Skip to main content
x

बोरकर, तुळशीदास

हार्मोनिअम वादक

तुळशीदास बोरकर यांचा जन्म गोव्यातील फोंडा महाल भागातील बोरी या लहानशा निसर्गरम्य गावात झाला. बोरी गावातील श्री नवदुर्गेच्या मंदिरात नित्यक्रमाने होणाऱ्या कीर्तन, भजनातून गोव्यातील स्थानिक संगीताचा, स्वर-लयीचा संस्कार लहान वयातच त्यांच्या मनावर झाला. मंदिरातील कीर्तनात कीर्तनकार बाळूबुवा अभिषेकी यांना साथ करणारे हार्मोनिअम वादक जनार्दनबुवा बोरकर यांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.

वयाच्या पाचव्या वर्षी आई जयश्रीबाई बोरकर यांनी त्यांना संगीताचे प्राथमिक धडे देणे सुरू केले. पुढे वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सावंतवाडीस, आजोळी काही काळ शालेय शिक्षण घेतले. मग कुटुंबातील आर्थिक अस्थिरतेमुळे त्यांनी उदरनिर्वाहासाठी पुणे गाठले. अभिनेत्री बहीण नलिनी बोरकर यांच्यासह ते १९४५ साली बॅ.खासगीवाले यांच्या ‘महेश नाटक मंडळी’मध्ये दाखल झाले.

पुण्यात १९४८ पासून छोटा गंधर्वांच्या ‘कलाविकास’ नाटक कंपनीत काम करत असताना ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट व गायक छोटा गंधर्व यांच्याकडून त्यांना शिक्षण मिळाले. मुंबईत १९५७ ते १९६७ अशी सुमारे दहा वर्षे त्यांनी पी.मधुकर यांच्याकडून एकल हार्मोनिअम वादनाचे तंत्र, तसेच संवादिनीच्या स्वरजुळणीचीही जाणकारी मिळवली. संगीतकार मधुकर गोळवलकर, व्हायोलिनवादक अनंतराव फाटक, बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर, दुर्गेश चंदावरकर, राजाराम शुक्ल, मुरली मनोहर शुक्ल, पं. गिंडे व भट यांच्या सहवासातून बोरकरांनी संगीतातील अनेक बारकावे जाणून घेतले.

अनेक नामांकित नाटकमंडळींसाठी त्यांनी १९५० ते १९८० अशी तीस वर्षे संगीत नाटकांना ऑर्गनची संगत केली. छोटा गंधर्वांना त्यांनी दीर्घकाळ ऑर्गनची साथ केली, शिवाय हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, शांता आपटे, जयमाला शिलेदार, माणिक वर्मा, भालचंद्र पेंढारकर, पंडितराव नगरकर, भार्गवराम आचरेकर, श्रीपाद नेवरेकर, सुरेश हळदणकर, रामदास कामत इ. गायक नटांना संगीत नाटकांमधून साथ केली. तुळशीदास बोरकरांनी ‘संगीत पंढरपूर’, ‘बकुळ फुला’ या दोन संगीत नाटकांना संगीतही दिले.

बोरकरांनी सुमारे ५०-६० वर्षे देशात व अमेरिका, युरोप, आखाती देश अशा परदेशांतील अनेक महत्त्वाच्या रंगमंचांवरून शेकडो मैफलींत मान्यवर कलाकारांना संवादिनीची साथ अत्यंत तन्मयतेने केली. अमीर खाँ, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, गंगूबाई हनगल, पद्मावती शाळिग्राम, भीमसेन जोशी, राम मराठे, के.जी. गिंडे, एस.सी.आर. भट, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, अशा जुन्या काळातील ज्येष्ठांपासून आजच्या काळातील अनेक मान्यवर कलाकारांना त्यांनी साथ केली.

वादनातील ॠजुता, गोडवा हे त्यांचे वैशिष्ट्य होते . तुळशीदास बोरकरांचे एकल हार्मोनिअम वादन हे मुख्यत: पी. मधुकर शैलीला अनुसरून असले तरी त्यात त्यांचा स्वत:चा असा ठसाही दिसतो.

ते मैफलीत बरेचदा ललत, तोडी, मधुवंती, पूरिया कल्याण, यमन, बिहाग अशा मोठ्या रागांत, विलंबित एकतालात ख्याल पद्धतीने रागविस्तार करत; नंतर द्रुत त्रितालात गतकारी पद्धतीने वादन करून शेवटी झालावादन करत. मिश्र काफी, तिलक कामोद, खमाज, मांड यांसारख्या धुनरागांत बांधलेल्या ठुमरीवजा गती वाजवताना त्यांच्या पेशकशीत एक नखरा असे . लोकप्रिय नाट्यगीते हा तर त्यांच्या वादनातला अनिवार्य भाग होता .

वादन हे अधिकतर कंठसंगीताच्या जवळ जावे असा त्यांचा प्रयत्न असे . हार्मोनिअम या वाद्याच्या स्वतंत्र क्षमतांच्या शोधापेक्षा गायनानुसारी अभिव्यक्ती त्यांच्या वादनात आढळते. व्यामिश्र लयकारीपेक्षा गायनातील बोलतत्त्वाचा वापर करून छोटे छोटे स्वरसमूह वापरून त्यात तालाशी लडिवाळ क्रीडा करणे त्यांच्या वादनात अधिक दिसून येते . अर्थात पी. मधुकर शैलीप्रमाणे सतारीच्या ‘झाल्या’स अनुसरणारा झाला, खटका, कृंतन यांचा वापरही ते करत. पी.मधुकरांनी बांधलेल्या अनेक ढंगदार गतींचा साठा बोरकरांच्या संग्रहात दिसून येतो व त्यांचे ते कौशल्यपूर्ण रंगतदार वादन करत. त्यांनी १९७५ साली आकाशवाणीवर प्रथमच एकल हार्मोनिअम वादन केले. आजवर अनेक मान्यवर रंगमंचांवरून त्यांनी एकल हार्मोनिअम वादन केले . ‘संवादिनी संमेलनां’मध्येही त्यांचा सहभाग अनेक वर्षे होता.

त्यांनी अनेकांना विद्यादान केले असून अनेक शिष्य तयार केले. त्यांचे ‘संवादिनी साधना’ (२००१, मुंबई) हे हार्मोनिअमच्या गती, विस्तार व आत्मवृत्त असणारे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात हार्मोनिअमच्या दृष्टीने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार रागांच्या गती, आलाप-ताना, बोटांचा अनुकूल क्रम, भाता मारण्याचे तंत्र इ. बाबींचे विवेचन केले आहे. सोबत एका ध्वनिफितीमध्ये हा मजकूर ध्वनिमुद्रित स्वरूपात दिल्याने त्याचे श्रवणही करता येते. यामुळे एक ‘प्रात्यक्षिक दिग्दर्शिका’ (वर्किंग मॅन्युअल) अशा स्वरूपाचे हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले आहे. या पुस्तकाचा हिंदी अनुवादही २००७ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तुळशीदास बोरकरांचे ‘साथ-संगत’ हे आत्मवृत्त २००९ साली प्रकाशित झाले.

त्यांनी काही काळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे प्राथमिक व उच्च माध्यमिक मराठी शाळांतून संगीत अध्यापनही केले. वांद्रे येथील ‘शारदा संगीत विद्यालया’तही ते २००० पासून पारंपरिक पद्धतीने हार्मोनिअमचे शिक्षण देत. पुणे व कोल्हापूर येथील विद्यापीठांसाठी त्यांनी हार्मोनिअमचा अभ्यासक्रम तयार करून दिला.

बोरकरांचे योगदान हार्मोनिअमचे गुरू म्हणून मोठे आहे. जयंत फडके, केदार नाफडे, सीमा शिरोडकर, सुधीर नायक, अजय जोगळेकर, रविंद्र चारी, श्रीराम हसबनीस, निरंजन लेले, प्रकाश वगळ हे त्यांचे शिष्य आज व्यावसायिक हार्मोनिअम वादक म्हणून कार्यरत आहेत.

ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. ‘गोविंदराव टेंबे संगतकार’ पुरस्कार (१९९८, गांधर्व महाविद्यालय, पुणे), ‘आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी गौरव’ पुरस्कार (२००१, कोलकाता), ‘पं. बंडूभैया चौघुले’ पुरस्कार (२००४, इंदूर), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००५, दिल्ली)  आणि सर्वात महत्वाचा 'पद्मश्री' हा पुरस्कार त्यांना २०१६ साली प्राप्त झाला . असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

चैतन्य कुंटे

बोरकर, तुळशीदास