट्राच्या कृषी खात्याच्या शतकोत्सवात (१९८४) त्यांना कृषिभूषण पुरस्कार, सुवर्णपदक व रोख पारितोषिक दिले गेले. म.फु.कृ.वि., राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला आदींनी त्यांना विशेष पगारवाढ व सुवर्णपदक, गुणवत्ता प्रमाणपत्र इ. देऊन त्यांचा गौरव केला. त्याचबरोबर अ‍ॅस्पी मुंबई, वसंतराव नाईक प्रतिष्ठान व आर.सी.एफ. मुंबई यांनी सन्मानचिन्हे देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. बापट यांना इंडियन सोसायटी ऑफ प्लँट ब्रीडिंग व जेनेटिक्स यांनी सन्माननीय सभासद म्हणून गौरवले. याचप्रमाणे महाराष्ट्र अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसनीही त्यांची सभासद म्हणून निवड केली. ‘युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्री सायन्सेस, धारवाड’ येथे रब्बी ज्वारी संशोधक म्हणून शेतकर्‍यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी त्यांना आमंत्रित केले होते. ‘इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी, नवी दिल्ली’तर्फे  १९९९मध्ये प्रो. बी.डी. टिळक लेक्चर अ‍ॅवॉर्ड देऊन त्यांना गौरवले. जागतिक अन्न व शेती संघटना (एफ.ए.ओ.) रोम, इटली यांनी ज्वारी-पैदासशास्त्र व बीजोत्पादन याविषयीचा एक महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली विकसनशील देशातील संशोधकांसाठी राबवला होता.

           डॉ. बापट यांचे सुमारे १३५ संशोधनपर लेख व  शास्त्रीय माहितीवर आधारित अनेक लेख मराठीतून प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय नभोवाणी व दूरदर्शनवर त्यांच्या मुलाखती झाल्या असून विविध संस्थांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक  म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. व पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

बापट, दत्तात्रय रघुनाथ