Skip to main content
x

बोरीकर, सुभाष त्र्यंबक

      सुभाष त्र्यंबक बोरीकर यांचा जन्म मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जाम खेड्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी १९६५मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली आणि परभणी येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी १९६९ मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन शिक्षणात त्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. पुढे त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवीसाठी अनुवंशशास्त्र (जेनेटिक्स) विषय निवडला. त्यांची १९७१ मध्ये प.दे.कृ.वि.त वरिष्ठ संशोधन साहाय्यक या पदावर नेमणूक झाली. पुढे १९७२मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर १९७३मध्ये त्यांची साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी  पीएच.डी. पदवी शिक्षणासाठी धारवाड (कर्नाटक) येथील कृषी विद्यापीठात नोंदणी केली आणि १९८०मध्ये  पीएच.डी. प्राप्त केली.

      बोरीकरांनी मुख्यत: मराठवाड्यात खरीप/रब्बी ज्वारीच्या संशोधनाचे काम केले. त्यांनी खरीप ज्वारीच्या पीव्हीके४००, ८०१, पीव्हीके८०९ व सीएएसएच २५ व रब्बी ज्वारीच्या परभणी मोती व ज्योती या जातींचा विकास व प्रसार केला. त्यांनी ज्वारीचे संकरित मादी व नर वाण विकसित केले. पिकांच्या मादी वाण विकासात अनुवंशिकदृष्ट्या वेगळ्या पेशीद्रव्याचा अभ्यासही त्यांनी केला. पिकाच्या जाती विकासात विविध नैसर्गिक ताणांसाठी (जैविक/अजैविक) प्रतिकारक्षमता विकसित करण्यासाठी जैवतंत्राचा उपयोग केला.

      बोरीकरांनी वनस्पतिशास्त्र व पैदास या विषयासाठी पीएच.डी.च्या १३ विद्यार्थ्यांना तर ४६ जणांना एम.एस्सी.च्या संशोधनात मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासक्रमात आवश्यक बदल केले आणि  प्रयोगशाळा आधुनिक बनवली. बोरीकर यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वारी संशोधन केंद्रावर ज्वारी-पैदासकार म्हणून १५ वर्षांपेक्षा जास्त काम केले. तसेच प्राध्यापक, विभागप्रमुख आणि संचालक संशोधन या पदांवर एकंदर १५ वर्षांचा प्रशासनाचा भरघोस अनुभव त्यांना मिळाला. त्यांनी तांत्रिक विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २००पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. तसेच सामान्य व शेतीत काम करू इच्छिणार्‍यांसाठी त्यांनी शेतीविषयक ज्वारी संशोधन, संकरित बीजोत्पादन, अनुवंशशास्त्र संशोधन, ऊती संवर्धन या विषयांवरील पुस्तके लिहिली.

      ज्वारी पिकाचे संशोधन करताना डॉ. बोरीकर यांनी  खरीप ज्वारीचे चार वाण व रब्बी ज्वारीचे दोन वाण त्यांच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांनी निर्माण केलेल्या सीएस.व्ही. १६ आर या रब्बी वाणाचा बराच प्रसार व प्रसिद्धी झाली. या संशोधनाच्या काळात त्यांनी अनेक नर व मादी वाण विकसित केले. पुढे संकरित वाण निर्माण करण्यासाठी या वाणांचा उपयोग झाला. ज्वारीसंबंधात त्यांनी केलेल्या या महत्त्वाच्या संशोधनामुळे त्यांना एकूण अकरा पुरस्कार मिळाले. त्यात उल्लेखनीय म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील डॉरीन माशलर पारितोषिक होय. याशिवाय वसंतराव नाईक सुवर्णपदक आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाने तीन वेळेस दिलेला उत्कृष्ट संशोधक हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

बोरीकर, सुभाष त्र्यंबक