Skip to main content
x

भावे, सदाशिव शिवराम

     समीक्षक म्हणून नावलौकिक मिळविणार्‍या सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म रत्नागिरीला झाला. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून १९४८ साली मॅट्रिक झाल्यावर ते पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून क्रमशः १९५२ साली बी.ए. आणि १९५४ साली एम.ए. झाले. नंतर त्यांनी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली. उच्चशिक्षाविभूषित सदाशिवराव सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात मराठी विषयाचे अध्यापन करू लागले.

     प्रा.भावे यांचे समीक्षात्मक लेख ‘साधना’, ‘सत्यकथा’, ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘मौज’, ‘प्रतिष्ठान’सारख्या मराठी व ‘इंडियन लिटरेचर’, ‘इंडियन राइटिंग टुडे’ अशा इंग्रजी नियतकालिकांतून प्रकाशित झाले. तर्कशुद्ध व नेटके प्रतिपादन, वाङ्मयाची अभ्यासपूर्ण जाण यांमुळे त्यांच्या सुमारे तीनशे लेखांनी समीक्षेची एक विशिष्ट उंची गाठली.

     पुणे विद्यापीठ आणि मध्य अमेरिकेतील काही प्रमुख कॉलेजे यांच्या सहकार्याने चालू असलेल्या एका शैक्षणिक उपक्रमात दहा वर्षे (१९६५ ते १९७४चा कालखंड) ते अध्यापक या नात्याने सहभागी झाले. अभ्यागत प्राध्यापक म्हणून भावे यांना अमेरिकेतील मिनेसोटा राज्याच्या मिनेआपोलिस या राजधानीपासून ४० मैल अंतरावरील ‘नॉर्थफील्ड’ खेड्यातील कार्लटन कॉलेजात निमंत्रित केले होते. तेथे जाऊन त्यांनी तिथल्या ज्ञानेच्छू विद्यार्थ्यांना ‘भारतीय साहित्य आणि हिंदू परंपरा’ या विषयाचा परिचय करून दिला.

     ११८ वर्षांची सुदीर्घ परंपरा असलेले हे कार्लटन कॉलेज राज्यातील पहिल्या क्रमांकाचे व देशातील पहिल्या दर्जाच्या निवडक कॉलेजांतील एक म्हणून मान्यता पावलेले आहे.

     अमेरिकेत राहून तेथील समाज, संस्कृती, चालीरीती, परंपरा यांचे अत्यंत बारकाईने व भारताच्या संदर्भात तौलनिक निरीक्षण करून प्राध्यापक भावे यांनी ‘अमेरिका नावाचे प्रकरण’ हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले अमेरिकेचे चित्र भारतातील शिक्षणक्षेत्राला उत्तम मार्गदर्शक होईल यात शंका नाही. भावे यांच्या तर्कशुद्ध व मौलिक चिंतनाची या पुस्तकात प्रचिती येते.

     - वि. ग. जोशी

भावे, सदाशिव शिवराम