Skip to main content
x

बूट, श्रीधर सदाशिव

      श्रीधर उर्फ बाबा सदाशिव बूट यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरजवळील बुटीबोरी येथे झाले. पुढील शिक्षण नागपूर शहरात झाले. वनस्पतीशास्त्र या विषयात ते नागपूर विद्यापीठातून प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी याच विषयात एम. एस्सी. ही पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. याच काळात श्रीधर बूट यांची योगायोगाने प्रसिद्ध साहित्यिक पु.भा.भावे यांच्याशी त्यांची कायमची मैत्री जुळली.

       यानंतर १९४० मध्ये श्रीधर बूट यांनी भारतीय वन सेवा (इंडियन फॉरेस्ट सर्विस) ची परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांची निवड झाल्यावर त्यांनी डेहराडूनला दोन वर्षे प्रशिक्षण घेतले. १९४२ मध्ये बूट यांची नेमणूक मध्य प्रदेशात जबलपूर जिल्ह्यातील ‘बरेली’ या वनग्रामी फॉरेस्ट रेंज चार्जचे प्रशिक्षण व अनुभव घेण्यासाठी झाली.

       पुढे १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यावर त्यांची महाराष्ट्राच्या जंगल खात्यात नियुक्ती झाली. १९५६ ते १९६३ ह्या कालावधीत त्यांनी जिल्हा वन अधिकारी व वन संरक्षक (कॉन्झरवेटर ऑफ फॉरेस्ट) या पदांवर चांदा येथे व पुढे सहा-सात वर्षे अमरावती येथे मेळघाटात वन अधिकारी म्हणून काम केले.

      १९६३ मध्ये त्यांची महाराष्ट्र प्रदेशाचे प्रमुख वनसंरक्षक (चीफ कॉन्झरवेटर ऑफ फॉरेस्टस्) म्हणून नेमणूक झाली आणि १९७६ मध्ये ते याच पदावरून निवृत्त झाले. चंद्रपूर विभागात चंद्रपूर, अलापल्ली, गडचिरोली व सातपुडा पर्वतराजीमधील मेळघाट, चिखलदरा, धारणी, सीमाडोह, कोलखास येथे साग, साल, बांबू इ. इमारतींसाठी उपयुक्त वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यावेळी प्रथमच भारतात मोठ्या प्रमाणावर वनविकास करण्यासाठी योजनाबद्ध असा वनविकास कार्यक्रम निरनिराळ्या प्रांतात आखला गेला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विकास योजनेचे (फॉरेस्ट वर्किंग प्लॅन प्रोजेक्टचे) आद्यप्रवर्तक श्रीधर बूट हे होते.

        या योजनेचा प्रारंभ महाराष्ट्रात केला गेला आणि चंद्रपूर परिसरात उजाड माळरानात मैलोन्मैल साग, साल, बांबू इ. वृक्षांचे रोपण केले गेले. तसेच मेळघाटातील धारणी, सीमाडोह या विभागात साग, बाभूळ इ. वृक्षांचे रोपण व संवर्धन करण्यात आले. मेळघाट व चंद्रपूर या दोन्ही भागात साग, साल, बांबू व तत्सम महत्त्वाची वनराजी विकसित झाल्याने त्यातून उत्पन्न होणारे इमारती लाकूड व त्यावर आधारित कागद कारखाने व अन्य उद्योगधंदे यांची भरभराट झाली.

       देशभरातील वनांचा विकास, वनआधारित उद्योग, त्यातून होणारा आर्थिक लाभ व सर्वांगीण वनविकासासाठी ‘वनविकास महामंडळ’ स्थापण्याच्या कल्पनेचे श्रेयही श्रीधर बूट यांना जाते. त्यांच्या कारकिर्दीत १९७० मध्ये ‘महाराष्ट्र वनविकास मंडळ’ स्थापन झाले.

       भारत सरकार व महाराष्ट्र सरकारनेही इतर प्रगत देशातील वनविकासाचे निरीक्षण व अभ्यास करण्यासाठी त्यांना अनेक वेळा परदेशात पाठविले. जागतिक ‘एफएओ’ आणि ‘कोलंबो प्लॅन’ या संस्थांच्या आधिपत्याखाली विदेशात अभ्यास दौर्‍यावर भारताचा प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

        जंगलविकासासाठी भरविलेल्या निरनिराळ्या सभा, समित्या व संमेलनांचे श्रीधर बूट यांनी अनेकदा अध्यक्ष-पद भूषविले. त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले. १९८१-८२ मध्ये महाराष्ट्रातील उजाड प्रदेशांचे व ओसाड टेकड्यांचे वनीकरण करणार्‍या समितीचे ते अध्यक्ष होते.

       श्रीधर बूट यांचे प्रशासकीय कार्य, वनविकासाचा अभ्यास, महाराष्ट्र राज्याची वनसमृद्धी व त्यावर आधारित उद्योगांची उन्नती व महाराष्ट्राला तसेच पर्यायाने देशाला मिळवून दिलेला महसुलाच्या रूपाने आर्थिक लाभ या सर्व कार्यासाठी भारतीय वन संस्था (सोसायटी ऑफ फॉरेस्टस्) यांच्या वतीने दि.७ नोव्हेंबर १९९४ रोजी डेहराडून येथे त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. देशातील फक्त पाच लोकांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

        प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात सुंदर फुलझाडे लावून सुशोभीकरणाची कल्पना श्रीधर बूट यांची होती. येथील पर्यटनस्थानी ‘प्रताप गार्डन’ विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. श्रीधर बूट यांनी मेळघाट विभागात ‘कोलखास’ या ठिकाणी  शिल्पा नदीसमोर मोठे आधुनिक विश्रामधाम बांधले. तसेच ‘ताडोबा’ अभयारण्यात पर्यटकांसाठी पंचतारांकित विश्रामगृह उभे केले. मुंबईत बोरिवलीतील ‘उपवन’ विकसित करण्यात श्रीधर बूट यांचा मोठा वाटा होता. तसेच तेथून जवळच तुलसी, विहार व पवई या तिन्ही सरोवरांच्या सानिध्यात अत्याधुनिक विश्रामधामसुद्धा बांधले.

       सुंदर कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याचा तसेच फुले व फुलझाडांचा श्रीधर बूट यांना छंद होता. तसेच छायाचित्रे काढण्याची आवड होती. श्रीधर बूट यांचे पुणे मुक्कामी निधन झाले.

- आशा बापट

बूट, श्रीधर सदाशिव