Skip to main content
x

भिडे-चापेकर, सुचेता अनिल

‘भरतनाट्यम्’ या दाक्षिणात्य नृत्यशैलीस महाराष्ट्रात लोकप्रिय करणाऱ्या पहिल्या कलाकार, उत्तम नृत्यांगना, विदुषी, गुरू, संशोधक, विचारप्रवर्तक आणि प्रसारक अशा विविध भूमिकांमधून महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत नृत्य पोहोचवण्याचे मूलभूत कार्य करणार्‍या सुचेता भिडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांची आई वीणा या संगीताच्या अभ्यासक होत्या, तर वडील विश्वनाथ भिडे हे उत्तम चित्रकार होते.

लहान वयातच आचार्य पार्वतीकुमार यांच्याकडे सुचेता भिड्यांचे भरतनाट्यम् चे  शिस्तबद्ध शिक्षण सुरू झाले. त्यांच्याच मार्गदर्शनातून तंजावर येथे मराठी राजवटीत लिहिल्या गेलेल्या मराठी काव्यांवर आधारित पहिले भरतनाट्यम् सादरीकरण सुचेता भिडे यांनी केले. पुढे तंजावरमधील गुरू किटप्पा पिल्लै यांच्याकडे अनेक पारंपरिक रचना शिकत असताना नृत्याची सांगीतिक बाजू आणि इतर बारकावे बघण्याची त्यांची दृष्टी तयार झाली.

तंजावरमधील मराठी राजे शहाजी आणि सरफोजी भोसले यांच्या रचनांचे संशोधन, संकलन करून ती काव्ये संगीतबद्ध करून घेऊन त्यांचे सादरीकरण करण्याचे महत्त्वाचे योगदान त्यांनी भरतनाट्यम् शैलीच्या कलाकारांसाठी दिले. महाराष्ट्रातील रसिक भरतनाट्यम् शैलीच्या जवळ येण्यास हे संशोधन आणि सादरीकरण पायाभूत ठरले.

नृत्यसाधनेबरोबरच मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयातून घेतलेला डिप्लोमा, कर्नाटक संगीताचे श्रीमती कृष्णन यांच्याकडील शिक्षण, अथक परिश्रम, जिज्ञासा, अभ्यास या सर्वांमधून त्यांचे नृत्य परिपूर्ण होण्यास मदत झाली. त्यांनी १९६३ साली नृत्याचा पहिला जाहीर कार्यक्रम म्हणजे अरंगेत्रम् सादर केल्यानंतर अनेक नृत्यमहोत्सव, सभा, परिषदा इ. मधून महाराष्ट्र आणि भारतभर, तसेच लंडन, पॅरिस, फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड अशा परदेशांमध्ये कार्यक्रम केले. दूरदर्शन, एज्युकेशन मीडिया रिसर्च यांसाठी नृत्यावरील शैक्षणिक मालिका सादर केल्या.

डॉ.अनिलकुमार चापेकर यांच्याशी १९७४ साली विवाहबद्ध झाल्यावर घरातील सर्व जबाबदाऱ्या हसतमुखाने स्वीकारणारी गृहिणी आणि आपल्या ओघवत्या आणि रसाळ निवेदनांमधून नृत्याचे अनेक कार्यक्रम रंगवत नेणारी कलाकार, या दोन्ही भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. नृत्यातील अंगशुद्धता, रेखा, सौष्ठव या सर्वांचा समन्वय, अत्यंत सहज होणारा तरल अभिनय, शास्त्रशुद्धता आणि कल्पकता, बुद्धी आणि सौंदर्यवाद या सर्वांचा चपखल असा मेळ साधणारी त्यांची सादरीकरणाची शैली आहे.

एक शिक्षक म्हणून शिकवत असताना त्यात पूर्णपणे रमून जाणे, हातचे काहीही राखून न ठेवता ज्ञानाचे भांडार पूर्णपणे आपल्या शिष्यांपुढे खुले करणे, नृत्याच्या संगीत, साहित्य, शिल्प, चित्र या विविध आयामांवर उत्तम विवेचन करणे, यापलीकडे जाऊन शिष्याची स्वभाववैशिष्ट्ये, गुण-अवगुण, अधिक-वजा क्षमता आणि मानसिकता या सर्वांचा विचार करून त्याला योग्य पथावरून नेण्याचे, खर्‍या अर्थाने एका गुरूचे कार्य त्या करत असतात.

एखाद्या निरागस मुलामध्ये दिसणारी उत्सुकता, उत्साह आणि एखाद्या तत्त्वज्ञाठायी असणारी स्थितप्रज्ञता आणि विवेक यांचे अजब मिश्रण हे सुचेता भिडे-चापेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

नृत्यकला ही आपल्या दैनंदिन जीवनाचाच एक भाग आहे असे मानणार्‍या आणि तसा विश्वास रसिकांच्या मनांत निर्माण करणार्‍या सुचेता या अतिशय संवेदनशील कलाकार आहेत. नृत्याचा प्रसार आणि नृत्यरसिक निर्माण करण्याचे व्रत स्वीकारून आपल्या ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेतर्फे नृत्याचे शिक्षण देणार्‍या अनेक शाखा त्यांच्या मेहनतीतून उभ्या राहिल्या. नृत्याच्या कार्यशाळा, व्याख्याने, चर्चासत्रे या सर्वांमधून त्यांचा मोठा शिष्यपरिवार आणि रसिकवर्ग तयार झाला आहे. भरतनाट्यम् नृत्याच्या अनेक पैलूंवर अगदी मार्मिक विचार मांडणारे ‘नृत्यात्मिका’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. उत्तर भारतीय संगीत आणि भरतनाट्यम् या दाक्षिणात्य शैलीचे तंत्र यांचा सखोल अभ्यास करून दोन्हींचा समन्वय साधणारी ‘नृत्यगंगा’ ही सादरीकरणाची खास शैली त्यांनी निर्माण केली, आणि नृत्यगंगा सादरीकरणही लोकप्रिय झाले.

त्यांना आतापर्यंत ‘महाराष्ट्र गौरव’, ‘नृत्यविलास’, ‘सु.ल. गद्रे’ पुरस्कार, ‘महिला जीवन गौरव’ पुरस्कार, ‘पुणेज प्राइड’, ‘संगीत नाटक अकादमी’ राष्ट्रीय पुरस्कार (२००७) असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००८मध्ये अमृता महाडिक ह्यांनी सुचेता ह्यांच्या जीवनावर आधारित 'व्योमगामी' नावाचा माहितीपट त्तयार केला जो त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे दाखवण्यात आला. 

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्त्व अंगी बाळगून भरतनाट्यम् नृत्यशैलीस एका वेगळ्या सर्जनशील, कलात्मक आणि सौंदर्यवादी पातळीवर नेणार्‍या एकमेवाद्वितीय मराठी कलाकार म्हणून त्यांचे नाव कायम रसिकांच्या स्मरणपटलावर राहील.

स्मिता महाजन

भिडे-चापेकर, सुचेता अनिल