Skip to main content
x

भिसे, अविनाश नारायण

     कर्करोगग्रस्त पेशीच्या आणि तिच्या घटकांच्या रचनेतील, तसेच त्यांच्या कार्यपद्धतीतील बदलांचा वेध अविनाश नारायण भिसे यांनी अत्याधुनिक साधने व प्रक्रियांद्वारे घेतला आहे. त्यासाठी जीवशास्त्राच्या चौकटीत न राहता, भौतिकविज्ञान, तसेच रसायनविज्ञान यांच्यामधील संकल्पनांचा व शोधप्रणालींचा वापरही त्यांनी केला आहे. मुंबईत जन्मलेल्या भिसे यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. पुढे रुइया महाविद्यालयातून त्यांनी प्राणिशास्त्र या विषयात बी.एस्सी. व मुंबई विद्यापीठातून एम.एस्सी. या पदव्या मिळविल्या. त्यांनी डेमॉन्स्ट्रेटर म्हणन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु त्यानंतर लगेच इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (आय.सी.आर.सी.) येथे संशोधक म्हणून ते रुजू झाले.

     १९६२ साली चेस्टर बेटी रिसर्च इन्स्टिट्यूट, लंडन येथे सहा महिने प्रा. अ‍ॅम्ब्रोज यांच्या हाताखाली सजीव पेशींचे कल्चर या संदर्भातील नवीन तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले. त्यावर आधारित (टाइम लॅप्स सिनेमॅटोग्राफी आणि इंटरफिअरन्स मायक्रोस्कोपी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून) कर्करोगग्रस्त पेशींची पेशी- पेशींमधील आंतरक्रिया कशी होते, यावर त्यांनी संशोधन केले.

     कर्करोगग्रस्त पेशींची बदललेली वर्तणूक, इतर पेशींबरोबरचा त्यांचा बिघडलेला संबंध, या विविध पैलूंचे चित्रीकरण करून त्यावर त्यांनी संशोधन केले, शोधनिबंध लिहिला आणि तो ब्रिटिश टिश्यू कल्चर असोसिएशनच्या लंडन येथील अधिवेशनात १९६३ साली सादर केला.

     भारतात आय.सी.आर.सी.मध्ये सिनेमॅटोग्राफी तंत्रज्ञानाची सोय प्रथमच त्यांनी उपलब्ध करून दिली, आणि याच तंत्रज्ञानावर आधारित कॅनिबॅलिघमचे प्रात्यक्षिक करून दाखवले. इतरांना मार्गदर्शन करीत असतानाच, त्यांनी ट्यूमर पेशींची वाढ होत असताना जनुकीय अस्थिरता का येते, यावर संशोधन केले. १९६६ साली त्यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान करण्यात आली. ट्यूमर पेशींवरील त्यांच्या संशोधनामुळे १९६६ साली टोकियो येथे भरलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय कर्करोग परिषदेला त्यांना बोलावण्यात आले.

     टोकियो येथील शास्त्रज्ञ प्रा. हाजीम कॅटसुटा यांच्याबरोबर यकृतपेशींवरही त्यांनी संशोधन केले. तसेच, १९६८ ते १९७० या कालावधीत अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे डॉ. जेरोम जे. फ्रीड यांच्यासमवेत पेशी रचनेतील केशवाहिन्या (मायक्रोट्यूबुल्स) पेशीरचनेचा अभ्यास करण्यासाठी सिनेमॅटोग्राफी या तंत्राबरोबरच त्यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचाही वापर केला आणि त्याआधारे कल्चर पेशींच्या हालचाली आणि त्याचा केशवाहिन्यांशी असलेला संबंध, यांचे चित्रण केले. त्यांचे हे संशोधन पेशीरचनेच्या संदर्भात मैलाचा दगड ठरला. या संशोधनाचीच पुढची पायरी म्हणजे मायक्रोट्यूबुल्स आणि अ‍ॅक्टिन फिलामेंट यांचे पेशी आकार आणि पेशीचे चलनवलन योग्य राखण्यासाठी काय योगदान आहे, तसेच पेशीद्रव्याची हालचाल या केशवाहिन्यांमार्फतच होते हे स्पष्ट झाले.

     डॉ. भिसे यांनी भारतातील विविध प्रकारच्या कर्करोगचे संशोधन हाती घेतले. कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या शिष्यांच्या मदतीने ल्युकेमिया (एक प्रकारचा रक्त कर्करोग) वर अभ्यास करायला सुरुवात केली. यावरील संशोधनासाठी त्यांनी ‘मॉलेक्युलर सायटोजेनेटिक टेक्निक्स’ या तंत्राचा वापर केला. त्यांच्या या संशोधनाला जगन्मान्यता मिळाली. ल्युकेमियाग्रस्त पेशींची कार्यप्रणाली, त्या पेशींचे बदललेले वर्तन, त्यांचा अ‍ॅक्टिन फिलामेन्टशी असलेला संबंध यांचाही त्यांनी अभ्यास केला. भारतात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या तोंडाच्या कर्करोगावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. कर्करोग्यांच्या पूर्वावस्थेतील कर्कपेशी आणि कर्कग्रस्त पेशींचे निदान करण्यासाठी सायटोकरोटीन फिलामेन्टचा उपयोग मार्कर म्हणून कसा करता येईल, याबाबतही त्यांनी संशोधन केले.

     १९६२ साली आपल्याबरोबर सहविद्यार्थिनी म्हणून संशोधन करणाऱ्या रजनी आठवले यांच्याशी डॉ. भिसे विवाहबद्ध झाले. १९८५ साली पेशी जीवशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर कर्करोगावरील संशोधनासाठी प्रयोगशाळा निर्माण करून प्रयोगशाळेत प्रयोगासाठी लागणारे प्राणी उपलब्ध करून देणे ही जबाबदारी सोपविण्यात आली. नवी मुंबई, खारघर येथे अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रिटमेन्ट, एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन कॅन्सर (अ‍ॅक्टेक) याचे प्रकल्प संचालक म्हणून डॉ. भिसे यांची नियुक्ती झाली. टाटा मेमोरियल सेंटर या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेच्या मूलभूत संशोधन आणि औषधोपचार या कार्यात मदत व संशोधन करण्यासाठी अ‍ॅक्टेक या संस्थेची निर्मिती केली गेली. अ‍ॅक्टेकमधील प्रयोगात्मक संशोधनाद्वारे कर्करोग्यांना नवीन संशोधनात्मक उपचार मिळण्याची सोय झाली. त्यासाठी निरनिराळ्या प्रयोगांद्वारे चाचण्या घेऊन उपचार करण्यात आले. संशोधनाबरोबरच समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांसाठी कर्करोगाविषयी जागृती आणि शिक्षण यांसाठी कार्यक्रम आखण्यात आले. या संस्थेद्वारे कर्करोगाविषयी पदव्युत्तर आणि डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेण्याची सोयही करण्यात आली. महाविद्यालयांमधील शिक्षकांसाठी विविध कार्यशाळा, व्याख्याने यांद्वारे समाजात कर्करोगाविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

     अ‍ॅक्टेक ही कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विविध घटकांवर संशोधन करणारी, प्राण्यांमध्ये आवश्यक ती प्रतिकारक्षमता निर्माण करण्याविषयी प्रयोगात्मक संशोधन करणारी संस्था आहे. येथील क्लिनिकल रिसर्च सेंटर (सी.आर.सी.) मध्ये प्रारणांद्वारे कर्करोग उपचारपद्धतीमध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीने संशोधन केले जाते. आधुनिक युगाची नवी आव्हाने स्वीकारण्यास ही प्रयोगशाळा समर्थपणे कार्य करीत आहे. या प्रयोगशाळेत ट्यूमर व्हायरॉलॉजी आणि जीव थेरपीवर संशोधन केले जाते.

     त्यांचे आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरून ऐंशीच्यावर शोधनिबंध व ‘क्युरेबल कॅन्सर’ हे अत्यंत गाजलेले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. निवृत्तीनंतरही त्यांचा गाढा अनुभव लक्षात घेता, विविध सल्लागार समित्यांवर त्यांची नेमणूक झाली आहे.   

मृणालिनी साठे

भिसे, अविनाश नारायण