बापट, नागेश विनायक
एकोणिसाव्या शतकात स्वधर्म, स्वभाषा व स्वदेश ह्यांविषयी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आणि त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटलेले आढळते. स्वधर्म, स्वभाषा व स्वदेश ह्या विचारांनी भारावलेल्या प्रथितयश साहित्यिकांत नागेश विनायक बापट हे अग्रभागी होते.
बापटांचा जन्म वाई येथे वेदशास्त्रसंपन्न कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण सातारा, वाई व पुणे येथे त्यांचे वडील विनायकशास्त्री व चंपूकार विठोबा अण्णा दप्तरदार यांच्याकडे झाले. त्यांनी सन १८५७मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पुना कॉलेज येथून पूर्ण केले. मुंबई प्रांतातील बेळगाव व धारवाड जिल्ह्यात त्यांनी डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून काम केले. त्या वेळच्या ब्रिटिश शासनाशी त्यांचा वाद झाल्याने पुढे त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी केली व तेथून सन १९०१मध्ये ते निवृत्त झाले.
बडोदे संस्थानचे अधिपती, महाराज सयाजीराव गायकवाड, हे गुणग्राही राजे होते. बापटांचे भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊन महाराज आपल्या प्रवासात बापटांना घेऊन जात असत व त्या प्रवासाचे सविस्तर वर्णन बापटांना लिहून ठेवण्यास सांगत. प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हणूनच बापटांचे वर्णन शब्दचित्रकार असे केले आहे. महाराजांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बडोद्याच्या वास्तव्यात बापटांकडून सकस साहित्य निर्माण झाले. सन १८७६ ते १९०१ ह्या काळात त्यांनी अकरा पुस्तके लिहिली. ऐतिहासिक विषयावर त्यांनी चरित्रे व कादंबर्या लिहिल्या. ते बहुभाषिक होते. त्यांना मराठी, इंग्रजी, गुजराती, कानडी व हिंदुस्थानी या भाषा येत आणि त्याचा उपयोग त्यांना समाजाभिमुक लिखाण करण्यासाठी निश्चितच झाला. पेशवाईचा अंत झाला होता व इंग्रजांचे बलाढ्य पण परके राज्य प्रस्थापित झालेले होते. लोकांचा आत्मसन्मान नाहीसा झाला होता. बापटांना प्रामाणिकपणे वाटे की आपल्याला प्रदीर्घ व प्रेरणादायी इतिहास आहे आणि त्यापासून आपण आपले आत्मबल वाढवले पाहिजे. आपली मातृभाषा समृद्ध आहे व त्या भाषेत लिखाण करून आपण लोकांना जागृत केले पाहिजे. देशभरचा प्रवास, विस्तृत वाचन आणि भाषेवरील प्रभुत्व यांमुळे त्यांना विश्वास वाटे की, आपण लोकजागृती करू शकू.
‘पहिले बाजीराव पेशवे’ (१८७८), ‘सरसवाक्यरत्नावली’ (१८८०), ‘दादोजी कोंडदेव’ (१८८२), ‘छत्रपति संभाजी महाराज’ (१८८४), ‘सुभद्राहरण’ (१८९२), ‘टिटवी’ (१८९४), ‘वत्त्कृत्व’ (१८९५), ‘लिकलेअरचे चरित्र’ (१८९६), ‘चितूरगडचा वेढा’ (१८९७), ‘पानिपतची मोहिम’ (१८९८), ‘महाराणी जमनाबाई गायकवाड’ (१९०१) ही त्यांनी लिहिलेली पुस्तके त्यांचा आत्मविश्वास किती यथार्थ होता, हेच दर्शवतात. ही सर्वच पुस्तके लोकप्रिय झाली व त्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या. त्या काळातील लोकमान्य समाजधुरिणांच्या प्रस्तावना व उत्तम अभिप्राय त्यांच्या पुस्तकांना मिळाले. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, प्रोफेसर भानु, कवठेकर इत्यादींचे उत्तम अभिप्राय त्यांना मिळाले. ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथाच्या संपादनात त्यांनी निर्णयसागर प्रेसला साहाय्य केले होते.