बेत, रामकृष्ण व्यंकटेश
रामकृष्ण व्यंकटेश बेत यांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथेच झाले. त्यानंतर त्यांनी बी. ए. ची पदवी प्राप्त केली आणि एलएल. बी. ची पदवी संपादन केली. त्यांना मराठी व इंग्रजीप्रमाणे हिंदी व तेलगू भाषाही ज्ञात होत्या. रामकृष्ण बेत यांनी महत्त्वपूर्ण राजकीय व सामाजिक कार्य केले. तसेच सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्यही उल्लेखनीय आहे. ते औद्योगिक सहकारी बँकेचे संस्थापक होते व या बँकेचे ते 8 वे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. विणकर सहकारी संस्थेमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. 1946 ते 1949 या काळात रामकृष्ण बेत हे सोलापूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्यरत होते. 1949 मध्ये त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्षस्थान भूषविले. 1967 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर ते पुन्हा एकदा निवडून आले. विधानसभेवर निवडून आल्यावर ते लोकलेखा समिती व अंदाज समिती या समित्यांचे सदस्य या नात्याने काम पाहत होते.
1972 पासून बेत विधानसभेचे उपसभापती म्हणून नियुक्त झाले. 25 फेब्रुवारी 1976 या दिवशी त्यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. सहकार राज्यमंत्री असतानाही त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
बेत यांना क्रिकेटची आवड होती. नाटके पाहणे, संगीत ऐकणे हे त्यांचे विशेष छंद होते.
- संपादित