बेडेकर, विश्राम चिंतामणी
विश्राम बेडेकर चित्रपटांकडे योगायोगाने ओढले गेले. बेडेकर मूळचे अमरावतीचे. त्यांनी ‘ब्रह्मकुमारी’ हे नाटक लिहिले आणि बलवंत संगीत मंडळींना ते देण्यासाठी पुण्याला आले. ‘बलवंत’चे एक मालक चिंतामणराव कोल्हटकर (दुसरे मालक मा. दीनानाथ मंगेशकर) यांना भेटले. चिंतामणरावांना लेखकांची पारख चांगली होती. त्यांनी ‘ब्रह्मकुमारी’ बळवंतसाठी बसवले. संगीत नाटकाचा तो काळ होता. स्वाभाविकच बेडेकरांना पदे लिहावी लागली. ‘विलोपिले मधुमिलनात या’ हे आकाशवाणीवर सतत लागणारे गाणे याच नाटकातले. १९३३ साली पुण्यात जूनमध्ये त्याचा पहिला प्रयोग झाला. याआधीच १९३२ मध्ये बोलपट सुरू झाल्याने मराठी नाटकांना झपाट्याने उतरती कळा लागली आणि १९३४ मध्ये दीनानाथ मंगेशकर व चिंतामणराव कोल्हटकर यांनी या नाटककंपनीचे ‘बलवंत पिक्चर्स’मध्ये रूपांतर करून सांगलीला स्टुडिओ उभारला. नाशिक, पुणे, कोल्हापूरनंतर सांगली हे मराठी चित्रपटाचे केंद्र झाले. स्टुडिओ उभारला, पण ‘बलवंत पिक्चर्स’मध्ये चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण व अनुभव कोणालाच नव्हता. त्यातल्या त्यात २५ वर्षांचे तरुण विश्राम बेडेकर यांनाच कोल्हटकर यांनी दिग्दर्शन व लेखन करायला सांगितले. पण कोणीच अनुभवी नसल्याने हा पहिला चित्रपट अयशस्वी झाला. १९३५ साली जेव्हा शांतारामबापूंसकट सर्व निर्माते पौराणिक किंवा फॅण्टसी चित्रपट काढत होते, तेव्हा बेडेकरांनी ‘सत्याचे प्रयोग व ठकीचे लग्न’ असा दुहेरी रेषेत जाणारा मराठीतला पहिला सामाजिक आणि विनोदी चित्रपट काढला. ‘सत्याचे प्रयोग’ची कथा चिं.वि. जोशी यांची, तर ‘ठकीचे लग्न’ ही कथा राम गणेश गडकरी यांची होती. त्यातील ‘सत्याचे प्रयोग’मध्ये तीन गाणी होती, पण ‘ठकीचे लग्न’मध्ये एकही गाणे नव्हते. ‘चिमणराव’ व ‘तिंबूनाना’ या दोन्ही भूमिका दामूअण्णा मालवणकर यांनी केल्या. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्या सामाजिक विनोदी चित्रपट निर्मात्याचे स्थान बेडेकर यांचेच आहे. या चित्रपटाचे ध्वनिलेखन इतके सुमार झाले होते, की संवाद नीट ऐकू येत नव्हते. हाही चित्रपट अयशस्वी झाला. ‘बलवंत पिक्चर्स’ संपली. पण बेडेकर यांनी ‘बेडेकर प्रॉडक्शन’ ही संस्था त्याच स्टुडिओत काढून १९३६ मध्ये ‘लक्ष्मीचे खेळ’ दिग्दर्शित केला. पण त्यातही स्टुडिओ तरला नाही, बंद पडला.
विश्राम बेडेकर पटकथेच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला निघून गेले. वर्षभरात परतल्यावर ‘प्रभात’ स्टुडिओत शांतारामबापूंचे साहाय्यक म्हणून राहिले. एक आव्हान म्हणून ‘शेजारी’ या चित्रपटाची पटकथा एक महिन्यात पूर्ण करून शांतारामबापूंना दिली. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनामुळे ‘शेजारी’ चित्रपट चांगलाच गाजला. चित्रपटात बेडेकर यांना मिळालेले हे पहिले यश. नंतर बाबूराव पेंढारकर यांनी त्यांना ‘नवहंस’साठी ‘पहिला पाळणा’ या चित्रपटासाठी बोलवले. लेखक-दिग्दर्शक बेडेकर यांचा हा चित्रपटही यशस्वी झाला. पण ‘नवहंस’साठी काढलेला, बेडेकर यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट ‘पैसा बोलतो आहे’ साफ कोसळला.
विश्राम बेडेकर यांना ‘प्रभात’ने बोलावले. ‘प्रभात’साठी त्यांनी ‘लाखाराणी’ हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. ‘लाखाराणी’त गुरुदत्त त्यांचे साहाय्यक होते. पण ‘लाखाराणी’ चालला नाही. ‘प्रभात’साठी बेडेकर यांनी ‘रामशास्त्री’ करायला घेतला. हा चित्रपट झाल्यावर मतभेद होऊन बेडेकर ‘प्रभात’ सोडून मुंबईत आले. फेमस पिक्चर्ससाठी त्यांनी ‘चूल आणि मूल’ दिग्दर्शित केला. त्यानंतर ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ दिग्दर्शित केला. दोन्ही चित्रपट यशस्वी झाले.
शांतारामबापूंसाठी त्यांनी ‘होनाजी बाळा’ या चिं.य. मराठे यांच्या नाटकावरून ‘अमर भूपाळी’ लिहिला. यानंतर विश्राम बेडेकर हिंदी चित्रपटांकडे आणि नंतर नाट्यलेखनाकडे वळले. त्यांचा हिंदी चित्रपटातील एक लक्षणीय चित्रपट म्हणजे ‘पिया का घर’. हा व.पु. काळे यांच्या ‘कुचंबणा’ या कथेवर आधारलेला चित्रपट पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटने निर्माण केला होता. तेथील विद्यार्थ्यांनीच त्यात भूमिका केल्या.
‘एक झाड दोन पक्षी’ हे बेडेकर यांचे आत्मचरित्र चांगलेच गाजले. मुंबई येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘मला पहिला कवी’ चित्रपटाच्या संकलनात भेटला इ. चित्रपटाचे अनेक संदर्भ दिले.
आयुष्याच्या अखेरीला सुधीर फडके यांच्यासाठी त्यांनी ‘सावरकर’ची पटकथा लिहिली. पण नंतर ‘सावरकर’ दुसऱ्याच पटकथेवर तयार झाला. पुढे पॉप्युलर प्रकाशनाने बेडेकर यांची ‘सावरकर’ची पटकथा पुस्तकरूपाने दोन भागात प्रकाशित केलेली आहे.
- सुधीर नांदगावकर