भेंडे, उमा प्रकाश
उमा म्हणजे लहानपणीच्या अनसूया श्रीकृष्ण साखरीकर यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी कोल्हापुरातील सर्वसामान्य कुटुंबात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील श्रीकृष्ण साखरीकर हे चांगले लेखक व नाटककार, तर आई रमादेवी ‘प्रभात’ फिल्म कंपनीत कामाला होत्या. अनसूया मेळ्यांमध्ये भाग घेत असताना भालजी पेंढारकर यांच्या बघण्यात आल्या. ‘आकाशगंगा’ या चित्रपटात सुलोचना यांच्यावर चित्रित झालेल्या एका गाण्यात अनसूया यांनाही छोटीशी संधी मिळाली. त्यानंतर माधव शिंदे यांच्या ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली असता अनसूया विशेष उत्साहात होत्या. पण कोल्हापुरात चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी पोस्टरवर आपले नावच नसल्याचे पाहून अनसूया हिरमुसल्या. आपल्याला या चित्रपटातूनच काढून टाकले की काय, असे त्यांना वाटले व त्या हिरमुसल्या. तेवढ्यात चित्रपटाच्या निर्मात्या लता मंगेशकर यांनी अनसूयाची समजूत काढत म्हटले, ‘तुझे नाव मी बदलले आहे, आजपासून तुझे नाव ‘उमा’...’
‘यालाच म्हणतात प्रेम’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘मधुचंद्र’, ‘आम्ही जातो अमुच्या गावा’ अशा काही चित्रपटांतून वाटचाल सुरू असतानाच, राजश्री प्रॉडक्शनच्या ‘दोस्ती’ (दिग्दर्शन सत्येन बोस) या चित्रपटाद्वारे त्या हिंदीतही वळल्या. हिंदीत ‘एक दिल सौ अफसाने’, ‘एक मासूम’, ‘ब्रह्मा विष्णू महेश’, ‘हर हर महादेव’ इत्यादीत भूमिका करताना कोल्हापूूर-मुंबई असे सारखे ये-जा करणे गैरसोयीचे ठरल्याने त्यांनी मराठी चित्रपटावरच लक्ष केंद्रित केले. मराठी चित्रपटसृष्टीतील तेव्हाचे कौटुंबिक भावुक वातावरण त्यांच्या स्वभावाशी व संस्काराशी सुसंगत होते.
१९७४ साली प्रकाश भेंडे यांच्याशी विवाह झाल्यावर त्या मुंबईत शीव येथे मुक्कामास आल्या. मग उमा भेंडे यांनी प्रकाश भेंडे यांच्यासोबतच ‘भालू’, ‘चटकचांदणी’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटांतून भूमिका साकारल्या. ‘कही देबे संदेस’ (छत्तीसगडी), खिलाडी (तेलगू) या अन्य भाषिक चित्रपटातूनही त्यांनी भूमिका साकारल्या.
‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ या चित्रपटासाठी उमा भेंडे यांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला. मराठी चित्रपटसृष्टीविषयक अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांतून आपले पती प्रकाश भेंडे यांच्यासोबत सातत्याने हजेरी लावून उमा यांनी पुढील पिढीतील चित्रपटसृष्टीशीदेखील संबंध कायम ठेवला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने २०१२ सालचा ‘चित्रभूषण’ हा ‘मानाचा मुजरा’ पुरस्कार देऊन उमा प्रकाश भेंडे यांना गौरवण्यात आले. त्यांच्या पंचावन्न वर्षांच्या अभिनय कारकिर्दीतील हा सर्वोच्च क्षण ठरावा.