Skip to main content
x

बऱ्हाणपूरकर, गोविंद

गोविंदराव बऱ्हाणपूरकरांचा जन्म बऱ्हाणपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांना संगीताचे आकर्षण असल्याचे दिसून आले. वडिलांना संगीताची आवड असल्यामुळे गोविंदरावांना संगीताचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यांना मृदंग वादनाचा पहिला धडा वडिलांनीच दिला.

घरची आर्थिक परिस्थिती साधारणच असल्यामुळे बऱ्हाणपूरकरांचे शालेय शिक्षण मराठी फायनलपर्यंतच झाले. परंतु, बर्‍हाणपूर राज्याचे सरदार श्रीमंत बाबासाहेब भुस्कुटे यांच्या प्रयत्नाने आणि प्रोत्साहनामुळे बऱ्हाणपूरकर यांना प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षापासून कुटुंबाच्या चरितार्थासाठी आणि वडिलांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी दिवसा ते शिक्षकाची नोकरी व रात्री मृदंग वादनाचा अभ्यास करत.

मृदंग वादनात वडिलांकडून प्राथमिक शिक्षण लाभल्याकारणाने त्यांना त्या कलेचे आकर्षण अधिक वाटू लागले. त्या काळात बऱ्हाणपूर हे संगीताचे केंद्रस्थान होते, त्यामुळे तेथे प्रसिद्ध गायक-वादक आपली कला प्रदर्शित करण्यास नेहमी येत असत. बऱ्हाणपूरकरांना त्या सर्वांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळत असे.

वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे १८९७ मध्ये त्या काळातले प्रसिद्ध तबलावादक नथ्थूबुवा पाडसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बर्‍हाणपूरकरांचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. परंतु त्यांच्या सुदैवाने त्या वेळेस प्रसिद्ध मृदंगाचार्य पं. नानासाहेब पानसे यांचे पट्टशिष्य पं. सखारामबुवा पंत आगळे यांच्याशी गोविंदरावांचा परिचय झाला. मृदंग शिकण्याचा त्यांचा उत्साह सखारामबुवांच्या लक्षात आला. त्यांनी गोविंदरावांना मृदंग वादनाची नियमित तालीम देण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी निसार हुसेन खाँ व हरिहरबुवा कोपरगावकर यांच्याकडे धृपद-धमार गायकीची तालीम घेतली. परंतु त्यांनी मृदंग वादनाकडे विशेष लक्ष दिले. अखंड पंधरा वर्षे मृदंगाची साधना व तपश्चर्या करून त्यांनी त्यात विशेष सौंदर्यात्मक कौशल्य आत्मसात केले व निष्णात मृदंगवादक म्हणून प्रसिद्धी मिळविली.

बऱ्हाणपूरकरांचे वादन अतिशय नियमबद्ध होते. स्पष्ट बोल, लयदार आणि मधुर वादन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी १९२० च्या काळात हैदराबादचे प्रसिद्ध तबलावादक पं. वामनरावजी चांदवडकर यांच्याकडे तबलावादनाचे शिक्षण घेतले. १९२१ मध्ये अहमदाबाद येथे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनानंतर संगीत परिषदेत ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातनाम गायक पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गायनास  त्यांनी साथ केली होती. त्यांच्या वादन कौशल्यावर मुग्ध होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी बऱ्हाण- पूरकरांना ‘मृदंगाचार्य’ ही उपाधी देऊन त्यांचा गुणगौरव केला.

पं. विष्णू दिगंबर पलुस्करही त्यांच्या वादनावर खुश झाले होते. परिणामी, ते आपल्या अखिल भारतातील आणि श्रीलंका, ब्रह्मदेश वगैरेंच्या दौर्‍यांवर गोविंदरावांना साथीला घेऊन जात असत. पुढे पलुस्करांनी मुंबईत गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केल्यावर बर्‍हाणपूरकरांची अध्यापक म्हणून नेमणूक केली होती. त्यांनी मृदंग व तबलावादन यांची माहिती देणारी ‘मृदंग-तबलावादन सुबोध भाग १ ते ३’ आणि ‘भारतीय तालमंजरी’ अशी चार पुस्तके लिहिली. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. २७ मार्च १९५५ रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार देण्यात आला. सुप्रसिद्ध नृत्यकार उदयशंकर यांच्या ‘कल्पना’ या चित्रपटात त्यांनी मृदंग वाजविला होता. गोविंदरावांचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी बऱ्हाणपूर येथे निधन झाले.

          — प्रा. यशवंत महाले

बऱ्हाणपूरकर, गोविंद