Skip to main content
x

भडसावळे, गोविंद धोंडो

           र जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील जाहिरातकला शिक्षण वर्गात शिक्षण घेतलेले गोविंद धोंडो भडसावळे हे पहिले विद्यार्थी होते. उप संचालक चार्ल्स जेरार्ड यांनी १९३५ मध्ये जाहिरातकलेचा पहिला वर्ग सुरू केला. भडसावळे त्या वेळेस या कलासंस्थेत शिकत होते. अभिजात चित्रकला अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात असताना जेरार्ड यांनी भडसावळे यांना जाहिरातकलेचे शिक्षण दिले. याच वेळेस जेरार्ड यांचे सहकारी असलेले आणि पुढे कला संचालक बनलेले व्ही.एन. आडारकर यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले.

           भडसावळे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मेट्रो चित्रपटगृहासाठी भित्तिपत्रके (पोस्टर्स) तयार करण्यापासून केली. त्यांनी सुमारे दहा हजार भित्तिपत्रके या काळात तयार केली. पुढे त्यांनी ‘अजंठा आटर्स अ‍ॅडव्हर्टायझर्स’ या नावाची जाहिरातसंस्था काढली. राज खोसला, बी.आर. चोप्रा, सुनील दत्त अशा नामवंत हिंदी चित्रपटनिर्मात्यांसाठी त्यांनी चित्रपटांच्या जाहिराती तयार केल्या. मराठी चित्रपटक्षेत्रात निर्माते, कलादिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘पहिली मंगळागौर’, ‘विठू माझा लेकुरवाळा’, ‘कमरा नं.९’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. तिथे ते दादा भडसावळे म्हणून प्रसिद्ध होते.

           भडसावळे यांचा काळ हा जाहिरातकलेचा सुरुवातीचा काळ होता. चित्रपटांच्या भित्तिपत्रकांची एक वेगळी शैली रावबहादूर धुरंधरांपासून ते सत्तरच्या दशकापर्यंत विकसित होत गेली. त्यात अभिजात चित्रकला आणि कॅलेण्डर आर्ट यांचा एक आकर्षक मिलाफ होता. भडसावळे या प्रवासामधला एक महत्त्वाचा दुवा आहेत.

- रंजन जोशी, दीपक घारे

भडसावळे, गोविंद धोंडो