Skip to main content
x

बर्वे, अच्युत महादेव

     अच्युत महादेव बर्वे यांचा जन्म मुंबईला झाला. ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून बी.एस्सी. झाले. दापोलीला शिक्षकपदावर नोकरी केली. नंतर अहमदाबाद येथे साराभाई उद्योगसमूहात १९५२ पर्यंत नोकरी केली. पुढे ३० वर्षे शिल्पी अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीत ते कार्यरत होते. त्यांना चेअरमन पदापर्यंत पदोन्नती मिळाली.

     ‘आंबट गोड’ (१९५१),  ‘चंदनाचा उंबरठा’ (१९५६), ‘झोका’ (१९५९), ‘कोंबड्याची पात’ (१९६१), ‘पाठमोरी’ (१९७२), ‘हँगओव्हर’ हे त्यांचे महत्त्वाचे कथासंग्रह आहेत. ‘मातीचा वास’ (१९६२) ही त्यांची पहिली कादंबरी असून ‘कॅलिडिओस्कोप’ (१९७४) ही आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी कादंबरी विशेष गाजली. यानंतर आपल्या मुक्या आणि बहिर्‍या मुलीवर आधारलेली त्यांची ‘सुखदा’ ही कादंबरी वाचकांच्या मनाला स्पर्श करणारी व वाचकांचे मन हेलावून टाकणारी ठरली.

     त्यांच्या कथालेखनावर ना. सी. फडके यांच्या रंजक शैलीची आणि ‘रोमँटिक’ प्रवृत्तीची छाप असल्याचे जाणवते. हलक्या-फुलक्या शैलीत लिहिलेल्या त्यांच्या कथा वाचकांना रिझवतात. मात्र ‘सुखदा’सारख्या कादंबरीत जेव्हा वाचकाला कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते, तेव्हा वाचकाला जीवनाचे विदारक दर्शन घडते.   

     - रागिणी पुंडलिक

बर्वे, अच्युत महादेव