Skip to main content
x

भागवत, भास्कर रामचंद्र

     भास्कर रामचंद्र भागवत या बालसाहित्य लेखकाचा जन्म इंदूर येथे झाला. शालेय शिक्षण पुणे, जळगाव व धुळे येथे झाल्यावर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला घेतले. आकाशवाणीत वृत्त अनुवादक व निवेदक म्हणून त्यांनी काम केले. ‘प्रकाश’ साप्ताहिकासाठी साहसप्रेमी भागवतांनी काबालींच्या उघड्या विमानातून प्रवास केला. विमानात वैमानिक आणि भागवत, असे दोघेच होते. प्रवासात, सहलीत अडचणी, फजिती उडविणारे प्रसंग आले की त्यांना गंमत वाटे आणि तो अनुभव त्यांच्या विशिष्ट हातोटीने ते शब्दबद्ध करून आपल्या प्रिय बालवाचकांना ते भरभरून देत.

     आयुष्यभर भरपूर, विविध प्रकारचे लेखन करून त्यांतल्या प्रत्येक लेखन प्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्याचे दुर्मीळ असे साहित्यगुणसंपन्न असलेले भा.रा. भागवत किशोरांच्या गळ्यातले ताईत होते. भागवतांना लहानपणापासून साहस, रहस्य आणि विनोद या गोष्टींची आवड होती. शाळकरी वयातच त्यांनी एक रहस्यकथा लिहिली होती. त्यांचा विनोद वाचकप्रिय होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो कुठल्याही व्यक्तीवर वा व्यक्तिगत व्यंगावर प्रहार करीत नाही; तर एखाद्या प्रवृत्तीला, पद्धतीला, समाजातल्या विक्षिप्त रीतीभातींना कोपरखळ्या मारून वाचकांना खुसखुशीत हास्याचा रसास्वाद घडवितो. स्वतःपासूनच सगळीकडे विनोद शोधण्याची भागवतांची प्रकृती व प्रवृत्ती असल्याने त्यांच्या विनोदी लेखनाला मर्यादा नाहीत. स्वतःच्या जीवनातील प्रसंग, भेटलेली माणसे, त्यांचे अनुभव गांभीर्याने न घेता ते खेळकरपणे व सहजपणे प्रस्तुत करतात. दैनंदिन जीवनातल्या अडचणीतून, साहसातून मजा घेत ते विनोद साधतात. ते विचारतात, ‘भागवत’ शब्दाचा अर्थ ठाऊक आहे? ‘भागवत’ म्हणजे ‘भाड्याने गवत वाहणारे तट्टू!’ यातून त्यांच्या मनाचा निकोप व निखळपणा प्रत्ययास येतो.

     शाब्दिक कोट्यांची त्यांना जबरदस्त आवड! त्यांची शीर्षकेच त्यांच्या खेळकर, विनोदी प्रवृत्तीची चुणूक दाखवतात. ‘बुक लव्हर’ ला त्यांनी ‘बुकलवार’ बनविले.‘जीवननाट्याची एैशीतैशी’, ‘मुद्रण पिशाच्च’ इत्यादी पुस्तके त्या वृत्तीची साक्ष देतात. श्री.वि.स. खांडेकरांनी त्यांच्यातली खुबी ओळखून म्हटले आहे, “श्री.भागवत यांच्या ‘वैतागवनातील वाफार्‍यात’ सापडलेला वाचक हसतमुखाने बाहेर येईल यात शंका नाही. शाब्दिक कोट्यांपासून ते उपरोधापर्यंतचे विनोदाचे सर्व प्रकार श्री.भागवतांना अवगत असून मुंबईतील सामान्य मनुष्याच्या कोंडमार्‍याचे वर्णन करताना आपल्या विनोद शक्तीचा उपयोग त्यांनी कौशल्याने केला आहे. स्त्रीदाक्षिण्य, वक्ते, श्रोते व व्याख्याने इत्यादी विषय निवडण्यात लेखकाची मार्मिकता दिसून येते. कॅ. लिमये व चिंतामणराव जोशी यांच्या लेखनाची परंपरा भागवत चांगल्या रीतीने चालवू शकतील.”

     भागवतांनी बर्‍याच इंग्रजी रहस्यकथांची भाषांतरे केली, स्वतंत्र कथाही लिहिल्या. मराठी वाचकांसाठी अत्यंत आकर्षक असे बालवाङ्मय त्यांनी सातत्याने निर्माण केले. चतुर, खेळकर, धडपडत राहणारा ‘फास्टर फेणे’ मुलांचा जानी दोस्त. फास्टर फेणेच्या कथा त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यांनी ‘विझार्ड ऑफ ओझ’ या परीकथेचे ‘पाचूनगरीत जुई’, ‘रॉबिन हुड’चे ‘जाईची नवलकहाणी’ ही उत्कृष्ट भाषांतरे करून त्यांना देशी साज दिला. ‘अ‍ॅलिस इन वन्डर लॅन्ड’चेही भाषांतर केले. भागवतांचे कुमार नायक मोठ्यांनाही भावतात. भागवतांची भाषा खेळकर, नर्म विनोदी, मुलांच्या बोलण्यासारखी असून शैली रेखीव तशीच गतिमान आहे. शब्दांच्या कोट्यांमुळे कवी मोरोपंत भागवतांना आवडतात. भागवतांनी वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात ‘सकाळ’पासून केली. चेस्टरटन, वुडहाउस हे त्यांचे आवडते लेखक. वि.सी. गुर्जरांच्या प्रेमकथाही त्यांना आवडत. विज्ञानाची आवड असणार्‍या भागवतांनी उडत्या तबकड्यांच्या युगात ‘उडती छबकडी’ वाचकांसमोर ठेवली. ज्यूल व्हर्नच्या डझनभर कादंबर्‍यांचा त्यांनी अनुवाद केला पण, शास्त्रीय माहिती आत्मसात करूनच! ‘मधुचंद्र मनमाडला’ ही अतिशयोक्त फार्सिकल ढंगाची श्रुतिका त्यांनी आकाशवाणीसाठी लिहिली. १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात भागवत विसापूरच्या तुरुंगात सुमारे दोन वर्षे होते. तेथे त्यांनी ‘मुद्रण पिशाच्च’ कादंबरी लिहायला घेतली. ती पूर्ण होण्यापूर्वी त्यांची कारागृहातून मुक्तता झाली व ती अपूर्णच राहिली. बालविश्वातल्या नाजूक विनोदाला भागवतांनी किती हळुवारपणे शब्दबद्ध केले आहे त्याची एक चुणूक पाहा:

     ‘उंद्रोबा उंद्रोबा भागलास का

     चहाच्या किटलीत लपलास का...’

     स्वतः प्रेमात पडण्याच्या वयात भा.रा. भागवतांनी ‘दुसर्‍यांच्या प्रेमकथांची भंबेरी उडालेली कशी लिहिली’ हे त्यांच्या पत्नी लीलावतींना कधीच न उलगडलेले कोडे होते. विविधरंगी निर्मिती करीत राहून मुलांना रमविणारा लेखक म्हणून भा.रा. भागवतांचे नाव घेतले जाते

‘     फास्टर फेणे’ मालिका, (१ ते २० पुस्तके).‘शाबास शेरलॉक होम्स’ (१ ते ५ पुस्तके), ‘बिपिन बुकलवार सांगतो आहे’ (१ ते ७ पुस्तके), ‘मायापुरचे रंगेल राक्षस’ हे भा.रा. भागवत यांचे महत्त्वपूर्ण साहित्य आहे.

     - वि. ग. जोशी

भागवत, भास्कर रामचंद्र