बियावत, रामनारायण नाथूजी
नाथूजी हरलालजी बियावत आणि पत्नी रामकुंवरीबाई या उदयपूर स्थित गरीब शेतकरी दाम्पत्याचे तिसरे अपत्य म्हणजेच पं. रामनारायण ऊर्फ मुखिया होय. शास्त्रीय संगीताचा काहीही वारसा नसलेल्या नाथूजींपाशी एक दिलरुबा (इसराज) होता. घराच्या ओटीवर बसून तिन्हीसांजेला ते भजने म्हणत व सोबतीला दिलरुबा वाजवीत.
नाथूजींचे गुरू गंगागुरू महाराजांकडे एक छोटी सारंगी होती. त्यांनी ती सारंगी नाथूजींना सुपूर्द केली. रामचे वय तेव्हा जेमतेम चार-पाच वर्षांचे असेल. एके दिवशी खेळता-खेळता रामचे लक्ष त्या सारंगीकडे गेले. ती सारंगीच त्याचे आवडते खेळणे होऊन बसली. रामला नाथूजींनी कुठल्या बोटाने कुठला सूर वाजवायचा, ते शिकविले. त्यांनी रामच्या सारंगी वादनाचा भक्कम पायाच घातला. राम सहा वर्षांचा झाल्यावर नाथूजींनी रीतिरिवाजाप्रमाणे रामला शाळेत घातले; परंतु शाळेच्या पहिल्याच दिवशी मास्तरांकडून छडीचा मार मिळाल्यामुळे त्याचे शाळेत जाणेच कायमचे बंद झाले. पंडित उदयलाल व पंडित गिरिधारीलाल या उदयपूरमधील दोन प्रमुख गुरूंकडे त्यांचे सारंगीचे शिक्षण सुरू झाले.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी छोट्या रामने पंडित सुखदेव प्रसाद यांना उदयपूरमध्ये सारंगी साथ केली. पदार्पणातच रामने अटकेपार झेंडे लावण्याची आपली मनीषा व क्षमता दाखवून दिली. पुढे त्याला पंडित महादेवप्रसाद महियरवाले यांचेही प्रदीर्घ मार्गदर्शन लाभले. त्याकरिता रामला उदयपूर सोडून तीन वर्षे त्यांच्याबरोबर जागोजागी फिरतीत घालवावी लागली.
वयाच्या सोळाव्या वर्षी रामने सारंगी वादनात चांगलेच प्रभुत्व मिळवले होते. तेव्हा पं. महादेवप्रसाद यांच्या शिफारशीवरून लाहोर स्थित उस्ताद अब्दुल वहीद खान यांच्याकडून पुढील मार्गदर्शन घेण्याकरिता मार्च १९४४ मध्ये उदयपूर सोडून रामचे लाहोरात आगमन झाले. लाहोर रेडिओ स्टेशनचे प्रमुख पं.जीवनलाल मट्टू यांनी रामनारायण यांची सारंगी ऐकली व त्यांना रेडिओ केंद्रावर नोकरी दिली. अवघ्या वीस वर्षांच्या पंडित रामनारायणने १९४७ पर्यंत अवघ्या लाहोर शहरातच नव्हे, तर पूर्ण पंजाबात आपल्या आगळ्या-वेगळ्या सारंगी साथीची छाप उमटवली.
फाळणीनंतर ते दिल्ली रेडिओ स्टेशनला आले. पंडित कृष्णराव शंकर पंडित आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर या दोन विद्वानांना पंडित रामनारायणसारख्या हिऱ्याचे मोल लक्षात आले. त्यांनी भरपूर प्रोत्साहन तर दिलेच; पण त्याबरोबरच सारंगी हे वाद्य एकलवाद्य म्हणून शास्त्रीय संगीतात प्रस्थापित करण्याचे बीज रामनारायणांच्या मनात रुजवले. अनेक अडचणींवर मात करीत १९६२-६३ पर्यंत पंडितजींनी सारंगीला फार उंच स्तरावर नेऊन ठेवले. यामागची प्रमुख कारणे म्हणजे, लहानपणापासून नाथूजींनी केलेले संस्कार आणि संगीत हे आध्यात्मिक असल्याचे मानणारे त्यांचे गुरू.
त्यांनी १९६४ साली तब्बल तीन महिन्यांकरिता युरोपचा दौरा केला. सोबत तबल्यावर साथीला त्यांचे वडीलबंधू पंडित चतुरलाल होते. युरोपातील तमाम संगीतप्रेमींनी पंडितजींची वाहवा केली. अगदी यहूदी मेन्यूइन व नादियाँ बुलोंझीसुद्धा पंडितजींचे चहाते झाले. त्यानंतर परदेशवाऱ्या सततच चालू राहिल्या. सारंगी व पंडित रामनारायण या द्वयीला अफाट लोकप्रियता, मान्यता मिळाली. परिणामस्वरूप पंडितजींची संगीतसभा जगभरातील सर्व संगीतसमारोहांचा अविभाज्य घटक बनत गेली. पं. रामनारायण यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९७५),कालिदास सन्मान (१९९१), ‘आय.टी.सी. एस.आर.ए.’ पुरस्कार (२००२), तसेच ‘पद्मश्री’ (१९७६), ‘पद्मभूषण’ (१९९१) व ‘पद्मविभूषण’ (२००५) आदी मानसन्मान प्राप्त झाले. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार (२०१५-१६) त्यांना प्राप्त झाला आहे. ‘एक सूर माझा आणि एक सूर सारंगीचा’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. पंडितजींनीही सरोदसारखे वाद्य आपल्या मुलाला, पंडित ब्रिजनारायण यांना शिकवले. मुलगी अरुणा व नातू हर्षनारायण या दोघांनाही त्यांनी उत्तम सारंगी वादक बनवले.