Skip to main content
x

भालेराव, इंद्रजित नारायण

ग्रामीण जीवनाचे अस्सल भावविश्व आपल्या कवितेतून व ललितलेखनातून साकारणारे सिद्धहस्त कवी, ललितलेखक. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत-नगर तालुक्यातील रिधोरा या गावचे मूळ रहिवासी. वडील नारायणराव व आई रुख्मिणीबाई यांनी स्वतः अत्यंत खस्ता खाऊन, त्यांना शिकण्यासाठी बळ दिले. वसमतच्या बहिर्जी नाईक महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण व औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८२ साली बारावीत शिकत असतानाच बालमैत्रीचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन घडविणारा हीराहा लेख लिहून लेखनसेवेला प्रारंभ केला. सध्या परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विसाव्या शतकाच्या अखेरीस शिक्षणाच्या प्रसारामुळे, ग्रामीण युवामत सजग झाले. आपले जगणे शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची ओढ त्यांना लागली. तशातच ग्रामीण साहित्य चळवळ उभी राहिली. विभागीय साहित्य संमेलनांनी या नव्या पिढीला विचारप्रवण केले आणि त्यातून अस्सल ग्रामीण कवितेचे अनेक लवलवते अंकुर उदयास आले. इंद्रजित भालेराव हे त्यांपैकी एक अत्यंत यशस्वी नाव आहे. पीकपाणी’ (१९८९), ‘आम्ही काबाडाचे धनी’ (१९९२), ‘दूर राहिला गाव’ (१९९४) हे अस्सल मातीचा गंध अनुभवायला देणारे कवितासंग्रह त्यांच्या प्रतिभेतून स्फुरले. स्वतः काव्यलेखन करताना ग्रामीण माय-माउल्यांच्या जिभेवर बसणार्‍या लोकगीतांकडेही त्यांनी तेवढ्याच आस्थेने लक्ष दिले आहे. त्यातून समरत’ (१९९०) व उगवले नारायण’ (१९९५) हे लोकगीतांचे संग्रह त्यांनी संपादित केले.

कविवर्य बी.रघुनाथ यांच्या कवितांचे संपादनही त्यांनी केलेले आहे. ग्रामीण बालकांच्या मनोविश्वाचे दर्शन रानमळ्याची वाटया बालकवितासंग्रहाद्वारे त्यांनी घडविले आहे. भिंगुळवाणाही त्यांची कादंबरी त्यांच्या सिद्धहस्त लेखनाची साक्ष देणारी आहे.गाई घरा आल्या’ (१९९७) हा ललितलेखसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातून त्यांनी ग्रामीण जीवनात जिवापाड जपल्या जाणार्‍या मानवी नाट्यांचा वेध विविध अंगांनी घेतला आहे. ग्रामीण जीवनाची वास्तवता, बोलीभाषेचा चपखल वापर, निसर्गाची समृद्धी व त्याचा लहरीपणा, शेतकर्‍यांच्या वाट्याला आलेले जगणे, ग्रामीण जीवनाला व्यापणार्‍या प्रथा, परंपरा, वहिवाटी व ग्रामीण जीवनात जपल्या जाणार्‍या मानवी नाट्यांच्या अनोख्या भावबंधांचे दर्शन त्यांच्या कवितांमधून व ललितलेखांमधून घडते. जन्मजात प्राप्त झालेली सदोष व अपूर्ण समाजव्यवस्था स्वीकारून आणि आपले लहानपण स्वीकारूनही ग्रामीण माणूस त्याच्या अंतरातला माणूसकीचा आणि करुणेचा झरा कसा सांभाळतो, याचे यथार्थ चित्रण त्यांच्या साहित्यविश्वात दिसते.

त्यांचे लेखन बावनकशी सोन्यासारखे असल्याने त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अनंत काणेकर, यशवंतराव चव्हाण, पद्मश्री विखे पाटील, वि.द.घाटे, इत्यादी नामवंतांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत तसेच मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती मिळालेली आहे. शिवाजी विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र टाइम्सच्या दशकातील निवडक पुस्तक योजना, इयत्ता नववीची बालभारती, मराठी विश्ववेचक आणि वेधक, इंडियन लिटरेचर इत्यादींसाठी त्यांच्या पुस्तकांची आणि कवितांची निवड झालेली आहे.

आपल्या अस्सल काव्यातून व ललित-लेखनामधून इंद्रजित भालेराव यांनी ग्रामीण साहित्यविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.

- डॉ. संजय देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].