Skip to main content
x

बोरकर, बाळकृष्ण भगवंत

     कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म कुडचडे ह्या गोव्यातील गावी, त्यांच्या आजोळी झाला. बोरी हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे शिक्षण मराठी तीन इयत्तांपर्यंत, इंग्रजी मॅट्रिकपर्यंत, पोतुर्र्गीज माध्यमिक आणि टीचर्स डिप्लोमा, असे झाले होते. १९३० ते १९४५ सलांपर्यंत गोव्यातील निरनिराळ्या शाळांत त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर १९४६ साली त्यांनी गोवा स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. ‘आमचा गोमंतक’ (मराठी) आणि ‘प्रजेचो आवाज’ (कोंकणी) या नियतकालिकांचे त्यांनी १९४८ व १९५५ साली केले. १९५५-१९७० आकाशवाणी पुणेपणजी केंद्रांवर वाङ्मय विभागाचे संचालन केले.

     कवी भास्कर रामचंद्र तांबे यांच्या रूपाने आपल्या कवितेला घराणे लाभले ही बोरकरांची धारणा होती. परंतु; तांबे ज्या संस्थानी वातावरणात जगले, तेथे त्यांनी उत्तान वाटणार्‍या कविता फाडून टाकल्या. तांब्यांनी कवितेत शरीर पूर्णतः नाकारले नाही; पण मनाच्या नाट्यपूर्ण चित्रणावर भर दिला, तर पोर्तुगीज संस्कृतीतील लॅटिन प्रभाव आणि ख्रिश्चन संस्कृतीतील स्त्री आणि पुरुषांमधील मुक्त सख्यभाव ह्या अनुभवाने भारून जाऊन कवी बोरकर पार्थिवता जपत प्रणयाने झणाणून जात ‘लावण्याचा लागून बाण’ हा भाव जपू शकतात.. त्यातून स्त्री-मनाप्रमाणे स्त्री-शरीराचे वर्णन करीत, भोग न नाकारताही त्याचे नैसर्गिक भान राखत ते अनुभव जिवंत करू पाहतात. त्यामुळे त्यांची कविता एकाच वेळी सुंदरता आणि अभिरुचिसंपन्नता यांतून प्रेमाची बेहोषी जपत राहते.

     ‘पार्थिव्यातच वास हवा, परि दिव्याचा हव्यास हवा’ ही त्यांची दृष्टी सौंदर्यवादाच्या उत्कटता, बंडखोरी, सौंदर्याकांक्षा, बेभान अवस्था अशा वैशिष्ट्यांनी वेगळी होते. कवी तांबे यांच्यात त्यांना ‘समानधर्मा’ भेटला आणि मूळचे निसर्गभान प्रेमभानाच्या स्पर्शाने अधिक चेतोहर बनले. त्यात अस्सल भारतीय संस्कृतीचे बळ मिसळल्यामुळे निसर्ग, प्रेम आणि अंतःसंगीत यांतून नवा स्वानुभूतिनिष्ठ भारतीय सौंदर्यवाद त्यांच्या कवितेत साकारला, ज्यात तांब्यांपेक्षा वेगळी अशी विमुक्तता आणि सौंदर्यपिपासू मनाचा बेभानपणा मिसळला. ‘लॅटिन एलिमेन्ट’ आणि ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या अमृतवाणीची ओढ यांतून शृंगार आणि शांत रस तिथे एकवटला.

     निसर्गातून जीवनसाक्षात्कार या सूत्रातून जगताना ज्ञानेश्वर, टागोर, यांचे बोट पकडून त्यांना निसर्गाच्या आदिप्रेरणेपर्यंत जाता आले आहे. म्हणून तांबे ‘प्रेमप्रतीतिधर्मी’ झाले, तर बोरकरांचा पिंड ‘निसर्गप्रतीतिधर्मी’ असा उमटला. मातीच्या धर्माकडून त्यांना ज्योतीच्या मर्मापर्यंत जाता आले. त्यांना निसर्गाबरोबर आत्मरंगाचे उदयास्त पाहता आले; आणि रंगागंधातून मकरंद टिपता आला. प्रतिमांमधून निर्माण झालेले लावण्यविश्व निसर्गप्रतिमांच्या गाळीव अर्करूपाने कवीच्या मनाला ‘नितळ निळा स्फटिकावाणी’ करून गेला. डॉ.रा.चिं. ढेरे म्हणाले त्याप्रमाणे, ‘बोरकरांच्या भावविश्वात ‘यौवनाचे झाड’ अखंड मोहरलेले आहे’ पण त्याच्या पालवीच्या आड परम सत्याचा चंद्र आहे; जो ‘अमृताचा’ आहे.

     कवितेला बा.भ.बोरकरांनी ‘लययोगाची हृदयंगम कला’ असे म्हटले आहे. म्हणूनच ‘रसोत्सवी खोल’ बुडून कवीने ‘जरेतदेखील माती माझी कशी तयांची धरिते ओल’ असा प्रश्न केलेला आहे. मग त्यांची कविता विराग-अनुराग, रती-विरक्ती अशा द्वंद्वांतून प्रेमसोपानाच्या वाटेने शिवत्वाला जाऊन भिडते.

     ‘प्रतिभा’ (१९३०),‘जीवनसंगीत’ (१९३७), ‘दूधसागर’ (१९४७), ‘आनंदभैरवी’ (१९५०), ‘चित्रवीणा’ (१९६०) ‘बोरकरांची कविता’ (संपादन मंगेश पाडगावकर १९६०), ‘गितार’ (१९६५), ‘चैत्रपुनव’ (१९७०),‘चांदणवेळ’ (बोरकरांची निवडक कविता संपादन : कुसुमाग्रज व गो.म.कुलकर्णी १९७२), ‘मेघदूत’ (१९८०), ‘कांचनसंध्या’ (१९८१), ‘अनुरागिणी’ (१९८२), ‘चिन्मयी’ (१९८४), ‘बोरकरांची प्रेमकविता’ (संपादन : डॉ. रा.चिं.ढेरे १९८४), ‘कैवल्याचे झाड’ (निवडक भक्ति कवितांचे संकलन १९८७), हे कवितासंग्रह ही कवी बोरकर यांची कमाई आहे. ‘कोकणी - गीताय’ (१९६०), ‘पाथजणां’ (१९६०), ‘सासाय’ (१९८०) हे त्यांचे कोकणी कवितासंग्रह होत.

     ह्या काव्यवाटचालीत त्यांच्या कवितेत झालेले बदल हे कवीचे वृत्तीबदल होते, तो नवकाव्याचा प्रभाव नव्हता. ‘चित्रवीणा’ ह्या संग्रहात त्यांना आत्मरूप गवसले, तर ‘गितार’ मधील कवितेत गीतप्रकाराबद्दलचे प्रेम काहीसे कमी होऊन गद्यसदृश वळण आले आणि नवे प्रयोग डोकावू लागले, तर ‘चैत्रपुनव’मध्ये खिन्नमनस्कतेतूनही घेतलेला आत्मशोध प्रत्ययास आला, ज्यामुळे सौंदर्यदर्शनाची उत्कटता वाढली. ‘अनुरागिणी’मध्ये सामाजिकता, ध्येयवाद गळून कविता अधिक आत्मशोधी बनत आत्मतत्त्व धारण करणारी दिसते.

     कवी बोरकरांच्या काव्यप्रवासाच्या उत्तरार्धात रसप्रसन्नता व भारतीय संस्कृतिसंचितात पाय घट्ट रोवून उभे राहण्याची प्रतीती प्रकटलेली आहे. ‘चिन्मयी’मध्ये माती व ज्योतीची सांगड आणि कृतार्थता यांचे दर्शन आहे.‘मेघदूताच्या अनुवादात साक्षात्कारी प्रत्यय आहे, तर ‘कांचनसंध्या’ व ‘अनुरागिणी’ प्रेमनिसर्गयोगी बनून देहभानापल्याड जाता, जाता शाश्वताचे भान आणि रसमय जीवनवृत्तीचा कृतज्ञ स्वीकार दिसतो. ‘महात्मायन’ पूर्ण झाले नाही आणि कवितेत जे जसे साधले ते कथालेखन, कादंबरीलेखन व ललितगद्यात साधले नाही.

     ‘कागदी होड्या’ (१९३८), ‘घुमटावरील पारवे’ (१९८६), ‘चांदण्यातील कवडसे’ (१९८२) आणि ‘पावलापुरता प्रकाश’ (१९८३) या ललितनिबंध-संग्रहांमध्ये काव्यमयता आणि तत्त्वचिंतन यांचे रसायन आहे.‘घन वरसे रे’सारख्या ललितनिबंधात कविता-स्फुरणाचे चित्र दिसते, तर इतरत्र निसर्गवर्णनपर ललितनिबंधात सौंदर्यपूजन करणारे रसिक मन दिसते.

     ‘प्रियदर्शिनी’ (१९६०) आणि ‘समुद्रकाठची रात्र’ (१९८१) ह्या कथासंग्रहांमध्ये गोव्याच्या मातीचा सांस्कृतिक वारसा आहे तसा ठरीव निसर्गही आहे. वास्तवापासून दूर गेल्यामुळे लेखकाला व्यक्तिमनांचा तळ गाठता आलेला नाही.

     ‘मावळता चंद्र’ (१९३८), ‘अंधारातील वाट’ (१९४३), ‘भावीण’ (१९५०), ‘प्रिय कामा’ (१९८३) यांमध्ये ‘भावीण’मधील गोमंतकीय वातावरण व देवाला अर्पण केलेल्या स्त्रीच्या जीवनाचे चित्र प्रभावी होते. देवदासीजवळही निष्ठा असतात हे दाखविणारी शेवंती हे उदात्त विचारसरणी व मूल्यकल्पना यांचे स्त्री-चित्र होते. ‘प्रिय-कामा’ मध्ये रामायणातील कैकेयीकडे बघताना त्यांनी पुराणाला आधुनिकतेचा स्पर्श दिला.

     बोरकरांनी ज्या हिंदी कविता रचल्या, त्यांबद्दल ग.दि.माडगूळकरांनी ‘तीळ आणि तांदूळ’ ह्या ललितलेखनसंग्रहात नोंदवून ठेवलेले आहे. त्यातही ‘अध्यात्माची आलापी’ होती, असे माडगूळकर सांगतात.

    कवी बोरकरांना मुलासारखे प्रेम करणार्‍या दोना प्रोपेयर्स ह्या विदुषींमुळे पोर्तुगीज व फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळविता आले होते. ‘महात्मायन’ लेखनात बोरकरांना गांधीवादी विचाराने भारले, भारावलेले बोरकर महात्माजींची अलौकिकता टिपताना दिसले होते. त्याची निष्ठा खोटी नव्हती; पण भ्रष्टाचार, सत्तांधता यांच्या दर्शनातून झालेल्या वेदनांमुळे त्यातील भाव काहीसा ओसरला. ‘काही स्वप्नानुभव’ या लेखात बोरकर कुणावर तरी चिडले, तेव्हा गांधींनी ओठावर बोट ठेवले असे दिसले आणि जाग आली. म्हणून क्रोध जिंकला नाही तोवर ‘महात्मायन’ चालविण्याची आपल्याला मुभा नाही, असा त्यांनी समज करून घेतला होता.

    ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ (१९६४) हा प्रबंध, ‘महामानव रवींद्रनाथ’ (१९७०) हा चरित्रग्रंथ ह्या त्यांच्या टागोर-व्यक्तित्वाशी जवळीक असल्याच्या खुणा होत. बोरकरांनी केलेले ‘बापूजींची ओझरती दर्शने’ व ‘आम्ही पाहिलेले गांधीजी’ हे अनुक्रमे काका कालेलकर आणि चंद्रशेखर शुक्ल यांच्या पुस्तकांचे अनुवाद १९५० साली प्रसिद्ध झाले, तर जानकीदेवी बजाज यांच्या ‘माझी जीवनयात्रा’ ह्या आत्मचरित्राचा अनुवाद १९६० साली प्रकाशित झाला. ‘रसयात्रा’ या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितेचे संपादन त्यांनी शंकर वैद्य ह्यांच्या सहकार्याने १९६९ साली केले. विनोबांच्या गीताप्रवचनांना त्यांनी १९५६ साली कोकणीत आणले. अरविंद घोष यांच्या मूळ कलाकृतीवरून ‘वासवदत्ता : एक प्रणयनाट्य’ (१९७३), खलिल जिब्रान यांच्या मूळ कलाकृतीवरून ‘पैगंबर’ (१९७३), टागोरांच्या मूळ कलाकृतीवरून ‘बामण आनी अभिसार’ (१९८१), धर्मानंद कोसंबींच्या मूळ विचारांवरून ‘भगवान बुद्ध’ असे कोकणीत अनुवाद करून त्यांनी मायभाषेचा गौरव केला.

    बा.भ.बोरकर यांना काही सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे पहिले सुवर्णपदक (१९३४), ‘भावीण’ कादंबरीसाठी गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक (१९५०), ‘आनंदभैरवी’, ‘चित्रवीणा’, ‘गितार’ ह्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र राज्य पारितोषिके, ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ ह्या पुस्तकासाठी महाराष्ट्र राज्याचे रु. ५०००/- चे विशेष पारितोषिक हे त्यांना मिळालेले पुरस्कार होत.

    १९६७ साली भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ प्राप्त झाली. त्याच वर्षी त्यांनी अखिल भारतीय कोकणी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. महाबळेश्वर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना १९७० साली प्राप्त झाला.

    स्टीफन झ्वाइग यांच्या कथा, कादंबरीचा अनुवाद त्यांनी मराठीत आणला. ‘जळते रहस्य’ (कादंबरी १९४५, आणि ‘काचेची किमया’ (कथा १९५१) ह्या त्या कलाकृती होत.

    त्यांनी साहित्याचे विविध प्रकार हाताळले, तरीही बोरकरांची खरी भूमिका कवीचीच होती. सौंदर्य, प्रेम, निसर्ग ह्या निष्ठांमुळे त्यांना दुःख अनुभवूनही निखळ प्रसन्नतेचा गाभा जपता आला. गोव्याच्या सौंदर्यचा वेध घेताना बोलीतील शब्द, संस्कृत अभिजात शब्द यांचा वापर करून एक अनवट शैली निर्माण करून दृक, श्राव्य, स्पर्श, गंध ह्या इंद्रियसंवेदनांचा पृथगात्म वापर करीत त्यांनी प्रदेशाच्या रंगाला संस्कृतीस्पर्शाचे सौंदर्य दिले.

    त्यांची कविता गुणगुणतच जन्माला आली. तिने अरूप, अशब्द अनुभवांना निसर्गभाषेतून साकार केले. कवी तांब्यांच्या दृष्टीचा दिवा करूनही आत्मत्वाच्या बळाने त्यांनी वाटचाल केली आणि निसर्गप्रतीतिधर्मी (Nature Mystic)  हीच आपली पृथगात्मता सिद्ध केली; जिचा गाभा गीतात्मता (Lyricism) हाच होता. बोरकरांच्या जीवनप्रवासाचे खरे वर्णन त्यांच्याच शब्दांत करायचे झाले तर म्हणावे लागेल :

    ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी

     जिणे गंगौघाचे पाणी.’

- डॉ. आशा सावदेकर

बोरकर, बाळकृष्ण भगवंत