Skip to main content
x

भगवती, नटवरलाल हरिलाल

       टवरलाल हरिलाल भगवती यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण बडोदा महाविद्यालय आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. १९१४मध्ये ते बी.ए.(ऑनर्स) उत्तीर्ण झाले आणि त्यांना ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली. नंतर १९१६मध्ये ते एलएल.बी. व १९१७मध्ये एम.ए. या परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२१मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९२९ ते १९३१ या काळात ते मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठ अधिसभा आणि सिंडिकेटचे ते अनुक्रमे १९४७ आणि १९४८मध्ये सदस्य होते.

      १९४९मध्ये कायदा शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘बॉम्बे लीगल एज्युकेशन रिफॉर्म कमिटी’मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. नोव्हेंबर १९४९ ते नोव्हेंबर १९५१ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९४९मध्ये मुंबई विद्यापीठ पुनर्रचना समितीचे ते अध्यक्ष होते. ऑगस्ट १९४४मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. नंतर सप्टेंबर१९५२मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयावर जाणारे ते पहिले न्यायाधीश होत. १९५९मध्ये निवृत्त झाल्यानंतर काही काळ ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांचे चिरंजीव प्रफुल्लचंद्र तथा पी.एन.भगवती पुढे १९८५मध्ये भारताचे सरन्यायाधीश झाले.

- शरच्चंद्र पानसे

भगवती, नटवरलाल हरिलाल