Skip to main content
x

भागवत, वसंत यज्ञेश्वर

           संत यज्ञेश्वर भागवत यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव देवळी येथे झाला. यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न होते. पौरोहित्य हे अर्थार्जनाचे साधन होते. यज्ञेश्‍वर यांनी ऐन उमेदीच्या काळात महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यचळवळीत सक्रीय भाग घेतला व वेगवेगळ्या आंदोलनात तीन वेळा तुरुंगवास भोगला. त्यांच्या मातोश्री सत्यभामाबाई यांनी पतीच्या तुरुंगवासाच्या काळात संसाराचा गाडा मोठा मुलगा श्रीधर व दीर शंकर यांच्या आधाराने हाकला. वसंत भागवतांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देवळी, धामणगाव व वर्धा येथे झाले. ते वर्धा येथील क्रॅडॉक विद्यालयातून १९५१मध्ये मॅट्रिक झाले. त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी मिळवली. जानकीदेवी बजाज यांच्याकडून आर्थिक साहाय्य लाभल्यामुळे त्यांनी पुढील अभ्यासक्रम पुणे येथे सुरू केला व वनस्पति-विकृतिशास्त्रात एम.एस्सी.(कृषी) झाले. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर १९६६-६९ या काळात पुणे कृषी महाविद्यालयातून पीएच.डी.ची पदवी मिळवली.

           भागवत यांना १९५७मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असतानाच पुणे येथील कृषी महाविद्यालयात निर्देशक म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी संशोधनाद्वारे पारायुक्त बुरशीनाशक बियाणास लावले तर कपाशीच्या कवडी रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो व असे बियाणे साठवून ठेवले तरीही उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होत नाही, असे निदर्शनास आणले. याचे प्रयोग धुळे, जळगाव, नगर व नाशिक जिल्ह्यात ४००० एकरावर करून त्याची प्रचिती घेण्यात आली, त्यामुळे या रोगाच्या नियंत्रणासाठी ही शिफारस कृषी खात्यामार्फत करण्यात आली. डॉ. भागवतांचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे जमिनीतील सेंद्रीय पदार्थावर अल्पावधीत परिणामकारक क्रिया करणाऱ्या बुरशी व जिवाणूंचा अभ्यास. त्यांची १९६२मध्ये नवीन स्थापन झालेल्या धुळे येथील कृषी महाविद्यालयासाठी साहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी अकोला येथे निरनिराळ्या पदांवर काम केले. या अवधीत डॉ.पं.दे.कृ.वि.ची स्थापना झाली व विद्यापीठाच्या निवड समितीने त्यांची ऑक्टोबर १९७०मध्ये प्राध्यापक म्हणून निवड केली. या काळात त्यांनी दोन विद्यार्थ्यांना एम.एस्सी.साठी व एका पीएच.डी. विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी ज्वारी संशोधन केंद्र, परभणी येथे विकृतिशास्त्रज्ञ म्हणून १९७१-७५ या काळात संशोधन केले. त्यांचे ज्वारीवरील निरनिराळ्या रोगांसंबंधींचे संशोधनपर लेख ‘सोरगम न्यूज लेटर’मध्ये प्रसिद्ध झाले.

           परभणीच्या वास्तव्यातील महत्त्वाची घटना म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठाची निर्मिती व स्थापना झाली. त्याची घडी व्यवस्थित बसावी यासाठी संशोधन कार्याव्यतिरिक्त शिक्षण, प्रशासन, विस्तार कार्य, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी अशा विविध जबाबदाऱ्याही यशस्वीरीत्या हाताळल्या. पं.दे.कृ.वि.त परत आल्यानंतर १९७५मध्ये त्यांची प्रमुख बीज उत्पादन अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी नंतर केंद्रीय संशोधन केंद्र संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे कुलसचिव या पदांवरही कार्य केले. तसेच त्यांनी प्रतिनियुक्तीवर बाबा आमटेंच्या आनंदवन कृषी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून चार वर्षे काम केले. तेथे डॉ. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन प्राध्यापकांनी पीएच.डी. पदवी मिळवली. १९९३मध्ये ते नागपूर कृषी महाविद्यालयातून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.

           निवृत्तीनंतरही त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून मार्गदर्शन केले. शासनाच्या धोरणानुसार सर्व महाराष्ट्रात विना अनुदानित तत्त्वावर कृषी महाविद्यालये स्थापन झाली. त्यांनी रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम केले. तेथे त्यांनी प्रक्षेत्र विस्तार, प्रयोगशाळा, प्रशासकीय उमारत, अभ्यासक्रम या बाबींचे नियोजन करून संशोधन कार्याची घडीसुद्धा बसवून दिली.

- डॉ. आनंद मुकेवार

भागवत, वसंत यज्ञेश्वर