Skip to main content
x

बिडकर, संजीवनी

     ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट

      सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...’

      हे एकेकाळी अतिशय गाजलेले, सर्वांच्या तोंडी असलेले गाणे ‘ती मी नव्हेच’ या चित्रपटातले. याच चित्रपटातून संजीवनी बिडकर या रूपवान, नृत्यकुशल अभिनेत्रीचे रजतपटावर पदार्पण झाले. या पहिल्यावहिल्या चित्रपटात संजीवनी बिडकर यांना जीवनकला, राजा गोसावी, दामूअण्णा मालवणकर, गजानन जागीरदार, राजा नेने, रमेश देव अशा ताकदीच्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने संजीवनी बिडकर यांना ‘चित्रपट अभिनेत्री’ अशी ओळख मिळवून दिली.

      बीड जिल्ह्यातील हदगाव हे संजीवनी बिडकर यांचे मूळ गाव. त्या १९६४-६५च्या सुमारास मुंबईत आल्या. नृत्यकलेविषयी त्यांना उपजत आवड होती. चित्रपटात येण्यापूर्वी उत्तम नर्तिका अशी संजीवनी बिडकर यांची ओळख होतीच. रूपसंपदा, नृत्यनैपुण्य आणि अभिनयाचा संगम असलेल्या संजीवनी, मराठी चित्रपटात तोवर नव्याने सुरू झालेल्या ‘राम जोशी’, ‘जय मल्हार’ आदी चित्रपटांनी सुरू केलेल्या ‘तमाशापटां’वर न दिसत्या, तरच नवल.

      ‘ती मी नव्हेच’ या पहिल्या चित्रपटाने संजीवनी यांना ‘असेल माझा हरी’, ‘बाजीरावाचा बेटा’ व ‘अधिकार’ असे तीन चित्रपट मिळवून दिले. ‘बाजीरावाचा बेटा’ हा अमोल पालेकरांचा पहिला चित्रपट. राजा ठाकूर त्याचे दिग्दर्शक होते. संजीवनी बिडकर या चित्रपटात सहनायिका होत्या. या चित्रपटातले संजीवनी यांचे काम प्रेक्षकांना विशेष भावले.

      ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘चंद्र होता साक्षीला’, ‘देवापुढे माणूस’, ‘जोतिबाचा नवस’, ‘नेताजी पालकर’, ‘जिद्द’ या चित्रपटांमधूनही संजीवनी सहनायिका म्हणून दिसल्या. ‘जन्म हा तुझ्याचसाठी’ या चित्रपटामध्ये त्यांच्याकडे नायिकेची भूमिका आली. या चित्रपटात रमेश देव त्यांचे नायक होते. या व्यतिरिक्त ‘देवकीनंदन गोपाला’, ‘दिसतं तसं नसतं’, ‘ठकास महाठक’ हे चित्रपटही त्यांच्या नावावर जमा आहेत.

      संजीवनी यांच्या नृत्यनैपुण्यामुळे अनेक चित्रपटात त्यांच्याकडे नृत्याचेच काम प्रामुख्याने आले. ‘भोळीभाबडी’, ‘वर्‍हाडवाजंत्री’, ‘सामना’ इ. चित्रपट त्याचेच प्रत्यंतर देणारे. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ या चित्रपटाला १९७५ सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. बर्लिन महोत्सवातही हा चित्रपट पोहोचला. यात संजीवनी यांनी दोन नृत्ये साकार केली होती. या चित्रपटाद्वारे परदेशीही त्यांचे काम पोहोचले. श्री.ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या गाजलेल्या कादंबरीवरून १९८० साली त्याच नावाचा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटातले ‘चांदणं टिपूर’ हे शांता शेळके यांचे गाजलेले गीत संजीवनी यांच्या नृत्यासाठीही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. ‘सामना’तली ‘सख्या चला बागामदी’ ही संजीवनी यांनी साकारलेली लावणी आजही त्यांच्या नृत्यासाठी लोकप्रिय आहे.

     मराठी चित्रपटांबरोबरच संजीवनी यांनी हिंदी, गुजराती व भोजपुरी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. मराठी, गुजराती रंगभूमीवर आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही त्या लोकप्रिय झाल्या. ‘सख्खे शेजारी’, ‘सूर राहू दे’, ‘मृत्युंजय’, ‘मी मंत्री झालो’, ‘नाते युगायुगांचे’, ‘जंगली कबुतर’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ इ. नाटकांमधूनही संजीवनी बिडकर यांनी विविधतापूर्ण व्यक्तिरेखा साकार केल्या. संजीवनी बिडकर यांना केवळ ५५ वर्षांचे आयुष्य लाभले.

- स्वाती प्रभुमिराशी

बिडकर, संजीवनी