Skip to main content
x

भागवत, श्रीराम विनायक

         स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उदयास आलेल्या पशुवैद्यकीय पदवीधरांच्या पिढीमध्ये ‘जनावरांच्या रोगनिदानासाठी प्रयोगशाळांची उभारणी’ हा ध्यास घेऊन अशा प्रयोगशाळा उभारण्यासाठी, त्या अद्ययावत करण्यासाठी, तेथे प्रशिक्षित वैज्ञानिकांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपला कार्यकाल कारणी लावणारे मान्यवर नाव म्हणजे श्रीराम विनायक भागवत. त्यांचा जन्म पुणे येथे जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सुमनताई होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटरमिजिएट सायन्स १९४७मध्ये उत्तीर्ण झाल्यावर मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९५१मध्ये बी.एस्सी. (पशुवैद्यक) पदवी प्राप्त केली आणि तत्कालीन मुंबई प्रांताच्या पशु-संवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा करण्यास प्रारंभ केला. पुणे जिल्ह्यातील भोर-वेल्हा परिसर त्या काळात अतिदुर्गम व शेती व्यवसायात मागास प्रदेश समजला जात होता. भागवतांनी १९५१-५८ या सात वर्षांत या परिसरात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. स्थानिक दवाखान्यात आजारी जनावरांची हजेरी फारशी नसल्याने भागवत आजूबाजूच्या भागात फिरून पशुपालकांना जनावरांचे आजार व तत्संबंधी माहिती देत असत. तळीतलाव असलेल्या पाणथळ ठिकाणी गोगलगायी मोठ्या प्रमाणावर असतात आणि जनावरात आढळणाऱ्या बऱ्याच परोपजीवी जंतांचे वास्तव्य गोगलगायीमध्ये असते. गायी-म्हशीत आढळणारा घोरण्याचा आजार (स्नोअरिंग डिसीज) हा असाच गोगलगायींमधून येणारा रोग असून या रोगाचे जंत जनावरांच्या नाकपुडीतील रक्तवाहिन्यात वाढतात. ज्यामुळे नाकपुडीत सूज आणि श्‍वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होतो. या रोगाची बाधा झालेले जनावर खंगून मरण पावते. त्या काळी या रोगावर विशिष्ट उपचार उपलब्ध नव्हते. डॉ. भागवतांनी या रोगावर जनप्रबोधन करून दूषित पाणीपुरवठ्यापासून जनावरांना दूर ठेवण्यास पशुपालकांना मार्गदर्शन केले.

         स्तनदाह किंवा काससूज हा दुभत्या जनावरांचे शारीरिकदृष्ट्या आणि दुग्धव्यावसायिकांचे आथिर्र्क दृष्ट्या प्रचंड नुकसान करणारा रोग म्हणून जगभर ओळखला जातो. प्रामुख्याने जिवाणूजन्य असलेला हा रोग सुप्त आणि दृश्य या दोन स्वरूपात आढळतो. सुप्त स्तनदाह वेळीच ओळखला तर त्याचे दृश्य अथवा तीव्र स्वरूपात रूपांतर होत नाही व आर्थिक नुकसान टाळता येते. मात्र सुप्त स्तनदाह ओळखण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या आवश्यक असतात. केंद्र सरकारने स्तनदाह नियंत्रण योजना १९५०च्या सुरुवातीला देशभर लागू केली. मुंबई पशुुवैद्यकीय महाविद्यालयात मुंबई राज्यातील पहिले केंद्र  सुरू करण्यात आले. पुढे या योजनेचा विस्तार राज्याच्या पुणे आणि नागपूर विभागांत करण्याचे ठरले. डॉ. भागवत  हे पुणे येथे १९५८मध्ये स्थापन झालेल्या केंद्राचे पहिले संशोधन अधिकारी होते.

          स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात ‘बुळकांडी’ रोगाने देशात हाहा:कार माजवल्याने केंद्र शासनाने १९५४ मध्ये राष्ट्रीय बुळकांडी उच्चाटन योजना सुरू केली. मुंबई राज्यातील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी या योजनेत हिरिरीने भाग घेऊन उत्तर कर्नाटक आणि गुजरातसह संपूर्ण महाराष्ट्रात या रोगाचे समूळ उच्चाटन करून १९५४-५९ या काळात इतिहास घडवला. मात्र १९५९-६१च्या दरम्यान ‘साऊथ आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ (एस.ए.एच.एस.) या अश्‍ववर्गीय जनावरांच्या रोगाने महाराष्ट्रात घोड्यांचा प्रचंड संहार घडवून आणला. पुणे, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार भागांत काही महिन्यांतच सुमारे अठ्ठावीस हजार घोडे-गाढवे मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली. क्सुलेक्स जातीच्या डासांच्या माध्यमातून हा रोग पसरत असल्याने या रोगाचा अतिशय वेगाने प्रसार झाला. डॉ. भागवत यांनी घोड्यातील या रोगाच्या निदानासाठी रोगअन्वेषण प्रयोगशाळेतील कामात मोठा वाटा उचलला. रोगनिदान पक्के झाल्यावर या रोगावर उपलब्ध असलेली लस परदेशातून मागवून पुढील अश्‍वसंहार टाळण्यात यश मिळाले. पुन्हा हा रोग महाराष्ट्रात वा देशातही इतरत्र फारसा आढळला नाही.

         गोवा व मुंबई येथे १९६१मध्ये अचानक डुकरांचे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. प्रत्येक आजारी डुक्कर कोणत्याही उपायांना दाद न देता मरत होते. एकंदर लक्षणावरून हा ‘स्वाईन फीव्हर’ नावाचा विषाणुजन्य रोग असावा हे अनुमान काढण्यात आले. हा रोग कसा उद्भवला याचा शोध घेणे हा पुण्यातील रोगअन्वेषण प्रयोग शाळेसमोरचा यक्षप्रश्‍न होता. आतापर्यंत या रोगाची लागण केवळ युरोपिअन देशातच आढळत होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरात जिथे डुकरे पाळली जातात त्या डुकरांना हॉटेलमधील वाया जाणारे अन्न मोठ्या प्रमाणावर खाऊ घातले जाते. मोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये परदेशी प्रवाशांसाठी परदेशातून डबाबंद अन्न मागवले जाते. या अन्नातून हा विषाणू भारतात आला आणि हॉटेलमधील वाया गेलेल्या अन्नातून डुकरांच्या पोटात शिरला असा तर्क ज्या पशुवैज्ञानिकांनी लढवला आणि शेवटी तो खरा ठरला त्या पशुवैज्ञानिकांपैकी एक डॉ. भागवत हेही होते. याही वेळेस सुरुवातीला परदेशातून लस आणवून साथ आटोक्यात आणली गेली आणि हॉटेलमधील वाया जाणारे अन्न डुकरांना खाऊ घालू नका हा संदेश वराहपालकांपर्यंत पोहोचवला गेला. भारतात प्रथमच उद्भवलेल्या या दोन साथींचा यशस्वी मुकाबला करण्यात डॉ. भागवत यांचा सहभाग प्रशसंनीय होता.

         पशु-रोगअन्वेषण प्रयोगशाळांची उपयुक्तता लक्षात घेता केवळ पुणे स्थित मध्यवर्ती प्रयोगशाळा अपुरी पडत असल्याची जाणीव शासनाला होऊन मराठवाडा आणि विदर्भ विभागासाठी प्रादेशिक पशु-रोगअन्वेषण प्रयोगशाळा निर्माण करण्याचा निर्णय झाला आणि अशी प्रयोगशाळा औरंगाबाद येथे स्थापण्यासाठी डॉ. भागवत यांची निवड करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात डॉ. भागवत यांनी ब्रिटिश शिष्यवृत्तीखाली पशु-रोगअन्वेषणाचा एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यांनी १९६३मध्ये औरंगाबाद येथील प्रादेशिक संस्था कार्यान्वित केली. ही प्रयोगशाळा स्थापण्यासाठी त्यांना स्तनदाह, साऊथ आफ्रिकन हॉर्स सिकनेस, स्वाईन फीव्हर या रोगांवरील संशोधनांचा अनुभव आणि इंग्लंडमधील प्रशिक्षणाचा पूर्ण उपयोग झाला. औरंगाबाद पशु-रोगअन्वेषण प्रयोगशाळेत कार्यरत असताना त्यांच्या संशोधनवृत्तीचे नवनवे आयाम समोर आले.

         औरंगाबाद शासकीय रुग्णालयात धनगरांच्या एकाच कुटुंबातील चारपाच जण चढणारा-उतरणारा ताप आणि गुडघेदुखीने त्रस्त होते. योग्य रोगनिदान न झाल्याने उपचार अयशस्वी ठरत होते. आपल्याच कळपातील शेळ्या-मेंढ्यांचे दूध हा या कुटुंबाचा मुख्य आहार होता. तेव्हा कळपातील शेळ्या-मेंढ्याची तपासणी केली असता या कळपामध्ये गर्भपाताचे प्रमाण खूप असल्याचे आढळले. हा गर्भपात सांसर्गिक आणि ब्रुसेल्ला या जिवाणूंमुळे होत असल्याचे लक्षात आल्यावर धनगरांच्या कुटुंबातील आजाराचे कारणही उघड झाले. ‘माल्टा फीव्हर’ या नावाने ओळखला जाणारा हा मानवी रोग रोगट शेळ्या-मेंढ्यांच्या दुधापासून होऊ शकतो, हा संदेश डॉ. भागवतांनी योग्य पद्धतीने मेंढपाळ जमातीकडे पोहोचवला. औरंगाबादेतच एका वराहपालन क्षेत्रावर गर्भपात होणे, मेलेली पिल्ले जन्मणे अगर पिले न जगणे असे प्रकार आढळून आले. डॉ. भागवत यांनी केलेल्या अन्वेषणानुसार ‘लेप्टोस्पायरा पोमोना’ या जिवाणूंमुळे हे घडत होते हे सिद्ध झाले. अ‍ॅमस्टरडॅम येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयोगशाळेत बाधित वराहरक्ताचे नमुने पाठवले असता डॉ. भागवतांच्या संशोधनाला पुष्टी मिळाली आणि भारतात या रोगाची लागण असल्याची नोंद प्रथम करण्याचे श्रेय त्यांना मिळाले. वराहमूत्रातून या रोगाचे जंतू माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्यात रोग निर्माण करतात आणि म्हणून वराहपालन क्षेत्रात काम करणार्‍यांनी सावधान राहावे अशी सूचना त्यांनी दिली. अशी अनेक यशस्वी आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची संशोधने त्यांनी औरंगाबाद येथे केली.

         पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था या पुणे स्थित लसनिर्मिती केंद्राचे प्रमुख म्हणून डॉ. भागवत १९७८ साली रुजू झाले. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यालाही लस पुरवठा करणार्‍या या संस्थेत डॉ. भागवतांनी डॅनिश मदत योजनेखाली उपकरणे आणि यंत्रसामग्री आणवून ‘फ्रीज ड्राईंग’ कार्यक्रमाला बळकटी दिली. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेचा कार्यभार हाताळण्यापूर्वी काही काळासाठी डॉ. भागवत पुण्याच्या रोगअन्वेषण प्रयोगशाळेत जिवाणुशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. शेळ्या-मेंढ्यांत येणार्‍या चक्कर स्वरूप आजारावर संशोधन करून त्यांनी  ‘लिस्टेरिया’ जिवाणूंमुळे हा रोग होतो हे सिद्ध केले.

         डॉ. भागवत यांच्याकडे १९८१मध्ये मुंबई विभागाचे प्रादेशिक पशु-संवर्धन उपसंचालक या पदाचा कार्यभार आला. पूर्णतः प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असताही त्यांनी दापचरी दुग्ध प्रकल्पातील जनावरात यकृत कृमींचा प्रादुर्भाव असल्याचे दाखवून दिले. याच पदावरून डॉ. भागवत १९८४ साली सेवानिवृत्त झाले.

         डॉ. भागवतांनी महाराष्ट्रात रोगअन्वेषण संस्था स्थापनेपासून ते अशा संस्थांच्या बळकटीकरणावर व आधुनिकतेवर सतत भर देत नव्या नव्या रोगांवर संशोधन करून अशा रोगांवर प्रतिबंधक उपाय आणि लसनिर्मिती करण्यासाठीही प्रयत्न केले. केवळ जनावरांना होणाऱ्या रोगांवर संशोधन करूनच डॉ. भागवत थांबले नाहीत तर जनावरांचे हे रोग मानवी आरोग्यालाही घातक आहेत हे ओळखून त्यांनी समाजप्रबोधनाचेही काम केले. पशुवैद्यकीय सेवा ही फक्त जनावरांच्या आरोग्य रक्षणासाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यरक्षणासाठीही उपयुक्त आणि आवश्यक आहे ही संकल्पना एकविसाव्या शतकात दृढ होत असली तरी यापूर्वीच ती अमलात आणणाऱ्या डॉ. भागवतांचे केवळ प्राणिजगतावरच नव्हे; तर मानवजातीवरही अनंत उपकार आहेत. डॉ. भागवत यांच्या असामान्य संशोधन कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे या संस्थेने त्यांचा २०१२मध्ये गौरव केला.

          - डॉ. रामनाथ सडेकर

भागवत, श्रीराम विनायक