Skip to main content
x

बर्कसन, कार्मेल

     अमेरिकेसारख्या भौतिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या देशात जन्म घेऊन, भारतीय शिल्पकलेच्या आणि संस्कृतीच्या प्रेमात पडून, भारत हेच आपल कार्यक्षेत्र करण्याऱ्या कार्मेल बर्कसन या भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कला-इतिहासतज्ज्ञ होत!

     इब्राहिम अलकाझी यांच्या मते -‘कार्मेल बर्कसन यांचे आयुष्य म्हणजे भारतीय अभिजात शिल्पकलेतील सामर्थ्याचे रहस्य उलगडण्यासाठी केलेला एक झपाटलेला प्रवास आहे. त्यांच्या अन्तर्दृष्टीतील आणि अन्वयार्थातील सखोलता यांची प्रचीती त्यांच्या भेदक नजरेतून तर येतेच, पण त्याहीपेक्षा शिल्पकर्ती म्हणून केलेल्या कलात्मक निर्मितीतून येते. सर्जनात्मक दृष्टी आणि आध्यात्मिक गहनता जपणाऱ्या भारताच्या समृद्ध इतिहासाशी नाळ जोडणे आणि आधुनिक काळाशी त्याचा संबंध प्रस्थापित करणे या कार्यात त्यांनी आपले अवघे आयुष्य खर्ची केले. आणि म्हणूनच आजच्या युगातील शिल्पकारांना आणि विद्वत्जनांना मार्गदर्शक ठरणारे एक महान कार्य उभे राहिले.’

     कार्मेल बर्कसन यांचा जन्म न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाला. ड्यूक विद्यापीठातून इतिहासाची पदवी घेतल्यानंतर, कोलंबिया विद्यापीठात प्रथितयश शिल्पकार मिल्टन हेबाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचा अभ्यास केला. पुढील काही वर्षे पती मार्टिन फ्लेशर यांच्यासोबत वैवाहिक आयुष्य व्यतीत करत असतानाच, माती, लाकूड, प्लास्टर आणि धातू यांपासून शिल्पनिर्मिती करण्यात त्या मग्न होत्या. परंतु १९७०साली पर्यटक म्हणून त्या भारतामध्ये आल्या आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

     भारताच्या प्राचीन लेण्यांमधील विशेषत: एलिफंटा, वेरूळ आणि महाबलिपुरम् येथील कोरीव शिल्पांनी त्या अत्यंत प्रभावित झाल्या. इथल्या शिल्पांमध्ये एकवटलेली ऊर्जा आणि प्रतीत झालेली भारतीय परंपरा यांकडे आकर्षित होऊन त्यांनी शिल्पकलेचे आपले काम बाजूला ठेवले आणि भारताविषयी अधिक जाणून घेण्यास सुरुवात केली. भारताचा वैभवशाली इतिहास आणि सौंदर्यपूर्ण कलानिर्मिती यांमागची आध्यात्मिक बैठक यांनी त्यांच्यातला संवेदनशील कलावंत अस्वस्थ झाला.

     १९७७ साली पाठीवर एक बॅग, हातात कॅमेरा, मनात इतिहासकाराची उत्सुकता आणि हृदयात अस्वस्थ कलावंताची तरलता सोबतीला घेऊन त्या भारतभ्रमणाला सज्ज झाल्या. त्यानंतर तब्बल २० वर्षे सातत्याने भारतभरातील शेकडो शिल्पांची, लेण्यांची, मंदिरांची छायाचित्रे घेतली. त्यांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याबद्दल संशोधनात्मक लिखाण केले. प्राचीन भारतीय शिल्पांची छायाचित्रे, त्यांचा अंतस्थ दृष्टीने घेतलेला वेध आणि त्यावरील संशोधनावर आधारित विश्लेषण असणारी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

     वेरूळच्या लेण्यांवरील पुस्तक, एलिफंटा गुंफावरील पुस्तक किंवा औरंगाबादमधील शिल्पांचे पुस्तक असो, कार्मेल बर्कसन यांच्यातली चिकित्सक संशोधिका प्रकर्षाने जाणवत राहते. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि विश्लेषणात्मक लेखनपद्धती यांमुळे त्यांची पुस्तके भारतीय शिल्पकलेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. ‘Indian Sculpture – Towards The Rebirth of Aesthetics’ (२००५) हे कार्मेल बर्कसन यांचे सर्वांत अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले पुस्तक, आधुनिक भारतीय शिल्पकारांना पथदर्शक ठरावे असेच आहे.

     प्राचीन भारतीय शिल्पकलेच्या या ओघवत्या शोधप्रवासात त्यांनी काढलेल्या शेकडो छायाचित्रांची प्रदर्शने वेळोवेळी भारतात आणि परदेशातही झाली. भारतातील शिल्पकृतींच्या संग्रहाचे (Documentation) एक मोठे कार्य अनायसेच त्यांच्या हातून झाले.

     १९७७पासून भारतामध्ये वास्तव्य करून राहणार्‍या श्रीमती बर्कसन या २००१साली पुन्हा एकदा शिल्पनिर्मितीकडे वळल्या. पण या वेळी त्यांनी अनुभवलेल्या, शोधलेल्या प्राचीन भारतीय शिल्पकलेतील प्रेरणा घेऊनच शिल्पनिर्मितीकडे वळल्या त्यामुळे त्यांच्या शिल्पकृतींना एक वेगळेच परिमाण लाभले.

     भारतीय शिल्पकलेतील त्यांच्या या कार्याचा यथोचित गौरव २०१०साली राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन, व एशियाटिक सोसायटी मुंबईची सन्माननीय फेलोशिप देऊन करण्यात आला. भारतातील अप्रतिम लेणी, मंदिरे, आश्चर्यकारक कोरीव काम यांतील वैशिष्ट्यांबद्दल बोलताना बर्कसन म्हणतात,‘भारतीय शिल्पकला ही कधीच वैयक्तिक पातळीपुरती मर्यादित राहिली नाही. राजसत्ता, पाण्डित्य, कलावंत, कारागीर, स्थापत्यकार या सार्‍यांच्या सुरेख समन्वयातून येथील अजरामर शिल्पकृतींचा जन्म झालेला दिसतो.’

    आजच्या स्पर्धात्मक युगात टिकाव धरण्यासाठी, पाश्चात्यांचे निवळ अंधानुकरण करणार्‍या तथाकथित भारतीय शिल्पकारांना मोलाचा सल्ला देताना त्या म्हणतात, ‘सद्यःकालीन भारतीय शिल्पकार केवळ आर्थिक फायद्यासाठी आजच्या युगाशी आपल्या कलाकृतींचा संबंध जोडण्यात प्रयत्नशील दिसतात. परंतु तसे करतानादेखील आपल्या पूर्वजांनी साकारलेल्या शिल्पांतील सौंदर्यशास्त्राचा विसर त्यांनी पडू देता कामा नये. तरच भारतीय शिल्पांतील चैतन्य अबाधित राहील.’

    कार्मेल बर्कसन यांच्या मते, अभिजात कलावंत हा कोणत्याही मातीत जन्मलेला असो, त्याची संस्कृती, इतिहासाची भिन्नता यांमुळे त्याच्या कलाकृतीच्या बाह्य स्वरूपात जरी भिन्नता दिसली, तरीही त्यामागील अंतस्थ प्रेरणा ही सर्वत्र सारखीच आढळते.

    बर्कसन यांच्या उदाहरणावरूनच त्यांच्या बोलण्यातील सत्यता दिसून येते. खरोखरच, अभारतीय असूनही भारतातील आणि महाराष्ट्रातील शिल्पांनी भारावून जाऊन भारतीय शिल्पकलेला आपलेसे करणाऱ्या आणि तिच्यातील सजीवता जपण्यासाठी अवघे आयुष्य अर्पण करणाऱ्या कार्मेल बर्कसन, आधुनिक काळातील एक आदर्शच बनून राहिल्या आहेत!

डॉ. सीमा सोनटक्के

बर्कसन, कार्मेल