Skip to main content
x

बेर्डे, लक्ष्मीकांत पांडुरंग

     राठी चित्रपटसृष्टीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या अभिनेत्याची आवर्जून नोंद घ्यावी, असे नाव म्हणजे ‘लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे’. त्यांचा जन्म मुंबई येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाला. अंगभूत अभिनयगुणांमुळे त्यांनी शालेय जीवनात युनियन विद्यालयामध्ये लहान-मोठ्या नाटकांमधून अभिनयाची भरपूर बक्षिसे मिळवली. पाचवीच्या वर्गात असतानाच पु.ल. देशपांडे यांच्या ‘वयम् मोठम् खोटम्’ या नाटकात भूमिका केली. गिरगावातील गणेशोत्सवातून होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला.

     लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली ती मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांमुळे. १९७२ साली साहित्य संघात एक बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून पडेल ते काम केले. १९७९ पर्यंतच्या या कामाचा अनुभव हा त्यांच्या पुढच्या यशस्वी वाटचालीची नांदी ठरला. कारण साहित्य संघाच्या ‘अमृत नाट्यनारती’द्वारे त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यांनी १९८३ साली पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूरटूर’ या नाटकात प्रथम काम केले. त्यानंतर १९८९ साली ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ आणि ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. १९८२ ते १९९० या काळात रंगमंचावरील ते ‘सुपरस्टार’ होते. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ या चित्रपटातील अगदी लहान भूमिकेने चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली असली, तरी नायक म्हणून ‘हसली ती फसली’ या चित्रपटाने खरी सुरुवात झाली. पण दुर्दैवाने तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. १९८९ साली ‘लेक चालली सासरला’ या पहिल्या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. रंगमंचावरील आणि कॅमेऱ्यासमोरील सहज वावर आणि आत्मविश्वास असणारा हा हजरजबाबी कलावंत वीस दशके चित्रपटातील हास्यअभिनेता म्हणून हुकमी एक्का ठरला. नाटकांमध्ये मूळ स्क्रिप्टच्या बरोबरच उत्स्फूर्त संवादाची भर घालणे किंवा ‘अ‍ॅडिशन’ घेणे हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वैशिष्ट्य होते. शाब्दिक कोट्या करत, विनोदाचे अफलातून टायमिंग साधत अ‍ॅडिशन ही संकल्पना रुजवणारे, त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे कलाकार होते.

     अभिनयाबरोबरच लक्ष्मीकांत बेर्डे यांना संगीताची उत्तम जाण होती. ते एक उत्तम गिटारवादक तर होतेच, पण शब्दभ्रमकलाही (बोलक्या बाहुल्यांसाठी ओठांची हालचाल न करता शब्दोच्चार करण्याची कलाही) त्यांना अवगत होती. या कलेच्या माध्यमातून त्यांनी विशिष्ट आवाज आणि स्वरयंत्रावर ताबा मिळवला होता. अभिनयकलेला पूरक अशा कलांचा उपयोग करून घेत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन दशके स्वत:च्या नावाभोवती वलय निर्माण केले. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडी लोकप्रिय आणि हुकमी ठरली. त्यांनी महेश कोठारे यांच्या बहुतेक सर्वच चित्रपटांतून भूमिका केल्या. ‘धूमधडाका’ (१९८५), ‘थरथराट’ (१९८९), ‘दे दणादण’ (१९८७), ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८), ‘हमाल दे धमाल’ (१९८९), ‘गोडीगुलाबी’ (१९९१), ‘जनता जनार्दन’ (१९९८), ‘आपला लक्षा’ (१९९८), ‘खतरनाक’ (२०००), ‘आधारस्तंभ’ (२००३), ‘देखणी बायको नाम्याची’ (२००१), ‘पछाडलेला’ (२००४) असे एकंदरीत एकशे दोन मराठी चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. विनोदनिर्मितीसाठी डोळ्यांचा, विशिष्ट आवाजातील थोड्या बायकी स्वरातील आपल्याला ऐकू येणाऱ्या स्वगतांचा आणि मिमिक्रीचा प्रभावीपणे वापर केला. या खास शैलीमुळे ‘धूमधडाका’ या चित्रपटासाठी त्यांना ‘फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले. विनोदी आणि हलक्याफुलक्या भूमिकांबरोबरच अभिनयाचा खरा कस लावणाऱ्या भूमिकाही त्यांनी केल्या. डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘एक होता विदूषक’ (१९९२) या चित्रपटात ‘आबुराव’ या विनोदी नटाची शोकांतिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने जिवंत केली. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही, पण या आव्हानात्मक भूमिकेचे मराठी सिनेजगतात कौतुक झाले. स्वत:च्या अभिनय कारकिर्दीत स्वत:च्या आवाजाला विशिष्ट वळण देत, विनोदी भूमिकेसाठी केसाच्या कोंबड्याचा करून घेतलेला उपयोग, संवादाची खास लक्ष्मीकांत बेर्डे शैलीतील फेक, स्पष्ट शब्दोच्चार, चेहऱ्यावरील विनोदी विक्षेप यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘लक्षा’ जनमानसात रूढ झाला. चित्रपटांमध्ये विनोदी अभिनेता ही त्यांची प्रतिमा घट्ट झाली. एकाच प्रकारच्या भूमिकांचा ओघ त्यांच्याकडे सुरू झाला. व्यवसायासाठी लागणारा अभिनयातील वक्तशीरपणा, उत्स्फूर्तता आणि व्यक्तिमत्त्वातील प्रचंड ऊर्जा या बळावर त्यांनी विनोदी भूमिकांनाही न्याय दिला. पण काही मोजक्या भूमिका वगळता, अभिनेत्याला वाव मिळेल, अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत. विनोदी नट अशी लोकमान्यता मिळाल्यामुळे वैविध्यपूर्ण भूमिका हातून निसटल्याची खंतही त्यांना वाटत असे.

       मराठी चित्रपटात काम करत असताना हिंदी चित्रपटसृष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन तिथेही बेर्डे यांनी प्रवेश केला. मराठी चित्रपटात नायकाची भूमिका करत असताना हिंदी चित्रपटात दुय्यम भूमिका कशी स्वीकारायची? याविषयीचा किंतू मनात न ठेवता तिथेही त्यांनी भूमिका स्वीकारल्या आणि त्या समर्थपणे पार पाडल्या. १९८९ मध्ये सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या हिंदी चित्रपटात त्यांनी प्रथमच भूमिका केली ती ‘मनोहर’ नामक नोकराची. नायकाच्या भावनिक आणि कौटुंबिक चढउतारात त्याला साथ देणारा, प्रेक्षकांच्याही मनाचा ठाव घेणारा एक सहृदय माणूस या चित्रपटात उभा केला. ही भूमिका दुय्यम असली तरी अर्थपूर्ण होती. या हिंदी चित्रपटातील पदार्पणातच लक्ष्मीकांत हे नाव हिंदी सिनेसृष्टीतही नावाजले गेले. त्यांना या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. हिंदी चित्रपटांतून त्यांना याच धर्तीच्या भूमिका मिळत गेल्या. त्यांनी ‘गीत’ (१९९२), ‘गुमराह’ (१९९३), ‘हम आपके है कौन’ (१९९४), ‘क्रिमिनल’ (१९९४), ‘हमेशा’ (१९९७), ‘हम तुम्हारे है सनम’ (२००२), ‘साजन’ (१९९१), ‘बेटा’ (१९९२), ‘आरजू’ (१९९९), ‘अनाडी’ (१९९३), ‘हंड्रेड डेज’ (१९९१) अशा चौऱ्याऐंशी हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या. नाटकाशी असलेले त्यांचे बंध पुन्हा १७ वर्षांनी त्यांना रंगभूमीकडे घेऊन आले. ‘सर आली धावून’ या नाटकातील गंभीर भूमिका प्रेक्षकांप्रमाणे त्यांना स्वतःलाही भावली होती.

       मराठी चित्रपटातील नायिका रुही बेर्डे यांच्याबरोबर आणि त्यानंतर काही काळाने सहकलाकार प्रिया अरुण यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने ‘अभिनय आर्ट्स’ ही निर्मिती संस्थाही सुरू केली. नाटकांतून, चित्रपटांतून व मालिकांमधून लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव घराघरात पोहोचले होतेे व आजतागायत ते परिचित आहेत.

      वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी मूत्रपिंडाच्या विकाराने लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. बेर्डेंनी आपल्या कामाविषयी सतत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवत, स्वत:वर होणाऱ्या समीक्षेचा सारासार विचार केला. विनोदी अभिनेता म्हणून मिश्कील स्वभावाच्या, खिलाडू वृत्तीच्या, कामावर मनापासून निष्ठा असलेल्या या हरहुन्नरी कलावंताचा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ठसा उमटलेला आहे.

- नेहा वैशंपायन

बेर्डे, लक्ष्मीकांत पांडुरंग