Skip to main content
x

बोरकर, प्रदीप आत्माराम

        प्रदीप आत्माराम बोरकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मोठी उमरी येथील अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे शिक्षण चौथीपर्यंत झालेले होते व आईला अक्षरओळखही नव्हती. प्रदीप यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले व माध्यमिक शिक्षण अकोला येथील टिळक राष्ट्रीय शाळेत झाले. ते १९८०मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाले व त्यांनी १२वीची परीक्षा १९८३मध्ये उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी अकोला येथील डॉ.पं.दे.कृ.वि.च्या अधीनस्थ असलेल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्यांनी १९८७मध्ये  बी.टेक. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९९०मध्ये कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी या शाखेत डॉ. पं.दे.कृ.वि.मधून एम.टेक. ही पदवी मिळवली. त्यांनी बियाणे महामंडळामध्ये अभियंता या पदापासून नोकरीची सुरुवात केली. त्यांची १९९२मध्ये डॉ.पं.दे.कृ.वि.मध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यांची १९९७मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आणि त्यांनी १९९७ ते २००८ या काळात संशोधन अभियंता म्हणून काम केले आणि कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात कापणीपश्‍चात यंत्र विज्ञान या शाखेमध्ये काम केले. त्यांनी गोल आकाराच्या फळांच्या प्रतवारी करण्याचे यंत्र शोधले. हे यंत्र सफरचंदाची प्रतवारी करण्यासाठी हिमाचल प्रदेशामध्ये जास्त उपयुक्त ठरले. पूर्वीच तयार केलेल्या मिनी दालमिलची उपयोगिता वाढवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आणि गहू, मका, मूग सफार्उची उपयुक्तता या यंत्राद्वारे वाढवली. त्याद्वारे एका तासामध्ये ४ क्विंटल धान्य साफ होते.

        बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार येथे सेंद्रिय कृषी प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे. याच गावी त्यांच्या सल्ल्यानुसार पीक कापणीपश्‍चात अनेक यंत्रे बसवण्यात आली. त्यामध्ये धान्याची सफार्उ करणारे यंत्र, प्रतवारी करणारे यंत्र, मसाला चक्की, बायोडिझेल मशिन, डबलरोलर जीन इत्यादी यंत्रांचा समावेश आहे. या प्रक्रिया केंद्राद्वारे उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते.

        बोरकर यांनी कृषी व्यवसायाचा विकास करण्यासाठी फिरते मार्गदर्शन केंद्र सुरू केले. त्यांनी संशोधनपर २७ लेख लिहिले. त्यांनी ५३ प्रशिक्षण वर्ग, ८३ प्रात्यक्षिके आणि २२ प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन त्यांच्या यंत्राचा प्रसार व प्रचार केला आहे. त्यांचे आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले आहेत.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

 

बोरकर, प्रदीप आत्माराम