Skip to main content
x

बनसोडे, हिरा

     पूर्वाश्रमीच्या हिरा पुनाजी कांबळे यांचा जन्म तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील गराडे गावी झाला. त्यांचे वडील मिस्त्री काम करीत. वडिलांच्या मुंबईतील वास्तव्यामुळे शिक्षण मुंबईत झाले. त्या १९६२ साली एस.एस.सी आणि मधल्या प्रदीर्घ कालावधीनंतर १९८४मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी संपादन केली. काही काळ मध्य रेल्वेत नोकरी करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

     दलित असल्यामुळे त्या जीवनाचा जवळून अनुभव असल्याने त्यांची वैचारिकता फुले-आंबेडकर विचार आणि त्या चळवळीतील साहित्य यांवर पोसली गेली. विषमतेबद्दलचा हुंकार त्यांच्या कवितेतून प्रकटला. सुशिक्षित व लिहिणार्‍या दलित स्त्रियांतील पहिल्या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचे स्थान निश्चितच मोठे आहे. त्यांची जडणघडण प्राधान्याने कवयित्री म्हणूनच झाली आहे. प्रारंभीच्या काळात ‘अस्मितादर्श’, ‘सुगावा’, ‘युगवाणी’ इत्यादी दलित चळवळीला वाहिलेल्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यांचे कवितालेखनातील सातत्य कौतुकास्पद आहे.

     ‘पौर्णिमा’ आणि ‘फिर्याद’ या अनुक्रमे १९७० व १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या काव्यसंग्रहांतून एकूणच दलित स्त्रीचे वास्तव व्यक्तिमत्त्व साकार झाले आहे. त्यांच्या कवितेत प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेविरुद्ध प्रक्षोभ असला, तरी त्यांनी आपल्या न्याय्य हक्कांची मागणी करताना दलित स्त्रीच्या भावभावना नेमकेपणाने व्यक्त केल्या आहेत. नुसते काही मागायचे नाही, तर आपल्यालाही काही करायला हवे ही जाणीवही त्यांच्या कवितेतून प्रकटते. ‘सूर्य उजळू देत’ या १९८७ सालच्या कवितेत त्या म्हणतात, ‘जिथे जिथे सांडलेत तुझ्या रक्ताचे थेंब, तिथल्या मंगलभूमीत मी लावीत एकेक कविता, तुझ्या मुक्तीलढ्याची’ ही दुःखयात्रा संपवायलाच हवी, असा आत्मविश्वासपूर्वक उद्गार काढून त्या म्हणतात, ‘तुझ्या क्रांतिगीताचा पडघम वाजू लागलाय, आता आभाळाच्या नगार्‍यावर’.

     त्यांची कविता वास्तवापासून दूर न जाणारी, परिवर्तनाच्या दिशेने जाणारी आणि समतेच्या नव्या समाजाला आवाहन करणारी आणि वंचितांना आश्वासन देणारी आहे. त्यांच्या कविता अन्य भारतीय आणि जागतिक भाषांत प्रसिद्ध झाल्या असून ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’मध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे.

     - मधू नेने

संदर्भ
१.‘दलित साहित्य विशेषांक’; महाराष्ट्र साहित्य पत्रिका- ऑक्टोबर-डिसेंबर १९८७.
२. बनसोडे, हिरा; ‘फिर्याद’ (काव्यसंग्रह)
बनसोडे, हिरा