Skip to main content
x

भातम्ब्रेकर, प्रकाश लक्ष्मणराव

     प्रकाश लक्ष्मणराव भातम्बे्रकर यांचा जन्म निलंग गावी झाला. लातूर, अंबाजोगाई आणि औरंगाबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन ते विज्ञानशाखेचे पदवीधर झाले. राष्ट्रभाषेच्या (पुणे) परीक्षा देऊन ते ‘पंडित’ही झाले (१९६७). बालपणी, संघाच्या शाखेतील संस्कारांमुळे शिक्षणाचे महत्त्व मनावर ठसले होते. बी.ए.(ऑनर्स, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९७२), एम.ए. (हिंदी, राजस्थान, विश्वविद्यालय, जयपूर, १९७४) झाल्यानंतर अजमेरच्या डी.ए.वी. उच्चस्तर माध्यमिक विद्यालयात विज्ञानाचे अध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली (१९६७-१९६८). औरंगाबादच्या दैनिक मराठाचे मुद्रितशोधक (१९६८-१९६९), महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक सचिव (१९६९-१९७२), राजस्थान उद्योग विभागाचे सूचना साहाय्यक (जयपूर, १९७४), युनियन बँक ऑफ इंडिया राजभाषा अधिकारी (१९७६-१९८८), अशा विविध पदांवर कार्य केलेले भातम्ब्रेकर साहित्य अकादमीचे विभागीय सचिव म्हणून मुंबईत स्थिरावले (१९८८-२००७). १९७४ साली प्रेमविवाह केल्यामुळे वेगळा संसार थाटावा लागला, तेव्हा सुरुवातीचे काही दिवस भातम्ब्रेकरांना बेकारीचा अनुभव घ्यावा लागला होता. त्या वेळी पुष्पा भारती यांच्या ‘शुभागता’ या पुस्तकाच्या अनुवादाने त्यांना हात दिला. याच वेळी ‘अनुराधा’ मासिकातूनही त्यांचे अनुवादलेखन चालू होते. अनुवादकार्यात डॉ.बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भातम्ब्रेकरांना त्या काळात झाला.

     भातम्ब्रेकर यांच्या नावावर त्यांनी हिंदीत अनुवाद केलेली ३४ पुस्तके, ९० कथा, २५ कविता आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लिहिलेले जवळपास पावणेदोनशे लेख आहेत. हिंदीतून चार आणि गुजरातीतून पाच पुस्तके त्यांनी मराठीत अनुवादित केली. ही संख्या कमी असली तरी त्यांच्या अनुवादाचा दर्जा कमी नाही. ‘सिंहासन’ व ‘दुर्दम्य’ यांसारख्या कादंबर्‍या हिंदी वाचकांना परिचित करून देण्याचे श्रेय भातम्ब्रेकरांकडे जाते. या कादंबर्‍यांसाठी हिंदीतर भाषक हिंदी लेखक म्हणून त्यांना १९८०-८१ व १९८८-८९ ह्या वर्षांचे भारत सरकारचे पुरस्कार लाभले. याशिवाय, द्विवागीश पुरस्कार (भारतीय अनुवाद परिषद, दिल्ली, १९९२), सांगाती पुरस्कार (सांगाती साहित्य अकादमी, बेळगाव, १९९४), ग.मा. मुक्तिबोध पुरस्कार (हिंदी साहित्यातील कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार, १९९७-९८) ह्या पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले. त्यांच्या ‘अग्निसर्प’ या कथेला ‘सारिका’तर्फे द्वितीय पुरस्कार लाभला (१९८२).

     आंतरराष्ट्रीय कविसंमेलनासाठी रुमानिया येथे निमंत्रित कवी म्हणून उपस्थित राहिल्यावर शेवटच्या वार्षिक सन्मान प्राप्त झालेल्या तीन कवींपैकी भातम्ब्रेकर हे एक होते. हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, रोम, मोनॅको, फ्रान्स, ब्रिटन इत्यादी देशांचा प्रवास त्यांनी केलेला आहे (२०००).

     लेखनाव्यतिरिक्त दूरदर्शनसाठी सूत्रसंचालकाची भूमिकाही भातम्ब्रेकरांनी केलेली आहे आणि आकाशवाणीवर बातम्या देण्याचेही काम केले, आहे.

     - अनुपमा उजगरे

भातम्ब्रेकर, प्रकाश लक्ष्मणराव