Skip to main content
x

बगे, आशा अरविंद

          राठी साहित्यात कथा-वाङ्मयात आशा बगे यांचे नाव एका वेगळ्या परिमाणाच्या कथा लिहिणार्‍या लेखिका म्हणून स्थिर झाले आहे. आशा बगे यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव आशा वामन देशपांडे व त्यांच्या आईचे नाव कुसुम होते. आशाताईंचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील ‘न्यू इंग्लिश हायस्कूल (महाल) येथून तर महाविद्यालयीत शिक्षण लेडी अमृतबाई डागा कॉलेज येथे झाले. त्यांनी एम.ए.(मराठी) व एम.ए (संगीत) अशी पदवी प्राप्त केली आहे. उच्चमध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेल्या आशाताईंवर त्यांच्या आईचे व आजीचे विशेष लेखनाचे संस्कार झाले आहेत. त्यांच्याकडे नाटकाचे, कीर्तनाचे, संगीताचे वातावरण होते. संगीताचीही विशेष रुची असल्यामुळे आशाताई लहानपणापासून नाटकात काम करणे, एकांकिका सादर करणे, आकाशवाणीसाठी लिहिणे अशा गोष्टी करत. त्यामुळेच त्यांना लेखनासाठी नृत्य, नाट्य, संगीत याचा फायदा मिळाला. शिवाय संत वाङ्मयाचा अभ्यास आणि पंत काव्याचाही अभ्यास यांमुळे कथेची शैली घडत गेली. कविता ही त्यांची पहिली आवड आहे. कीर्तने, नाटके संगीत, माहेरी असणारी नोकर माणसे, वाडा यांतील माणसे भारतीय परंपरेतील सणवार यांच्या आसपासचे घडलेले अनुभव अधिक व्यक्त झाले आहेत.
       आशा बगे यांचे आत्तापर्यंत एकूण १२ कथा-संग्रह आणि ७ कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. ‘मारवा’ (१९८४), ‘अत्तर’ (१९८६), ‘पूजा’ (१९८९), ‘चंदन’ (१९९३), ‘मांडव’ (१९९३), ‘अनंत’ (१९९४), ‘दर्पण’ (१९९७), ‘निसटलेले’ (१९९९), ‘ऋतूवेगळे’ (१९९९), ‘पाणी’ (२००३), ‘पाऊलवाटेवरलं गावं’ (२००५), ‘प्रतिद्वंद्वी’ (२००५), ‘माझ्या कथा माझी निवड’ हे कथा-संग्रह आणि- ‘मनस्विनी’ (१९७९) ‘झुंबर’ (१९८४), ‘त्रिदल’ (१९९४) ‘धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे’ (१९९६), ‘सेतू’ (२०००), ‘भूमी’ (२००४), ‘उत्सव’ (१९९४).
       १९६० नंतरची कथा ही नवकथेच्या वाटेनेच जाणारी आहे. याच काळात एक नवेच सामर्थ्य घेऊन आशा बगे यांची कथा पुढे आली. ‘मारवा’(१९८४) या पहिल्याच संग्रहाने सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले. समकालीन लेखिकांपेक्षा आशा बगे यांचे लेखन निराळे आहे. एका नव्या अस्तित्वाचे भान त्यांची कथा देते. आशय, अभिव्यक्ती आणि संगीताचे माध्यम या तिन्ही गोष्टींच्या एकसंध रसायनाने बगे यांचे अनुभवविश्व म्हणजे भारतीय परंपरेला समर्पित झालेल्या स्त्रीचे समृद्ध अनुभवविश्व आहे. भारतीय जीवनातले कर्मकांड, व्रतवैकल्ये, सण, उत्सव, कीर्तनादी गोष्टींचे भरपूर ज्ञान वारसापरंपरेने त्यांना लाभले आहे. भारतीय परंपरेचे निकोप रूप, ताजे व नूतन होऊन कसे अवतरू शकते, याची प्रचिती आशा बगे यांची कथा देते. सुखमय जीवनातही काट्यासारखे रुतणारे प्रसंग साकार करण्यात, तसेच निर्माण होऊन क्षीण होत जाणारे व लुप्त होणारे स्नेहबंध विलक्षण सूक्ष्मतेने चित्रांकित करण्याची किमया त्यांना साध्य झालेली आहे. जनाबाईच्या अभंगासारखी सहज निर्मळ शैली आणि काव्यात्मकतेतून उमटलेला निसर्ग, संगीतातून बुडून निघालेल्या स्वरअर्थाची उंची  आणि खोली व्यक्तवणारे सहजार्थी शब्द यांना बगे यांची कथा गर्भश्रीमंत झाली आहे.
     ‘मारवा’ या सुरुवातीच्याच कथेने ‘एक माणूस’ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. माणसामाणसांतील नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्वत्रच दिसून येतो. भावनिकपणा व संघर्ष या कथेने मुक्तपणे टिपले आहे. ह्या कथाविश्वातील माणसांचे त्यांच्या जीवन मूल्यांवर आणि श्रद्धेवर अपरंपार प्रेम आहे. ही माणसे आत्यंतिक प्रवृत्तीची आणि मानवी जीवनमूल्यांचा घट्ट धरून ठेवणारी आहेत, म्हणूनच कथेचे वेगळेपण नजरेत भरणे.
    कुठलीही विशिष्ट स्थिती घेऊन किंवा बैठक घेऊन बगे लिहीत नाहीत. अनुभवाच्या मागणीप्रमाणे लेखन, कधी लघुकथा, तर कधी दीर्घकथेकडे वळले. बगे ह्यांच्या कथांतील संवेदनशीलता पारंपरिक सांस्कृतिक व्यूहाचा एक घटक असल्यासारखीच आहे. अशा मूल्यव्यूहाशी व नैतिक आदर्शाशी एकरूप होऊन त्यांनी लेखन केले आहे. मात्र त्यांच्या कथेत पारंपरिक आदर्श स्त्री-प्रतिमेच्या गौरवाची, पूजनाचीच भूमिका आहे, असेही नाही. या कथानकाला स्त्रिया स्वतःची एक ओळख घेऊन एक अस्तित्व म्हणूनच समोर येतात. त्यामध्ये स्त्रीपूजनाची वा गौरवाची भावना नाही. स्त्री-प्रतिमा या पारंपरिक वाटल्या, तरी पुढे त्यांच्या नायिका जाणीवपूर्वक  बुद्धिमान, बंडखोर व खंबीर आणि तरीही, स्त्रीत्वाच्या मर्यादा न ओलांडणार्‍या दिसतात. बगे यांची विस्तारत जाणारी क्षितिजे व संस्कार यांतूनच त्या स्त्री-प्रतिमा निर्माण झाल्या आहेत. भारतीय संस्कृतीची नीतिमूल्ये सांभाळणारी ही कथा करमणूक करत नाही तर एक स्थायी स्वरूपाचा विचार देते. शेवटी मूल्यांना जपणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा-पुन्हा वाचकांच्या मनावर त्यांची कथा ठसवत जाते. मूल्यांना धक्का बसू नये अशी सतत धडपड असते. अनेक विसंगतींशी एक सुसंगत रूपच बघण्याचा त्यांचा कल हे त्यांच्या कथेचे सामर्थ्य आहे. बगे यांची कथा केवळ स्त्रीत्वाच्या अनुषंगाने जाणारी नाही. पुरुषाच्या मनातील सुहृदयता, त्यांचे अहंमन्य पुरुषी व्यक्तिमत्व, यांच्यातील सोशिकता, त्यांच्यातील संगीत-नाटकादी कलांतील गूढ चातुर्य या सार्‍या अंगांनी स्त्रीबरोबरच पुरुषाच्या अंतर्यामीचा शोध बगे यांची कथा घेते. विशेष म्हणजे गाढ जिव्हाळ्याची उत्कट साक्ष पटेल असा मोकळेपणा, आणि कथेतील अनुभवांशी असलेले नाते जिव्हाळ्याचे आहे. स्वत्वापाशी घेऊन जाणार्‍या, सहज सुंदर भावप्रवाहात अंतर्मुख रणार्‍या बगे यांच्या कथा म्हणूनच मराठी कथेवर वेगळी मुद्रा उमटवून जातात.
      बगे यांचे सामर्थ्य केवळ व्यक्तिचित्रणापुरतेच मर्यादित नाही, तर व्यक्तीच्या जीवनदर्शनाकडून अनंत अशा प्रश्नांचा वाटा शोधणारी त्यांची दृष्टीच खरी महत्त्वाची आहे. त्यांच्या चित्रणात कुठलाही अभिनिवेश नसतो. सुरांच्या आणि रंगांच्या माध्यमातून आलेल्या या कथा मानवी मनाच्या सुक्ष्मता पातळीला स्पर्श करणार्‍या आणि अभिव्यक्तीच्या एका अत्यंत हळुवार, तरल, तलम अशा भाषाशैलीचाही तो आविष्कार आहे.
      बगे यांच्या कथा वाचकाला अस्वस्थ करतात. याचाच अर्थ ती कथा बहुआयामी व प्रसरणशील शोध आहे. बगे यांचा एकूणच कथेतील अनुभव हा बहिर्मुख प्रकृतीच्या नसून अंतर्मुख प्रकृतीचा आहे. एकूणच मराठी कथेत आशा बगे यांचे स्थान एका उंचीवर आहे. कथांमधील व्यक्ती, त्यांच्या अंतर्गत सुखदुःख भावभावना सकृतदर्शनी वैयक्तिक स्वरूपाच्या दिसत असल्या; तरी त्यांना सामाजिक परिमाण लाभले आहे.
    आशा बगे यांच्या कथांप्रमाणेच त्यांच्या कादंबर्‍याही व्यक्तिनिष्ठ आहेत. मोठ्या कॅनव्हासवर परिस्थिती, मानवी स्वभाव यांच्या क्रिया प्रतिक्रियांतून बदलत जाणार्‍या पात्रांच्या आयुष्याचे त्यातल्या गुंतागुंतीचे चित्रण त्या-त्या नायिका व नायक यांच्या व्यक्तिरेखांत दिसून येते. ‘भूमी’ची नायिका मैथिली हिचा बाह्य भौगोलिक प्रवासापेक्षा आंतरिक जाणिवेचा प्रवासच बगे यांना महत्त्वाचा वाटतो. अंतःस्थ स्वरूप आणि सर्जनशक्ती आणि एका अनाथ हट्टी मुलीचे, अत्यंत बुद्धीमान प्रतिभावंत, समंजस आणि आयुष्याला समजून घेणार्‍या एका प्रगल्भ व्यक्तीमध्ये रूपांतर होते, व्यक्तीचे भावविश्व कौटुंबिक सामाजिक वास्तव आणि जीवनाचे अंतिम स्वरूप या अंगांना सामावून घेणारी चिंतनशील कलात्म जीवनदर्शन ‘भूमीत’ होते. ‘मारवा’, ‘अत्तर’, ‘मांडव’ हे कथासंग्रह आणि ‘झुंबर’ ही कादंबरी ह्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार लाभले आहेत.
       महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार ‘भूमी’ या कादंबरीला मिळाला. तसेच २००६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. राष्ट्रीय पातळीवर खास कथेचा पुरस्कार ‘तुफान’ या कथेला १९९२ मध्ये आणि ‘पंख’ याला १९९५ मध्ये ‘चशशीं ींहश र्ईींहेी’ या कार्यक्रमात साहित्य अकादमीतर्फे सन्मान करण्यास आला. (२००४) विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी १९९१ साली भूषविले. त्यांच्या काही कथांचे अनुवाद तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली, इंग्लिश या भाषांतून प्रसिद्ध झाले आहेत.

- डॉ. सुलभा हेर्लेकर

बगे, आशा अरविंद