Skip to main content
x

बापट, रवींद्र दिनकर

रवी बापट

     भारतीय उपखंडात वैद्यकीय क्षेत्रातील ख्यातनाम मंडळींमध्ये जे आपल्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वामुळे ओळखले जातात, अशा डॉक्टरांच्या मांदियाळीत डॉ.रवी बापटांचे नाव आदराने घेतले जाते. एक निष्णात शल्यचिकित्सक, उत्कृष्ट शिक्षक, कर्तबगार प्रशासक, सर्व थरांतील रुग्णांना आधार वाटणारा डॉक्टर आणि कला, नाट्य, संगीत, यांबरोबरच सामाजिक कार्यात रमणारा संवेदनशील माण्ाूस, अशी ओळख असलेल्या डॉ. रवी बापटांचा जन्म पुणे येथे एका सुखवस्तू, सुसंस्कृत घरात झाला. त्यांचे आई-वडील, दोघेही डॉक्टर. वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या वेळोवेळी होणार्‍या बदल्यांमुळे त्यांचे शालेय शिक्षण बालाघाट, पुणे, अमरावती, वाशिम, छिंदवाडा, जगदाळपूर, अशा विविध ठिकाणी झाले.

     कुटुंबात आजोबा, आई-वडील व काका वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे, घरातील वातावरण वैद्यकीय व्यवसायाला पूरक होते. परंतु त्यांचा कल मात्र सैन्यात जाण्याकडे होता. त्यासाठी त्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए.) निवडही झाली; परंतु अंतिम शारीरिक चाचणी परीक्षेत रंगांधळेपणामुळे ते बाद झाले. त्यामुळे नाइलाजाने त्यांना आपला सैन्यात जाण्याचा बेत सोडावा लागला. मुंबईच्या रामनारायण रुइया महाविद्यालयातून इंटरची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण करून त्यांनी १९५९ साली जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेथे वैद्यकीय शिक्षणाबरोबरच त्यांनी क्रीडाक्षेत्रातही प्रावीण्य मिळविले. त्यांनी सात क्रीडा प्रकारांत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. बॅडमिंटन, टेनिस आणि हॉकी हे त्यांचे आवडते खेळ. बॅडमिंटनमध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पुरुषांच्या दुहेरी स्पर्धेत दोन वर्षे विजेता (चॅम्पियन) होण्याचा मान मिळविला. 

     १९६४  साली  त्यांनी  वैद्यकशास्त्राचा  (मेडिसीन) डॉ. के.डब्ल्यू. दाणी पुरस्कार मिळविला. त्याच वर्षी रोटरी क्लबचा सर्वोत्तम विद्यार्थी हा पुरस्कारही डॉ. रवी बापट यांना मिळाला. एम.बी.बी.एस. झाल्यानंतर एफ.आर.सी.एस.साठी परदेशात जाण्यासंबंधी ते द्विधा मन:स्थितीत होते. या संदर्भात सल्ला विचारण्यासाठी ते प्रख्यात सर्जन डॉ. सी.एस. वोरा यांच्याकडे गेले. योगायोगाने त्यांच्याच हस्ते त्यांना सर्वोत्तम विद्यार्थी हा पुरस्कारही मिळाला होता. डॉ. सी.एस. वोरांनी पुस्तकी पांडित्यापेक्षा सरावाला जास्त महत्त्व व त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा ज्याला जास्तीत जास्त अनुभव तोच चांगला सर्जन, हा मोलाचा सल्ला दिला आणि डॉ. रवी बापटांना योग्य दिशा मिळाली. आपल्या ग्ाुरूंच्या शिकवणीची महती त्यांनी वेळोवेळी अनुभवली.

     अत्यंत कर्तव्यनिष्ठ वडील आणि प्रागतिक विचारसरणीची, भारतीय संस्कृतीबद्दल नितांत आदर असणारी तत्त्वनिष्ठ आई, यांच्या संस्कारांमुळे भरपूर पैसा मिळवून देणार्‍या खाजगी व्यवसायापेक्षा सार्वजनिक रुग्णालयातील नोकरी करण्याचा निर्णय घेताना बापटांना फार विचार करण्याची गरजच भासली नाही.  

     पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्हीही अभ्यासक्रम ज्या जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी पार पाडले होते, त्याचीच त्यांनी कर्मभूमी म्हण्ाून निवड केली. तेथे साहाय्यक प्राध्यापक म्हण्ाून नोकरी करताना, शल्यचिकित्सेबरोबरच अध्यापनाचे कामही त्यांनी केले. अध्यापनाच्या कामात त्यांना विशेष रुची होती. शिक्षकी पेशा मनापासून आवडत असेल, तरच त्या पेशात यावे, असे त्यांचे ठाम मत होते. एखादा विषय आपल्याला नीट समजला, तरच त्याची उकल सोप्या शब्दांत करणे शक्य होते व त्यानंतर तो विषय अत्यंत प्रभावीपणे आपण शिकवू शकतो, या सिद्धान्ताचे पालन त्यांनी आयुष्यभर अत्यंत काटेकोरपणे केले. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांचे अत्यंत लाडके बापटसर होते. अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रांत भाग घेणार्‍या  विद्यार्थ्यांना  ते रात्री ९ ते १२ या वेळात, अतिरिक्त तास घेऊन शिकवायचे.

      एखादा विकार समजावून सांगताना, त्या विकाराचा रुग्ण समोर ठेवून विकारांची लक्षणे, निदानाची पद्धत, विकारात निर्माण होणारी संभाव्य ग्ाुंताग्ाुंत, आणि त्या विकारावरील उपाययोजना, अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी प्रशिक्षण पद्धती म्हणजेच रुग्णसमीप चिकित्सालय (बेडसाइड क्लिनिक्स). वैद्यकीय शिक्षणाचा हा आत्मा. बापटांकडे किचकट रोगनिदानाचा मार्ग पद्धतशीर विश्‍लेषण करून सुकर करण्याचे असामान्य कसब असल्यामुळे, त्यांचे चिकित्सालय विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. आठवडाभर रुग्णकक्षाच्या कामात व्यस्त असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ते दर रविवारी चिकित्सालय घेत. त्यांच्या चिकित्सालयाचा लौकिक ऐकून मुंबईतील इतर वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थीसुद्धा त्यास आवर्जून उपस्थित राहत असत.

     अध्यापनाबरोबरच शल्यचिकित्सेमध्येही त्यांचे कसब वादातीत होते. शस्त्रक्रिया करताना त्यांनी आपल्यातला संशोधक प्रयत्नपूर्वक सतर्क ठेवला होता. त्यामुळेच, पारंपरिक उपचारपद्धतीत वा शस्त्रक्रियेच्या पद्धतीत परिवर्तनाची शक्यता पडताळून पाहण्याचे विचार त्यांच्या मनात सतत घोळत असत. स्वादुपिंडाच्या संदर्भातील प्रचलित शस्त्रक्रियेला सोपी, कमी जोखमीची; परंतु अत्यंत शास्त्रश्ाुद्ध अशी पर्यायी  शस्त्रक्रिया त्यांनी प्रचलित केली. तिला आता ‘बापट प्रक्रिया’ (बापट्स प्रोसिजर) म्हणतात. अंशत: बारीक, निमुळत्या झालेल्या अन्ननलिकेला रुंद करण्याच्या नेहमीच्या पद्धतीमध्ये त्यांनी सुचविलेली नवीन पद्धत ‘बापट विस्तृतीकरण’ (बापट डायलेटर) या नावाने ओळखली जाते. अनेक किचकट शस्त्रक्रियेमध्ये केलेले यशस्वी प्रयोग त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर केले.

     रुग्णांवर उपचार करताना सर्वांत महत्त्वाचे असते ते  रुग्णाचे हित, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या या वृत्तीमुळे के.ई.एम. रुग्णालयात येणार्‍या समाजाच्या सर्व वर्गातील रुग्णांना त्यांचा मोठा आधार वाटत असे. जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्वसाधारण शस्त्रक्रिया विभाग, तसेच जठरांत्र शल्यचिकित्सा सेवा विभागाचे ते प्रमुख होते. के.ई.एम. रुग्णालयामध्ये आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ग्ाुळवेलीवरील संशोधनाला त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करून आयुर्वेदिक संशोधनाबद्दल आधुनिक वैद्यकशास्त्राला गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रवृत्त केले. देशांतर्गत असलेल्या ज्ञानाच्या भांडाराकडे दुर्लक्ष करून परदेशी संशोधनाचे गोडवे गाण्याच्या वृत्तीचा त्यांना मनस्वी तिटकारा आहे.

      बापटांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलग्ाुरू, हाफकिन जीव औषध महामंडळाचे अध्यक्ष, टाटा स्मारक संस्थेच्या नियामक मंडळावर महाराष्ट्र शासनाचे नियुक्त प्रतिनिधी, अशा विविध प्रतिष्ठित पदांवर काम केले. बापटांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये १२३ शोधनिबंध लिहिले आणि १०२ संशोधनात्मक कार्ये सादर केली. त्यांनी केलेल्या शास्त्रीय लिखाणांमध्ये ‘कंपॅनियन टू सर्जिकल पॅथॉलॉजी’ आणि ‘आर्ट ऑफ सर्जिकल क्लिनिकल प्रेझेन्टेशन्स’ हे लेख विशेष उल्लेखनीय आहेत.

     त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. त्यांनी लिहिलेली ‘स्वास्थ्यवेध’ आणि ‘वॉर्ड नंबर पाच, के.ई.एम.’ ही त्यांची पुस्तके खूप गाजली. आपल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वामुळे समाजातल्या सर्व थरांत चहात्यांची प्रभावळ लाभलेल्या या कलंदर माणसाला, आयुष्यात मिळालेल्या सर्व मानमरातब आणि सन्मानांपेक्षा ‘के.ई.एम.चे डॉ. रवी बापट’ ही ओळख सर्वाधिक सुखावून जाते.

- डॉ. राजेंद्र आगरकर

बापट, रवींद्र दिनकर