बोडस, शंकर श्रीपाद
शंकर श्रीपाद बोडस यांचा जन्म सांगलीत झाला. त्यांचे वडील श्रीपाद विष्णू बोडस हे एक हुशार, सुशिक्षित गृहस्थ होते. सांगलीतील गाडगीळ सराफांकडे हिशेबनीस असणारे श्रीपादराव त्या काळी बुद्धीबळपटू म्हणून नावाजलेले होते. आपल्या मुलांनी विधिवत शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. शंकर बोडसांना मात्र लहान वयापासून गायनाची रुची होती. बालगंधर्वांच्या नाट्यपदांचा प्रभाव त्यांच्यावर बालवयात होता. सांगलीतील सांबारे वैद्यांच्या घरी होणार्या मैफलींत त्यांनी उ. अल्लादिया खाँ साहेबांचेही गायन ऐकले होते व या संगीतश्रवणाचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव झाला होता.
एकदा पं.विष्णू दिगंबर पलुसकर सांगलीस आले असता त्यांनी शंकर बोडसांनी गणेशोत्सवात गायलेले ‘रामरंगी रंगले’ हे पद ऐकले व पलुसकरांनी त्यांस गायन शिकण्याबद्दल सुचवले, तेव्हा वडिलांच्या संमतीचा विषय आला. वडिलांनी त्यांस विद्यालयीन शिक्षण देण्याच्या अटीवर गाणे शिकण्यास संमती दिली. त्यानुसार पलुसकरांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन शंकर व लक्ष्मण या दोघा बंधूंस शिष्य म्हणून स्वीकारले. एका बाजूला पलुसकरांकडे ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण व दुसर्या बाजूस विद्यालयीन शिक्षण चालू झाले. त्यांचे गुरुबंधू बा.र.देवधर हे त्यांचे विद्यालयातीलही सहाध्यायी होते. दोघेही सांगलीच्या सिटी महाविद्यालयामधून इंटरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले.
पलुसकरांनी शंकर बोडसांना गायनासह स्वरलेखनपद्धती, तबला, सतार, जलतरंग, हार्मोनिअम या वाद्यांचे वादन व वाद्यदुरुस्तीही शिकवली. तसेच पलुसकरांना विविध वृत्तपत्रे, पत्रव्यवहार वाचून दाखवण्याचे कामही त्यांच्याकडे असल्याने त्यांना एकंदर व्यावहारिक दृष्टिकोन लाभला. बोडसांचेे १९१८ ते १९२६ अशी आठ वर्षे पलुसकरांकडे संगीत शिक्षण झाले.
कानपूर येथील १९२४ साली काँग्रेस अधिवेशनासाठी महात्मा गांधींच्या बोलावण्यावरून पलुसकर हे बोडस, कशाळकर व ठकार या आपल्या शिष्यांसह गेले होते. तेव्हा पलुसकरांच्या गायनाचा जनमानसावर होणारा विलक्षण परिणाम पाहून प्रभावित झालेल्या कानपूरच्या पी.पी.एन.महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक उत्तम शिष्य तेथील महाविद्यालयात संगीत शिक्षक म्हणून देण्याची पलुसकरांना विनंती केली. त्यानुसार १९२६ साली शंकरराव बोडस हे पं. पृथ्वीनाथ इंटर महाविद्यालयात रुजू झाले.
त्या काळात कानपूरमध्ये संगीताचे वातावरण नव्हते व कलाकारांस प्रतिष्ठा नव्हती. या वातावरणात बोडसांनी आपल्या सभ्य वर्तणूक व शिस्तशीर अध्यापनाद्वारे संगीतास अनुकूल वातावरण निर्माण केले. त्यांच्या अध्यापन कौशल्याने प्रभावित होऊन तत्कालीन इंग्रजी अधिकार्याने त्यांना बढती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात बोडसांनी प्रभातफेर्या सुरू करून त्यांतील देशभक्तिपर गीतांद्वारे स्वातंत्र्य चळवळीची ज्योत तेवती ठेवली होती.
शंकररावांचा १९२८ साली विवाह इचलकरंजीतील सावित्री जोशी यांच्याशी झाला. शंकररावांनी पत्नीस शालेय व सांगीतिक शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले आणि सावित्रीबाईंनी विवाहानंतर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत संगीतशिक्षणही घेतले. त्याही सुरेंद्रसेन बालिका विद्यालयात शिक्षिकेची नोकरी करू लागल्या. या दाम्पत्याने कानपूरसारख्या महाराष्ट्रापासून दूरस्थ ठिकाणी तेथील उर्दू, हिंदी व इंग्रजी भाषा आत्मसात करून जनसंपर्क साधला.
बोडसांनी विशेषत: प्राथमिक स्तरावरील मुलांसाठी संगीताची सुलभ, रंजक शिक्षणपद्धती तयार केली व तिच्याद्वारे संगीताचा प्रसार केला. बालकांना रागसंगीत शिकवताना त्याचे रूपांतर लहान चुटकुल्यात करून, बालसुलभ गीते व सरगमींच्या आधारे त्यांना रंजक वाटेल अशा पद्धतीने ते रागसंगीताचे पाठ देत. त्यासाठी त्यांनी अनेक संगीतरचना, धुनी, बंदिशींची रचना केली. स्वरांच्या स्वाभाविक भावाभिव्यक्तीशी कुणा मुलांचे स्वभाव, घटना, कथावस्तू यांचा मेळ घालून ते सुगम रितीने स्वरज्ञान देत. शालेय कवायतीची जोड देऊन दुगुन, तिगुन, चौगुन अशी लयकारी ते मुलांना सहजपणे शिकवत.
वयाच्या सत्तरीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत ते संगीत शिक्षणाचे कार्य अथकपणे करत. शंकरराव बोडस हे संगीत शिक्षणाच्या कार्यात पूर्णपणे झोकून दिल्याने मैफलीचे कलाकार होऊ शकले नाहीत, मात्र त्यांचे गायन मैफलीच्या दर्जाचे होते. ख्यालासह भजन, देशभक्तिपर गीते ते प्रभावीपणे गात. त्यांच्या गायनाची एक ध्वनिमुद्रिका तेव्हाच्या मॅक्सिटोन कंपनीने काढली होती. ते उत्तम वाग्गेयकारही होते. त्यांनी काही काळ विख्यात नृत्यकलाकार उदय शंकर यांच्या चमूत संगीतकार विष्णूपंत शिराळी यांचे सहायक-संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक भजने आकाशवाणीवरून प्रसारित होत असत.
शंकरराव बोडसांनी कानपूरमध्ये संगीतविषयक संघटनात्मक कार्यही केले. पी.पी.एन. महाविद्यालयामधील कामाबरोबरच अन्य संस्थांशीही त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांनी १९४८ साली गांधी संगीत विद्यालयाची स्थापना करून गायन, वादन व नृत्य या तिन्ही विधांचे परीक्षाक्रमवत अध्यापन सुरू केले. त्यांनी १९६९ साली जुहारीदेवी परास्नातक महाविद्यालयामध्ये संगीतात एम.ए.पर्यंतचे अभ्यासक्रम तयार केले. त्यांनी १९२७ साली कानपूरमध्ये संगीत समाज सुरू करून त्याद्वारे अनेक कलाकारांच्या मैफली घडवून आणल्या व त्या योगे कानपूरमध्ये रसिकवर्ग घडवला. ‘संगीत समाज पत्रिका’ व ‘संगीत कला विहार’ या मासिकांतील अंकांमधून त्यांनी संगीत विषयक विपुल लेखनही केले.
कानपूर येथे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांनी पुत्र काशीनाथ बोडस व कन्या वीणा सहस्रबुद्धे यांना संगीतात प्रवीण केले. या दोघांनीही कला, अध्यापन, रचनात्मक कार्य या बाबतींत वडिलांचा संगीताचा वारसा समर्थपणे पुढे नेलेला दिसतो.
— चैतन्य कुंटे