Skip to main content
x

भागवत, दुर्गा नारायण

     दुर्गा नारायण भागवत यांचा जन्म इंदूर (म.प्र.) येथे मोठ्या, एकत्र कुटुंबात झाला. वडिलांचे वडील बाळाजी आबाजी भागवत हे वकील व त्या वेळी इंदूर संस्थानात दिवाण होते. १९१५ साली भागवत कुटुंबाचे मुंबईस स्थलांतर झाले. १९२० ते १९३० या काळात दुर्गाबाई काही दिवस नगर, नाशिक येथे राहिल्या; तरी १९३० सालापासून शेवटपर्यंत मुंबईला, गिल्डरलेन येथेच त्यांचे वास्तव्य होते.

     आई लक्ष्मी यांचा मृत्यू खूप लवकर, १९१९ साली झाला. दुर्गा व तिन्ही लहान भावंडे (डॉ. कमल सोहोनी, विमल गोडबोले व डॉ. राजाराम भागवत) आजी-आजोबा व आत्या सीताबाई यांच्याजवळ वाढली. भागवत कुटुंब उदारमतवादी, देशप्रेमी, सुशिक्षित मूल्यनिष्ठा असणारे, स्वाभिमानी कुटुंब होते. दुर्गाबाईंचे वडील वैज्ञानिक होते. त्यांनी वनस्पती तूप तयार करण्याचा भारतातील पहिला यशस्वी प्रयोग केला. त्या राष्ट्रपातळीवरील टेनिस चॅम्पियन होत्या.

     दुर्गाबाईंचे शालेय शिक्षण गावदेवीची मराठी शाळा, सेंट कोलंबा आणि नगर व नाशिकच्या हायस्कूलमध्ये झाले. १९२७ साली नाशिक हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा त्या प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. मॅट्रिकनंतर त्यांनी मुंबईला सेंट झेवियर्स महाविद्यालयात, कलाशाखेकडे प्रवेश घेतला. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ त्या वेळी भरात होती. त्यात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी १९२९ साली कॉलेज सोडले. पण घरात आर्थिक परिस्थिती फार बिकट झाल्याने शिक्षण पूर्ण करण्याची आवश्यकता वाटून त्यांनी १९३० साली पुन्हा कॉलेजात प्रवेश घेतला. १९३२ साली त्यांनी संस्कृत व इंग्रजी घेऊन बी.ए.ची पदवी प्रथम वर्गात संपादन केली. पुढे लगेच एम.ए.साठी त्यांनी बौद्ध भिक्षूंच्या मठजीवनाशी संबंधित असा विषय घेतला. त्यांनी त्यावर संशोधन करून प्रबंधलेखनाद्वारे एम.ए. पूर्ण केले (१९३५). या वेळी अर्धमागधी व पाली या भाषांचा अभ्यास करून त्यांनी बौद्ध वाङ्मय मुळातून वाचले. देशीपरदेशी अभ्यासकांनी त्यांच्या प्रबंधाची वाखाणणी केली.

     त्यानंतर त्यांनी डॉ. जी.एस. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विषयात या आदिवासी समस्या आणि ‘आदिवासी व हिंदुधर्म यांचे नाते’ यावर संशोधन करण्यास आरंभ केला. त्यांनी मध्य भारतातील आदिवासी भाग स्वतः अभ्यासदौरे करून पिंजून काढला. गोंड व इतर आदिवासींच्या बोलीभाषा त्यांनी शिकून घेतल्या. १९४०-१९४१ च्या शेवटच्या दौर्‍यात त्यांना विषबाधा झाली. पुढे सात-आठ वर्षे त्यांना अंथरुणाला खिळून राहावे लागले. संशोधन पूर्ण होऊन निष्कर्ष हाती आले होते. प्रबंधलेखनाचे बरेचसे काम झाले असूनही पूर्ण करता न आल्याने त्यांची पदवी हुकली. मिळालेल्या शिष्यवृत्तीचे सगळे पैसे त्यांनी आपणहून विद्यापीठाला परत केले.

     यश, पदवी, प्रकृती या सार्‍यांनी पाठ फिरवली, तेव्हा निसर्गाचे सान्निध्य व वाचन यांनी त्यांना संजीवनी लाभली. या कठीण काळातही ज्ञानलालसा, उच्च दर्जाची मूल्यनिष्ठा, निःस्पृहपणा हे त्यांच्या व्यक्तित्वातले दुर्मीळ गुण प्रकर्षाने अनुभवास आले.

     यानंतर आयुष्याचे वळण बदलले. विषबाधा एवढी तीव्र होती, की रूढ चाकोरीबद्ध आयुष्य जगणे शक्य नव्हते. वडिलांनी मुलीचा उदरनिर्वाह साधेपणाने होईल एवढी तरतूद केली आणि तिने लेखनावर लक्ष केंद्रित करावे असे सुचवले. यामुळे दुर्गाबाईंनी नोकरी कधीच केली नाही. फक्त १९५७ ते १९५९ या दोन वर्षांत त्यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये, समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम केले.

     १९५० साली सानेगुरुजींच्या आग्रहावरून त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकात लिहायला सुरुवात केली. पहिला लेख ‘वाळूतील पावले!’ यातूनच पुढे बारा महिन्यांचे, सहा ऋतूंचे बदलते रूप दाखवणारे ‘ऋतुचक्र’ (१९५६) शब्दबद्ध झाले. मराठीतील हे त्यांचे पहिले, स्वतंत्र ललितलेखन होय.

     १९५० सालानंतर पुढे तीस-पस्तीस वर्षे त्यांचे स्वतंत्र लेखन ललितगद्य या वाङ्मयप्रकारातच झाले. मराठी वाङ्मयातील त्या वेळेपर्यंतच्या ललितगद्यलेखनाचा साचेबंद आकृतिबंध त्यांनी मोडला आणि नवीन, मुक्त, विकसित होणारा असा घाट त्याला दिला. या वाङ्मयप्रकाराला त्यांनी नवीन परिमाणे देऊन तो बहरास आणला. कुसुमावती देशपांडे व इरावती कर्वे यांच्या ललितलेखनातून ज्याच्या अस्पष्ट खुणा जाणवत होत्या, त्या मुक्त, आत्मनिर्भर वृत्तीचा रम्य आविष्कार या ललित लेखनात दिसतो. दुर्गाबाईंचे ललितलेखन हे अजोड व त्या प्रकारात एकमेव म्हणावे असे ठरले. कारण, त्यातील विषयवैविध्य, भरपूर व्यासंगातून आलेली संदर्भसंपन्नता आणि चिंतनशील वृत्तीचा आविष्कार, त्यातील भावगर्भ, नादपूर्ण, लयबद्ध व चित्रमय शब्दकळा आणि प्रसन्न, मुक्त भाववृत्ती ही दुर्गाबाईंची खास वैशिष्ट्ये होत. त्यामुळे वाङ्मयीन दृक्प्रत्ययवादी शैलीचे मनोरम आविष्करण मराठीत प्रथमच अनुभवास आले. ‘भावमुद्रा’ (१९६०), ‘व्यासपर्व’ (१९६२), ‘रूपरंग’ (१९६७), ‘पैसे’ (१९७०), ‘डूब’ (१९७५), ‘प्रासंगिका’ (१९७५), ‘लहानी’ (१९८०) हे त्यांचे ललितलेखसंग्रह आहेत. मराठी ललितलेखनाला गतिशीलता देणारे, या प्रकारचे विकसित रूप दाखवून अंतर्मुख करणारे असे हे दर्जेदार लेखन आहे.

     ‘ऋतुचक्र’, ‘भावमुद्रा’, ‘रूपरंग’, ‘व्यासपर्व’ व ‘डूब’ यांना राज्यशासन पुरस्कार, तर ‘पैसे’ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

     लोकसाहित्य हे एक व्यापक, विस्तृत अभ्यासक्षेत्र आहे आणि महाराष्ट्राचे हे संपन्न संचित आहे याची अभ्यासकांना जाणीव करून देण्याचे ऐतिहासिक कार्य दुर्गाबाईंच्या ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ (१९५६) या पुस्तकाने प्रथम केले. ‘धर्म आणि लोकसाहित्य’ (१९७५) या आणखी एका स्वतंत्र पुस्तकाबरोबरच रवींद्रनाथ टागोरांच्या ‘लोकसाहित्य’ (१९६७) याचा त्यांनी अनुवाद केला. ‘महानदीच्या तीरावर’ (१९५३), ‘तुळशीचे लग्न’ (१९५७) या नावलिका ‘पूर्वा’ (१९५७), ‘बालजातक’ (१९९०) ‘पाली प्रेमकथा’ (१९५३) हे कथासंग्रह, आणि आदिवासींच्या परंपरा, कथा, रीतीरिवाज यांवरील शोधनिबंध म्हणजे बाईंच्या लोकसाहित्यविषयक संशोधनाचे फलित आहे. याबरोबरच संपूर्ण भारतातील राज्यांमध्ये, विविध भाषांमध्ये प्रचलित असलेल्या लोककथा त्यांनी मराठीत आणल्या. त्यांचे ४० भाग प्रसिद्ध झालेले आहेत.

     लोककथांच्या अनुवादाबरोबरच ‘तत्त्वचिंतक हेन्री डेव्हिड थोरो’ यांचे निबंध (१९६८), ‘वॉल्डनकाठी विचार विहार’ (१९६५) हे पुस्तक व त्यांचे चरित्र (१९६९) अनुवादित करून त्यांनी या तत्त्वचिंतकाची समग्र ओळख मराठी वाचकांना करून दिली. आणखी महत्त्वाचे दोन अनुवाद त्यांनी केले. ‘सिद्धार्थजातका’ तील ५४७ जातकांपैकी ५४४ जातककथा त्यांनी मूळ पाली भाषेतून मराठीत अनुवादिल्या. त्या सात खंडामध्ये प्रसिद्ध आहेत. संस्कृत कवी बाणभट्ट याची ‘कादंबरी’ ही प्रचंड मोठी, गुंतागुंतीच्या भाषाशैलीतील कलाकृती त्यांनी नऊ वर्षांच्या परिश्रमांनंतर मराठीत आणली व त्याचा प्रस्तावना खंड ‘रसमयी’ नावाने स्वतंत्रपणे लिहिला.

     ज्ञानकोशकार डॉ. केतकर यांच्या कादंबर्‍यांची समीक्षा त्यांनी ‘केतकरी कादंबरी’त केली (१९६७).

     ‘अस्वल’ (१९८२) हे ‘प्राणिगाथा’ या संकल्पित मालेतील एक पुस्तक व ‘कदंब’ (१९९३) हे ‘वनदा’ या संकल्पित मालेतील एक पुसतक ही त्यांच्या संशोधनाची, व्यासंगाची साक्ष देणारी पुस्तके आहेत. या माला पुढे अपूर्ण राहिल्या.

     १९७५ साली भारतात आणीबाणी जाहीर झाली. सर्व प्रकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी घालणार्‍या आणीबाणीचा जाहीर निषेध तर त्यांनी केलाच; पण शासनाचा निषेध म्हणून तेव्हापासून शेवटपर्यंत, त्यांनी कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही, आणि प्रसार-माध्यमांवर बहिष्कार घातला. जनतेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पाच महिने तुरुंगवासही भोगला. १९७५ साली कर्‍हाड येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष झाल्या. या अध्यक्षपदावरून त्यांनी स्वातंत्र्याचा उद्घोष केला. आणीबाणी दूर व्हावी, आविष्कार स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या शब्दसामर्थ्याचा वापर करीत त्यांनी जनजागृती केली. ‘शासन, साहित्यिक व बांधीलकी’ (१९८८) यासारख्या वैचारिक पुस्तकातून, ‘मुक्ता’ (१९७७), ‘सत्यं, शिवं, सुंदरम्’ (१९७८), ‘जनतेचा सवाल’, या भाषणसंग्रहातून त्यांची याबाबतची वैचारिक भूमिका व स्वातंत्र्यप्रियता स्पष्ट होते.

     मराठीबरोबरच त्यांनी इंग्रजीतून ही लेखन केले. ‘सात पुस्तके, दहा शोधनिबंध असे हे लेखन आहे, यातील शोधनिबंध व लेख परदेशातील नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले.’ बौद्ध वाङ्मय, धर्म, लोकसाहित्य या त्यांच्या अभ्यासविषयांशी संबंधित व त्यांवर आधारित असे हे लेखन आहे. यांत मानववंशशास्त्र व भाषाशास्त्र या विषयांवरचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, विषयाचे प्राथमिक स्वरूप स्पष्ट करणारे एक-एक पुस्तक आहे.

     ज्ञानकोशकार केतकर यांच्या काही लेखांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला आणि आवश्यक तेथे स्वतः टिपणे लिहून ‘Hinduism and its Place in the New World’ (१९४७) हे पुस्तक प्रकाशित केले. प्रसिद्ध विचारवंत व समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत या आपल्या चुलतमामेआजोबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या असंकलित, उपेक्षित वाङ्मयाचे संकलन व संपादन करून त्यांनी पाच खंडांत ते प्रसिद्ध केले. त्यांनी स्वतः एक प्रस्तावना खंडही त्याला जोडला.

     जवळपास शंभरावर अनुवादित, स्वतंत्रपणे संपादित, संशोधित ग्रंथांचे लेखन करणार्‍या दुर्गाबाईंनी अगदी तरुणपणी रवींद्रनाथांची गीतांजली संस्कृतात अनुवादित केली होती, प्रेमकविता लिहिल्या होत्या आणि अमरकोशाच्या धर्तीवर समानार्थक शब्दांचा कोशही तयार केला होता. परंतु, हे सारे लेखन मनासारखे जमले नाही असे वाटून ते त्यांनी स्वतःच नष्ट केले होते.

     १९५८ साली ‘सन्माननीय लेखिका’ म्हणून त्यांनी रशियाला भेट दिली होती. १९८८ साली जर्मनीत हेडलबर्ग येथे झालेल्या ‘भारतातील लोककला’ या विषयावरील चर्चासत्रासाठी खास, सन्माननीय अध्यक्षा म्हणून त्यांना निमंत्रित केले गेले होते.

     मुंबई उपनगरातील बोरिवली येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘दुर्गा भागवत शब्द पुरस्कार’ दिला जातो. अनुवाद, ललितलेखन व वैचारिक लेखन यांतील उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी हा पुरस्कार आहे.

     समाजशास्त्र, लोकसाहित्य, अनुवाद, समीक्षा, ललितलेखन या सर्वच क्षेत्रांत त्यांच्या संशोधनाचा, व्यासंगाचा व आशयगर्भ, नादमधुर शैलीचा प्रभाव निर्माण झाला. ज्ञानार्जनाची लालसा, सनातन विषयांचा शोध घेण्याची ओढ, चिंतनशीलता, स्वातंत्र्यप्रियता, बाणेदारपणा आणि भाषाप्रभुत्व यांमुळे त्यांचे वाङ्मयीन व लौकिक व्यक्तित्व समाजमनावर ठसा उमटवून गेले.

     - डॉ. मीना वैशंपायन

भागवत, दुर्गा नारायण