Skip to main content
x

बेर्डे, रुही लक्ष्मीकांत

     प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यातून प्रेक्षकांसमोर नायिकेच्या रूपात अवतरलेल्या रुही बेर्डे या एक अतिशय देखण्या अभिनेत्री होत्या. कमलाकर तोरणे यांनी ‘आराम हराम आहे’ या चित्रपटातून रुही बेर्डे यांना नायिकेची भूमिका करण्याची संधी दिली. रुही बेर्डे यांच्यावर चित्रित झालेले ‘प्रेमवेडी राधा’ हे गीत आणि ‘आराम हराम आहे’ हा चित्रपट, दोन्हीही लोकप्रिय झाले.

      मराठी चित्रतारका म्हणून रुही सर्वपरिचित आहेत हे जरी खरे असले, तरी मनमोहन देसाई यांचा ‘आ गले लग जा’ हा रुही यांचा पहिला हिंदी चित्रपट होय. या चित्रपटात त्यांनी छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकातल्या भूमिकेमुळे रुही खर्‍या अर्थाने प्रसिद्धीच्या प्रकाशात सर्वप्रथम चमकल्या. अत्यंत सुंदर असल्यामुळे आणि अर्थातच जोडीला असलेल्या अभिनयक्षमतेमुळे रुही यांना या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. हे नाटक फार गाजले आणि अर्थातच रुही यांनीही आपले नाव प्रेक्षकांच्या मनावर पक्क कोरले. ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटक लिहिणाऱ्या मधुसूदन कालेलकर यांनी राजा ठाकूर यांना रुही यांचे नाव सुचवले आणि राजा ठाकूर यांनी त्यांना ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली.

     रुही यांचे ‘डार्लिंग डार्लिंग’ नाटक पाहूनच दादा कोंडके यांनी ‘पांडू हवालदार’ या चित्रपटासाठी त्यांची निवड केली होती. ‘आराम हराम आहे’ या चित्रपटामध्ये साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या तरुणीची भूमिका लक्षवेधी करणाऱ्या रुही बेर्डे यांनी ‘पांडू हवालदार’ या चित्रपटामध्ये घरातून पळून जाऊन मुकी असल्याचे नाटक करणाऱ्या तरुणीची भूमिका अतिशय सुंदर वठवली आहे.

     ‘सतीची पुण्याई’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘दुनिया करी सलाम’, ‘ओवाळिते भाऊराया’, ‘मामला पोरींचा’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘पांडू हवालदार’, ‘आ गले लग जा’ आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांना भावलेल्या रुही यांनी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी विवाह केला आणि त्या रुही बेर्डे झाल्या. त्यानंतर त्यांनी ‘एक फूल चार हाफ’, ‘डॉक्टर डॉक्टर’ असे मोजके चित्रपट केले. त्यानंतर मात्र त्यांनी चित्रपटांपासून दूर राहणेच पसंत केले.

     ‘आ गले लग जा’ या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुही बेर्डे यांची निवड खरे तर हृषीकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटासाठीदेखील केली होती; पण दुर्दैवाने रुही बेर्डे यांच्या हातून ही भूमिका निसटली. ‘गुड्डी’ चित्रपटाने रुही बेर्डे यांना जसा चकवा दिला, तसाच त्यांच्या आयुष्यानेही त्यांना चकवा दिला आणि त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट रसिकांमध्ये उरली, ती त्यांच्याप्रती हळहळ.

 - स्वाती प्रभुमिराशी

संदर्भ
१) टिळेकर महेश, 'मराठी तारका', प्रकाशक - महेश टिळेकर, पुणे; २००७.
बेर्डे, रुही लक्ष्मीकांत