Skip to main content
x

बथकल, बळवंत गोविंद

       ळवंत गोविंद बथकल यांचा जन्म विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील भालर या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कोरडवाहू शेतकरी होते. बळवंत यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले व माध्यमिक शिक्षण वणी या ठिकाणी झाले. पदवी शिक्षणाकरता त्यांनी १९५०मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्तीद्वारे झाले. त्यांनी १९५४मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने मिळवली. त्यांना सुवर्णपदकही मिळाले. त्यांनी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.तून १९५६मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरीस सुरुवात केली. नोकरी करत असताना त्यांना पीएच.डी. पदवीसाठी संधी प्राप्त झाली. याच काळात त्यांची प्राध्यापक पदावर निवड झाली.

       कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालय १९६९पर्यंत त्यांनी या पदावर कार्य केले. डॉ.पं.कृ.दे.वि.ची स्थापना झाल्यावर त्यांनी अकोला येथे प्राध्यापक आणि नंतर कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून कार्य केले. या कोरडवाहू शेती संशोधनात प्रकल्पाच्या प्राथमिक काळात त्यांनी संशोधनास दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. पुढे विद्यापीठाच्या विविध पदांवर कार्य करून त्यांनी संशोधन संचालक पदापर्यंत मजल मारली. त्यांनी १९७५-७८ या काळात मध्यवर्ती संशोधन प्रक्षेत्र येथे संचालक पदावर कार्य केले. त्यांनी सिंचन प्रकल्पात नावीन्यपूर्ण कल्पना राबवून सर्व प्रकल्पांतील सिंचन क्षमता वाढवली. याच योजनेचा पुढील भाग म्हणजे सर्वपरिचित झालेले अकोला प्रारूप होय. या मॉडेलमध्ये सिंचनासाठी पाणी उंच जागी साठवून ते उताराद्वारे पिकाला देण्याची अभिनव कल्पना वापरली. त्यामुळे हवे तेव्हा व आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन शेजपाळीचा त्रास कमी झाला.

       बथकल यांनी १९८४ ते ८६ या काळात पुणे येथे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर संशोधन सल्लागार म्हणून कार्य केले. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत संशोधन समन्वयक म्हणून ही संस्था कार्यरत आहे. ते जून १९९०मध्ये संशोधन संचालक या पदावरून डॉ.पं.दे.कृ.वि.तून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी काही खासगी व काही सरकारी मान्यताप्राप्त संस्थांमध्ये सल्लागार म्हणूनही कार्य केले. त्यांची मे १९९३ ते १९९६मध्ये  डॉ.पं.दे.कृ.वि.चे कुलगुरू म्हणून नेमणूक झाली. या काळात नवीन संशोधन प्रकल्प आणि संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य या तीनही क्षेत्रांत कार्य करून शेतकऱ्यांना संशोधन उपयुक्त कसे ठरेल यावर भर दिला.

       डॉ. बथकल यांनी पीक पद्धती, पीक फेरपालट याबद्दल उपयुक्त संशोधन केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी या शीर्षसंस्थेत मान्यवर सदस्य व सुवर्णपदक देऊन गौरव केला. निवृत्तीनंतरदेखील त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने विदर्भ वैधानिक मंडळावर सदस्य म्हणून काम केले. तसेच विदर्भ असोसिएशन फॉर रीसर्च अँड डेव्हलपमेंट इन अ‍ॅग्रिकल्चर अँड रूरल सेक्टर या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला आणि कृषी संशोधन व विस्तार याबाबत समन्वय साधण्याचा प्रयत्न चालविला.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

बथकल, बळवंत गोविंद